गोरेगाव बस डेपो खड्डयात, प्रवासांचे हाल

07 Aug 2024 18:25:28
Goregaon Bus Depot news
( छायाचित्र - आलेख चाळके )

मुंबई (सुप्रिम मस्कर): गोरेगाव पूर्व येथील बस आगारात भलेमोठे खड्डे पडल्याने नागरिकांना गैरसोय होत आहे. बस चालक हे खड्डे चुकवत बस चालवत आहेत, तरीही बेस्टच्या अखत्यारीत येणाऱ्या या खड्ड्यांकडे बेस्टचे दुर्लेक्ष होताना दिसत आहे.स्थानिकांकडून बेस्ट उपक्रमाकडे वारंवार तक्रार करूनही या आगारातील खड्डे बुजवले जात नाहीत.

विशेष म्हणजे या आगारातील खड्ड्यात पावसाचे एवढे पाणी जमा होते की, प्रवाशांना आगारांमध्ये या खड्यांत जमा होणाऱ्या पाण्यातून जावे लागते. दरम्यान पाण्यातून चालताना बस बाजूने जाताना प्रवाशांच्या अंगावर हे अस्वच्छ जमा झालेले चिखलसदृश पाणी उडते. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.

गोरेगाव पूर्वेला असणाऱ्या बेस्ट बस स्थानकानजीक पडलेल्या खड्डयांची परिस्थिती मी स्वत: भेट देऊन पाहिली आहे. यासंदर्भात मुंबई महापालिकेच्या वार्ड ऑफिसरशी बोलणे झाले. तेव्हा कळले की, हे प्रकरण बेस्ट अंतर्गत येते. तरी बेस्टने कंत्राट काढून खड्डे बुजवणे गरजेचे आहे. तरी याप्रकरणी बेस्टच्या संबधित अधिकाऱ्याशी चर्चा करणार आहे.

स्वप्नील टेंबवलकर , स्थानिक नगरसेवक

रेल्वे स्थानकाला यायचे तर आम्हाला बसशिवाय पर्याय नाही. मात्र बस डेपोत उरताच खड्ड्यांचा सामना करावा लागतो. या ओबडधोबड खड्ड्यांमधून बस फिरते, तेव्हा हादरे बसतात. त्यामुळे पाठदुखी, मणक्याला हिसके बसतात. शिवाय बस पकडतानाही या खड्ड्यांधून वाट काढत जावे लागते. हे खड्डे कायमस्वरुपी बुजवणे गरजेचे आहे.

- आशिष केरकर


गोरेगाव पूर्वेला बसची फ्रेक्वेनसी कमी आहे. त्यात एसी बसच्या नावाखाली नॉन एसी बसमधून प्रवास करावा लागतो, मात्र दर एसी बसचा आकरला जातो. याव्यतिरिक्त बसस्थानकातील खड्ड्यामुळे बस सुटण्याच्या वेळी नागरिकांची तारांबळ उडते. ज्येष्ठ नागरिकांना या खड्ड्यातून वाट काढत तात्काळ बस पकडणे, अशक्यप्राय होऊन बसते. तरी बेस्टने या संदर्भात लक्ष द्यावे.

भालचंद्र विश्वासराव, स्थानिक रहिवासी



 
Powered By Sangraha 9.0