कंदीलपुष्पांचा धनी

07 Aug 2024 22:08:04
dr sharad suresh kamble


आपल्या रचनेमुळे गुंतागुंतीच्या ठरणार्‍या कंदीलपुष्पासारख्या वनस्पतीवर अभ्यास करुन, त्यात नव्या प्रजातींची भर घालणार्‍या डॉ. शरद सुरेश कांबळे यांच्याविषयी...

महाविद्यालयामधील जो विद्यार्थी वनस्पतीशास्त्राच्या तासाला गैरहजर राहिला, त्याच विद्यार्थ्याने पुढे जाऊन वनस्पतीच्या 25 नव्या प्रजाती शोधून काढल्या. आज हा विद्यार्थी राज्यातील आघाडीच्या वनस्पतीशास्त्रज्ञांमध्ये गणला जातो. ’कंदीलपुष्प’ अर्थात ’सेरोपेजिया’सारख्या ’संकटग्रस्त’ प्रजातींच्या अभ्यासासाठी हा माणूस देशभर फिरला, त्यामधून डझनभर कंदीलपुष्पाच्या नव्या प्रजातींचा शोध लावला. वर्गीकरण म्हणजेच ’टॅक्सोनॉमी’सारख्या क्लिष्ट विषयावर आधारित 75 हून अधिक संशोधन निबंध लिहिले आणि 25 नव्या प्रजातींचा शोधदेखील लावला. ‘प्रत्येक दिवसाला नवख्या विद्यार्थ्यासारखे सामोरे जा आणि त्यामधून शिकत राहा,’ असा मूलमंत्र आपल्या विद्यार्थ्यांना देणारा हा माणूस म्हणजे वनस्पतीशास्त्रज्ञ प्रा. डॉ. शरद कांबळे.

डॉ. कांबळे यांचा जन्म दि. 22 जून 1987 रोजी आपल्या आजोळी पाटण तालुक्यातील कडवे ब्रुद्रुक येथे झाला. त्यांचे मूळ गाव हे कराड तालुक्यातील येणके. या गावातच त्यांचे बालपण गेले. सुटीच्या दिवसांत जंगलभ्रमंती सुरू झाली आणि निसर्गप्रेमाचे बीज कांबळे यांच्या मनी रोवले गेले. एसजीएम महाविद्यालयामधून विज्ञान विषयातून पदवीचे शिक्षण घेत असताना त्यांच्या आवडीचा विषय होता रसायनशास्त्र. त्यामुळे वनस्पतीशास्त्राच्या तासाला दांडी मारण्याचा खेळ सुरू झाला. एक वर्षे हा आडपडदा राहिला. दुसर्‍या वर्षी महाविद्यालयात कोल्हापूरचे वनस्पतीशास्त्रज्ञ डॉ. मधुकर बाचुळकर यांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी बाचुळकरांच्या सादरीकरणामधील ’सेरोपेजिया हिरसुटा’ या प्रजातीचे छायाचित्र कांबळेंना भावून गेले. बाचुळकरांनी सांगितलेल्या ’टॅक्सोनॉमी’ या विषयात रस निर्माण झाला. व्याख्यान झाल्यावर त्यांनी लागलीच आपल्या शिक्षकांना ’टॅक्सोनॉमी’विषयी विचारले. वनस्पतीशास्त्रामधील वर्गीकरणाचा हा विषय कोल्हापूरचे डॉ. श्रीरंग यादवच योग्य पद्धतीने शिकवू शकतात, अशी माहिती कांबळेंना शिक्षकांनी दिली. त्याच काळात महाविद्यालयाने कांबळेंना एका परिषदेला प्रतिनिधी म्हणून पाठवले होते. त्याठिकाणी झालेले डॉ. यादवांचे व्याख्यान ऐकून कांबळेंनी चंग बांधला, तो म्हणजे कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठामधून डॉ. यादव यांच्याच मार्गदर्शनाअंतर्गत शिकण्याचा.

पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर डॉ. कांबळेंनी वनस्पतीशास्त्रातील पदव्युत्तर पदविकेच्या शिक्षणाकरिता कोल्हापूर विद्यापीठात प्रवेश मिळवला. डॉ. यादव यांच्या मार्गदर्शनाअंतर्गत त्यांचे शिक्षण सुरू झाले. ’टॅक्सोनॉमी’सारखा क्लिष्ट विषय घेऊनच त्यांनी 2010 साली आपले पदव्युत्तर पदवीचे शिक्षण पूर्ण केले. या शिक्षणाअंती पुढे काय? असा प्रश्न पडलेला असतानाच कांबळेंनी डॉ. यादव यांच्या मार्गदर्शनाअंतर्गतच ’पीएचडी’ करण्याचा निर्णय घेतला. त्याच काळात केंद्र सरकारच्या ‘बायोटॅक्नोलॉजी’ विभागाकडून शिवाजी विद्यापीठाला ’सेरोपेजिया’ वनस्पतीवर अभ्यास करण्याकरिता निधी मिळाला होता. हा अभ्याास प्रकल्पासाठी ’फिल्ड असिस्टंट’ करणार्‍या मुलांची गरज होती. कांबळेंनी लागलीच या पदासाठी अर्ज केला आणि त्यांची निवडदेखील झाली. आता प्रवास सुरू झाला तो म्हणजे ’पीएचडी’च्या अभ्यासाबरोबरच प्रकल्पासाठी देश पिंजून काढण्याचा. ’पीएचडी’च्या अभ्यासाचा विषय हादेखील ’सेरोपेजिया’संबंधी असल्यामुळे या प्रकल्पाची एका अर्थी त्यांना मदत झाली. या काळात कांबळेंनी देशभर फिरून ’सेरोपेजिया’ या वनस्पतींची नव्याने माहिती घेतली. त्यांच्या वर्गीकरणाचा सखोल अभ्यास केला. या अभ्यासातून 2010 ते 2015 या काळात त्यांनी देशभरातून ‘सेरोपेजिया’च्या सहा नव्या प्रजातींचा शोध लावला. यामध्ये ’सेरोपेजिया कोकणएन्सिस’, ’सेरोपेजिया रविकुमारीयाना’, ’सेरोपेजिया नॅम्पियाना’, ’सेरोपेजिया श्रीरंगी’, ’सेरोपेजिया गोंडवनेन्सिस’, ’सेरोपेजिया खासियाना’ या प्रजातींचा समावेश होता. 2015 साली त्यांनी आपली ’पीएचडी’देखील पूर्ण केली.

’पीएचडी’च्या पूर्णत्वानंतर डॉ. कांबळे ’पोस्ट डॉक्टरेट’ शिक्षणाकडे वळले. त्यावेळी त्यांनी डॉ. एम. के. जनार्दनम यांच्या मार्गदर्शनाअंतर्गत गोवा विद्यापीठाची निवड केली. या शिक्षणासाठी त्यांना ’यूजीसी’ची डॉ. डी. एस. कोठारी शिष्यवृत्तीदेखील मिळाली. पुढे त्यांनी ’मराठा विद्या प्रसारक समाज संस्था’ आणि पुणे विद्यापीठातील प्राध्यापकपदासाठी अर्जदेखील केला. 2016 साली त्यांची ’मराठा विद्या प्रसारक समाज संस्थे’च्या त्र्यंबकेश्वर येथील महाविद्यालयामध्ये साहाय्यक प्राध्यापकपदावर निवड झाली. दरम्यानच्या काळात त्यांनी ’सेट’ परीक्षादेखील उत्तीर्ण केली. सध्या ते या महाविद्यालयात साहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. विद्यादानाचे काम करत असताना त्यांनी ’टॅक्सोनॉमी’ची साथ मात्र सोडलेली नाही. आजही ते नव्या प्रजातींची उकल करत आहेत. विशाळगडावरुन नुकतीच कंदीलपुष्पाची ’सेरोपेजिया शिवरायीयाना’ ही नवी प्रजात त्यांनी इतर साहाय्यक संशोधकांसोबत शोधून काढली आहे. देश-विदेशातील 14 शास्त्रीय नियतकालिकांमध्ये ते समीक्षक म्हणून कार्यरत आहेत. ‘पालकांनी आपल्या पाल्याला करिअरची योग्य दिशा दाखवावी आणि पाल्यानेदेखील आवड असणार्‍या क्षेत्रातच आपले भविष्य घडवावे,’ असा मूलमंत्र ते या क्षेत्रात येऊ पाहणार्‍या विद्यार्थांना देऊ इच्छितात. डॉ. कांबळे यांना पुढील वाटचालीकरिता दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून शुभेच्छा!


Powered By Sangraha 9.0