बेस्ट बस बंद पडणार, मुंबईकरांनो संकट ओळखा!

07 Aug 2024 12:35:39
shashank rao


मुंबई
 : बेस्ट बससेवा ही मुंबईची जीवनवाहिनी आहे. त्यामुळे मुंबईच्या कानाकोपऱ्यात बेस्टची अत्यावश्यक सेवा अल्पदरात नियमितपणे सुरु राहणे ही प्रवासी आणि मुंबई शहराची मूलभूत गरज आहे. मात्र ७ ऑगस्ट या बेस्ट बससेवा दिनाच्या दिवशी सुद्धा 'बेस्ट बचाव अभियान' राबवावे लागणे, हे मुंबईकरांसाठी दुर्देवी आहे. त्यामुळे बेस्ट दिन म्हणावा की दीन अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळेच अभियानाकडून मुंबईतील सर्व आमदारांना दि. ७ ऑगस्ट ते १० ऑगस्ट दरम्यान बेस्टसंदर्भात निवेदन देण्यात येणार आहे.

यासंदर्भात 'दै. मुंबई तरुण भारत'ने बेस्ट बचाव अभियानाचे निमंत्रक शशांक राव यांच्याशी बातचीत केली. राव म्हणाले, २०१९ नंतर पालिकेकडून बेस्ट उपक्रमाला आयुष्यमान संपलेल्या बसगाड्यांच्या बदल्यात नवीन बसगाड्या विकत घेण्यासाठी कुठलाही निधी देण्यात आला नाही. परिणामी बेस्टच्या बसताफ्यात आजघडीला ३३३७ बसगाड्यांची आवश्यकता असताना फक्त १०८५ गाड्या शिल्लक आहेत. त्यामुळे ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत नवीन गाड्या विकत घेतल्या नाही तर, बेस्टच्या ताफ्यात फक्त २५१ गाड्या शिल्लक राहतील आणि डिसेंबरपर्यंत बेस्ट बससेवा बंद पडेल, अशी चिंता बेस्ट बचाव अभियानाचे निमंत्रक शशांक राव यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान मुंबईतील प्रवासी संघटना, मुंबईतील एन.जी.ओ, सामाजिक कार्यकर्ते, हाऊसिंग असोसिएशनस् आणि मुंबईकरांनी पुढाकार घ्यावा. तसेच मुंबईची सांस्कृतिक ओळख असणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांनी सुद्धा मरणासन्न अवस्थेत असलेल्या बेस्टला पाठिंबा देऊन बेस्ट विषय सामाजिक संदेश देणारे देखावे उभे करावे, असे आवाहन बेस्ट बचाव अभियानामार्फेत करण्यात आले आहे.

Powered By Sangraha 9.0