पॅरिसमेल्या ऑलिम्पिकस्पर्धेत वोकिझमचा चांगलाच सुळसुळाट झाला आहे. डाव्यांचा या डावाची चर्चा खर्या अर्थाने सुरू झाली, ती मुष्टियुद्ध सामन्यात एका स्त्री म्हणवणारा पुरुष खर्या स्त्रीविरुद्ध मैदानात उतरवला गेला तेव्हा. हाच वोकिझम भारतातदेखील पाय रोवू पाहात आहे, या स्पर्धेच्या निमित्ताने वाढत्या वोकिझमचा घेतलेला आढावा...
महिला एकेरी, पुरुष एकेरी, महिला दुहेरी, पुरुष दुहेरी एवढेच नव्हे, तर अगदी मिश्र दुहेरी असे टेनिस, बॅडमिंटनसारखे सामने आपण नेहमी बघत आलो आहोत. अन्य खेळांत महिला-महिला, पुरुष-पुरुष असे सामने होत असतात. नेमबाजीत, धनुर्विद्येतही एका स्पर्धेत, एकाच संघाकडून पुरुष आणि महिला मिश्र सांघिक प्रकारात खेळत असतात. हॉकी, फुटबॉलसारख्या सांघिक ऑलिम्पिक खेळातही पुरुषविरुद्ध पुरुष, महिलाविरुद्ध महिला असेच संघ लढताना दिसतात, आणि त्यात कोणालाच काही गैर वाटलेले नाही. उलट, महिला-पुरुष समानतेला क्रीडाक्षेत्र नेहमीच मान देत आले आहे.
ऑलिम्पिक क्रीडाप्रकारातील मुष्टियुद्धाचा खेळही इतके दिवस असाच बाकी क्रीडाप्रकारांसारखा ,गोडीगुलाबीत नांदत होता. पण, पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये शुक्रवार, दि. २ ऑगस्ट रोजी महिलांच्या ६६ किलो वजनी गटाचे मुष्टियुद्ध बघताना, सगळ्यांना फक्त प्रारंभीच्या काही सेकंदांतच मुष्टिप्रहार सहन करावा लागला. ती मुष्टियुद्धाची अकल्पित लढत होती, चक्क एक पुरुषविरुद्ध महिला यांच्यातील.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सतत नव्या कारणांमुळे वाद होत आहेत. गुरुवारी, दि. १ ऑगस्टला एक भयंकर प्रकार या ऑलिम्पिकमध्ये दिसला. इटलीच्या एंजला कारिनीला ‘बायोलॉजिकल मेल’ समजल्या जाणार्या एका बॉक्सरने, ऑलिम्पिक इतिहासातील सर्वात वादग्रस्त लढतीमध्ये फक्त ४६ सेकंदांमध्ये पराभूत केले. मुष्टियुद्धातील एका सामन्यात, तीन मिनिटांच्या तीन फेर्या असतात. पण, अल्जेरियाच्या बॉक्सरने दोन जोरदार ठोसे लगावले, आणि एलेनाला फक्त ४६ सेकंदांतच बाहेर काढले. नाकाला दुखापत झाल्यामुळे रक्त येत असल्याने, इटलीची बॉक्सर उभी राहू शकत नव्हती. मुष्टियुद्धात नाकातून रक्त येईल, असे अनेक ठोसे अनेक मुष्टियोध्यांनी झेलले असतील, पण हा मुष्टिप्रहार अगम्य ठरला आहे.
