ढाक्याबाहेरची ढेकणे

06 Aug 2024 21:33:12
sheikh haseena bangladesh govt


शेख हसीना यांचे बांगलादेशातील सरकार कोसळले आणि त्याचा आनंद त्या देशातील आंदोलकांसह भारतातील काही पुरोगाम्यांनाही झाला. ज्याप्रमाणे हसीना यांच्यावर आपल्याच देशातून पलायन करण्याची वेळ आली, तशी वेळ भारतीय पंतप्रधानांवरही येईल, असे अप्रत्यक्षपणे सुचवण्याचे पुरोगामी चाळे या मंडळींनी समाजमाध्यमांवरुन केले. पुरोगामी चळवळ्यांबरोबर स्वतःला पत्रकार म्हणविणारी मंडळीही या चिखलफेकीत अगदी आघाडीवर होती. बांगलादेशात परिवर्तन घडले, हुकूमशाही वृत्तीच्या हसीना यांना जनतेने जागा दाखवली, अशीच स्थिती भारतातही लवकरच उद्भवणार म्हणून या नतद्रष्टांना उकळू फुटू लागल्या. यामध्ये सबा नक्वी, राणा अयुब, राजदीप सरदेसाई यांसारख्यांची नावे तर अगदी नेहमीप्रमाणे आघाडीवर होती. कोसळलेला बांगलादेश हा सर्व लोकशाही देशांसाठी एक धडा असल्याचाच सिद्धांत या पुरोगाम्यांनी मांडायला सुरुवात केली. ‘सब ताज उछालें जाएँगे, सब तख्त गिराए जाएंँगे’ म्हणत काहींनी चक्क शेरोशायरीही केली. त्यामुळे एका लोकशाही राष्ट्राच्या पतनाचा हा विकृतोत्सव समाजमाध्यमांवरील ढाक्याबाहेरच्या या ढेकणांनी अक्षरशः साजरा केला. एवढेच नाही, तर जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुक्ती यांच्या कन्येनेही असेच अकलेचे तारे तोडले. बांगलादेशातील अराजकाऐवजी श्रीलंकेत राजपक्षे यांच्या बंगल्यात घुसून तरणतलावात पोहणार्‍या आंदोलकांचा व्हिडिओ ‘एक्स’वर तिने रिपोस्ट केला आणि लिहिले की, ‘लोककल्याण मार्गावरही असाच तरणतलाव आहे का? कोणी मित्र (तिथे) येईल का ते विचारते.’ या ट्विटमधून मुक्तींची दिवटी नेमकी काय सुचवू पाहत आहे, हे न कळण्याइतपत जनता दुतखुळी नक्कीच नाही. म्यानमार, श्रीलंका, केनिया आणि आता बांगलादेशातही लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या सरकारला सत्ताच्युत करण्यासाठी जे अराजक माजले, तशीच गोंधळाची परिस्थिती भारतात निर्माण व्हावी, हीच या पुरोगामी कंपूची सुप्त इच्छा. पण, हा भारत आहे, बांगलादेश नाही, याचा मात्र अनेकांना सोयीस्कर विसर पडताना दिसतो. जे बांगलादेशात घडले, ते कदापि भारतात होणे नाही. हो, पण म्हणून भारताने निर्धास्त न राहता, ‘डीप स्टेट’च्या या लोकशाही खिळखिळी करण्याच्या षड्यंत्रांपासून सावध असावे, हे नक्की!

इशारो इशारो में...

“आरक्षण हा सोपा विषय नसून, बांगलादेशमधील परिस्थितीवरुन राज्य सरकारने धडा घ्यावा,” असा इशारा मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी दिला. इतकेच नव्हे, तर आरक्षणाचा आक्रोश किती भयंकर असतो, ते सरकारने समजून घेतले पाहिजे, अशी मल्लिनाथीही त्यांनी केली. त्यामुळे प्रश्न जगातील कोणत्याही देशातील आरक्षणाचा आणि आंदोलनाचा असो, आता त्यावरही जरांगे-पाटील एखाद्या अभ्यासू घटनातज्ज्ञाप्रमाणे बोलू लागले आहेत, हा महाराष्ट्राचा गुणगौरवच नव्हे का? तर पाटील पुढे बोलताना म्हणाले की, “आरक्षण हा साधा सोपा विषय नाही. तिथे लोकांच्या वेदना आणि आक्रोश आहे. मात्र, महाराष्ट्रात बांगलादेशसारखी परिस्थिती उद्भवणार नाही. कारण, महाराष्ट्र हा आमचा आहे, केवळ नेत्यांचा नाही. महाराष्ट्र सगळ्या जातीधर्मांच्या लोकांचा आहे. इथे शांतता आहे. काही लोक राज्यात दंगली घडवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, मराठा समाज त्यांचे स्वप्न पूर्ण होऊ देणार नाही,” अशी टिप्पणीही जरांगे-पाटलांनी जोडली. जरांगे म्हणतात तसे महाराष्ट्रात बांगलादेशसारखी परिस्थिती म्हणा कदापि उद्भवणार नाही, हे खरेच. पण, ती महाराष्ट्र ‘तुमचा’ आहे म्हणून नव्हे, तर या राज्याची कायदा आणि सुव्यवस्था एका खमक्या गृहमंत्र्याच्या हाती आहे म्हणून. पण, पाटलांची गत म्हणजे सध्या पेटवणारेही तेच आणि विझविणारेही तेच, अशी. त्यामुळे आपणच प्रक्षोभक वक्तव्ये करायची, समाजाची दिशाभूल करुन त्यांची माथी भडकवायची, त्यांना रस्त्यावर उतरायला भाग पाडायचे आणि नंतर स्वतःच कांगावा करुन अन्याय झाल्याची आरोळ ठोकायची, अशी ही गत. त्यामुळे राज्यात कोणामुळे जातीजातींत तेढ निर्माण झाली? कोणामुळे राज्यात दंगली पेटू शकतात, हे आता समाजाला आणि जनतेलाही कळून चुकले आहे. जरांगे-पाटलांची ही कोल्हेकुई म्हणूनच फार काळ चालणारी नाही. त्यामुळे आधी पवारांनी महाराष्ट्राची मणिपूरच्या परिस्थितीशी केलेली तुलना आणि आता जरांगे-पाटलांनी असे महाराष्ट्रात घडणार नाही, म्हणून राज्य सरकारला दिलेला सूचक इशारा नक्कीच गांभीर्याने घ्यावा लागेल. कारण, निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्र पेटवून राजकीय लाभ पदरी पाडण्याचे हे व्यापक षड्यंत्र निश्चितच धोकादायक.

Powered By Sangraha 9.0