कल्याणकारी योजना तरुणांना रोजगार...; मुख्य आर्थिक सल्लागारांचे महत्त्वाचे विधान!
07 Aug 2024 18:57:32
नवी दिल्ली : रोजगारनिर्मितीकरिता असलेल्या कल्याणकारी योजना देशातील तरुणांना रोजगार शोधण्यापासून रोखत आहेत का याचा अभ्यास केला पाहिजे, असे प्रतिपादन मुख्य आर्थिक सल्लागार व्ही अनंथा नागेश्वरन यांनी केले आहे. ‘द स्टेट ऑफ रूरल युथ एम्प्लॉयमेंट रिपोर्ट २०२४’ लाँच करताना कोविडनंतरच्या गिग अर्थव्यवस्थेवरील डेटावर भर देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, देशातील नोकरदारवर्ग अधिक औपचारिक होण्याऐवजी अधिक अनौपचारिक झाला आहे का, हे निर्धारित करण्यासाठी गिग अर्थव्यवस्थेसंदर्भातील डेटा विचारात घ्यायला हवा. तरुणांच्या श्रमाचा पुरवठा करण्याच्या इच्छेनुसार विशिष्ट वर्तनात्मक परिणाम युएस आणि युरोपमध्ये केलेल्या अभ्यासातून समोर आले आहे. ते म्हणाले, काही दिवसांपूर्वीच युनायटेड स्टेट्समधील दोन राज्यांमध्ये केलेल्या प्रायोगिक अभ्यासात सार्वत्रिक मूलभूत उत्पन्नाचा पर्याय लागू केल्याने कामगारांचा पुरवठा कमी झाला आहे.
ते म्हणाले की, बेरोजगारी पाहताना त्यातील किती अनैच्छिक आणि किती ऐच्छिक बेरोजगारी आहे हे शोधणे गरजेचे आहे. कल्याणकारी योजना तयार करताना लोकांचा अर्थव्यवस्थेतील सहभाग कसा वाढेल, यावर भर दिला जातो. तसेच, या सहभागामुळे आर्थिक घडामोडी सरकारच्या बाहेर घडतात, सरकारच्या आत नाही. त्यामुळे आपल्या कल्याणकारी योजनांवर काम करून त्या अधिक सुलभ केल्या पाहिजेत, असेही ते यावेळी म्हणाले.