कोणताही सामना असला, तरी प्रारंभीच सामना सुरू होण्याआधीच, सामन्याचा पंच त्या लढतीमधील दोन्ही योध्यांचे हात हाती घेऊन दोघांचे हस्तांदोलन करून देत असतो. कारण, खेळत असताना नेहमी डिेीीीांरपीहळि : खेळभावना जपायची असते, हे तेव्हा सांगितले जाते. सामना संपल्यानंतर विजेता घोषित केल्यानंतरही, असे हस्तांदोलन करत, पराजिताने विजेत्याचे अभिनंदन करण्याची परंपरा आहे. पण, या सामन्यात काही विलक्षणच बघण्याची वेळ क्रीडाप्रेमीच नव्हे, तर सगळ्या जगावर आली. इटालियन बॉक्सरने तिचा जीव वाचवण्यासाठी खेळातील चढाओढ सोडून देण्याचा निर्णय घेतल्यानंतर, कॅरिनी-खेलिफची लढत केवळ ४६ सेकंद चालली. काही वेळातच ती रडत गुडघ्यावर पडली, आणि तिने खेलिफशी हस्तांदोलन करण्यासही नकार दिला. अल्जेरियन बॉक्सरला विजेता घोषित करण्यात आले, आणि ते प्रकरण तिथे थांबले. पण मग जगभर या मुष्टियुद्धाची चर्चा होऊ लागली. “माझे मन दुःखी आहे. मी माझ्या वडिलांचा सन्मान करण्यासाठी रिंगमध्ये गेले होते. मला अनेकदा सांगण्यात आले की, मी एक योद्धा आहे. पण मी माझ्या जिवंत राहण्यासाठी थांबणे पसंत केले. मला असा ठोसा कधीच जाणवला नाही,” असे कॅरिनीने प्रसारमाध्यमांतून आपले मन मोकळे करताना सांगितले. स्पर्धेच्या पदाधिकार्यांसह कोणाही समोर, ती आपले मन ती मोकळे करू शकत नव्हती. तिची अपेक्षा होती की, आपली प्रतिस्पर्धी एक स्त्री असेल. पण, तसे न घडता, एका स्त्री-पुरुष पात्राला एका स्त्रीच्या भूमिकेत सर्रासपणे उतरवले गेले होते. दस्तुरखुद्द ऑलिम्पिक समितीने या विषयावर त्यांची बाजू स्पष्ट केली आहे. त्यांचे प्रवक्ते मार्क एडम्सने पत्रकारांना सांगितले की, ‘महिलावर्गात सहभागी झालेले सर्व प्रतिस्पर्धी स्पर्धेच्यानियमांचे पालन करत आहेत. इमाने ही तिच्या पासपोर्टनुसार महिला आहे आणि ती महिला असल्याचे पासपोर्टमध्ये लिहिले आहे.’ ऑलिम्पिक समितीच्या लेखी हा विषय इथेच संपत असला, तरी संवेदनशील जनतेच्या मनात तो चिरंतन राहणार आहे.
इमाने खेलिफला ऑलिम्पिकपूर्वी एका प्रमुख बॉक्सिंग स्पर्धेत खेळण्यास बंदी घातली होती. इमाने खेलिफ यापूर्वीदेखील स्वतःच्या जेंडरबाबत वादात सापडली आहे. लिंग योग्य सिद्ध करण्यासाठी घेण्यात आलेल्या टेस्टोस्टेरोन चाचणीत अयशस्वी झाल्यानंतर, खेलिफला गेल्यावर्षी जागतिक स्पर्धेतून वगळण्यात आले होते.
जगभरातून यावर ज्या अनेक प्रतिक्रिया येत आहेत, त्यात हॅरी पॉटरचे निर्माते जे. के. रोलिंग यांची प्रतिक्रिया सगळ्यांचे प्रतिनिधित्व करेल, अशी वाटते. कॅरिनीच्या पराभवावर प्रतिक्रिया व्यक्त करताना, रोलिंग यांनी समाजमाध्यमांवर पोस्ट केले आह की, तुमच्या मनोरंजनासाठी एका पुरुषाने सार्वजनिक ठिकाणी महिलेला मारहाण केली आहे, हा नक्कीच खेळ नाही. लाल रंगात गुंडगिरी करणार्या फसवणुकीपासून ज्या आयोजकांनी हे घडू दिले, ते पुरुष महिलांवरील शक्तीचा आनंद घेत आहेत. पुढे, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीमधील ‘सेफ स्पोर्ट युनिट’च्या प्रमुख क्रिस्टी बुरोज यांची एक पोस्ट शेअर झाली असून, त्यात एखाद्या पुरुषाला स्त्रीसोबत रिंगमध्ये येण्याची परवानगी दिल्याबद्दल त्यांची निंदा केली आहे.
ही वादग्रस्त बॉक्सर, महिला गटात प्रवेश करण्यात मोलाचे ठरलेले एक ’डीएसडी’ हे प्रकरण आपण जाणून घेऊ. नियमांनुसार, लिंग विकासातील फरक म्हणजे, ’डीएसडी’ असलेले खेळाडू सध्या ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या स्पर्धेत भाग घेण्यास पात्र आहेत. डीएसडी हे दुमीर्र्ळ परिस्थितींचा एक समूह आहे, ज्यामध्ये जीन्स, हार्मोन्स आणि जननेद्रियांचा समावेश असतो. ’डीएसडी’ असलेल्या काही लोकांची वाढ स्त्री म्हणून केली जाते. तथापि, त्यांच्याकडे XY लैंगिक गुणसूत्र असतात, तर त्यांच्या रक्तातील टेस्टोस्टेरॉनची पातळी पुरुषांच्या श्रेणीत असते. प्रत्येक व्यक्तीला समाजाकडून आणि कुटुंबाकडूनही लिंगभावाचे बाळकडू पाजले जात असते. कपडे, खेळ, वागणूक, भाषा वगैरेंद्वारे लैंगिक ओळख ठसविली जाते. याला ‘पालनगत लिंगभेद’ असे म्हणतात. वरील सर्व स्तरांवरील लिंगभेदामुळे व्यक्तीला लैंगिक ओळख प्राप्त होते. अशाप्रकारे नेमकी लैंगिक ओळख हरविलेल्या व्यक्ती, काही विशिष्ट सामाजजीवनातले म्हणून वावरताना दिसतात.
आज स्त्री-पुरुष समानता भारतीय समाजात आदरप्राप्त असली, तरी स्त्री-पुरुष यांच्यातील शारीरिक दरी ही कायमच राहणार आहे. ही दरी ओलांडून जाणार्यांचे समाज कधीच समर्थन करताना दिसणार नाही. उलटपक्षी पुरुषी आवेश आणून स्त्रियांचे फायदे उठवणे समर्थनीय नाहीच. आज अनेकजण तेच सांगत आले आहेत. ती काही उदाहरणे आपण आता पाहू.
पॅरिस ऑलिम्पिकदरम्यान महिलांच्या बॉक्सिंग स्पर्धेत, महिलांच्या झालेल्या अपमानाचा मुद्दा ‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे’ने नुकताच ठळकपणे उपस्थित केला आहे. इटलीची एंजला कॅरिनी आणि अल्जेरियाची इमाने खेलिफ यांच्यातील सामना हे निकृष्ट वोकिजमचे उदाहरण आहे. महिलांच्या स्पर्धेत पुरुषाला मैदानात उतरवणे अत्यंत दुर्दैवी आणि महिलांचा अपमान करणारे आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये बॉक्सिंग सामन्यादरम्यान महिलांचा अपमान करणे निषेधार्ह असल्याचे पवनतीर्थ समेद शिखर पारसनाथ, झारखंड येथे ‘अभाविप’च्या दोन दिवसीय केंद्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत म्हटले आहे.
मागील वर्षी ‘आंतरराष्ट्रीय जलतरण संस्थे’ने (FINA) घेतलेल्या निर्णयाप्रमाणेच, आता त्यांच्यासारखेच जागतिक अॅथलेटिक्सनेही निर्णय घेत, मैदानी खेळांच्या स्पर्धेमध्ये खेळांडूच्या शारीरिक क्षमतेमध्ये दुजाभाव नसावा, यासाठी जागतिक अॅथलेटिक्सच्या ‘आंतरराष्ट्रीय नियामक मंडळा’नेही ट्रान्सजेंडर महिलांमध्ये पुरुषांप्रमाणेच ताकद असल्यामुळे, त्यांना आता महिलांच्या गटात खेळण्यास मनाई केली आहे. ट्रान्सजेंडर महिलांना कायमचा नकार अजून दिलेला नाही, किंवा त्यांच्यासाठी दरवाजे बंद केलेले नसले, तरी त्यांना महिलांच्या गटात खेळण्यास मनाई असेल. याआधीही ट्रान्सजेंडर महिलांवर सरसकट बंदी नव्हती. ट्रान्सजेंडर महिला खेळाडूंना, स्पर्धेत भाग घेण्याच्या १२ महिने आधी सलगपणे शरीरात टेस्टोस्टेरॉन (testosterone) या संप्रेरकाचे प्रमाण पाच (mol/liter) नॅनोमोल प्रतिलिटरपेक्षा कमी करावे लागत होते.
या वादातील घटनेला म्हणजे खेलिफला प्रवेश देण्याचा आणि नंतरच्या घडामोडीचा ट्रम्प, एलॉन मस्क ते इटलीच्या पंतप्रधान या सर्वांनी निषेध नोंदवला आहे. पण केवळ निषेध नोंदवून भागणार नाही. वोकिझमचा हा मानवी मूल्ये गिळू पाहणारा अजगर ठेचायचा असेल, तर जगभरातून त्यासाठी प्रामाणिक योजनापूर्वक प्रयत्न करावे लागतील.
जलतरण आणि अॅथलेटिक्स संघटनेप्रमाणेच असा निर्णय मागील वर्षी ‘क्रिकेट नियामक मंडळा’नेही ट्रान्सजेंडर खेळाडूंबाबत मोठा निर्णय घेतला होता. त्यांनी खेळाडूंना आणि ज्यांनी लिंगबदल उपचार घेतले आहेत, त्यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भाग घेण्याची परवानगी न देण्याचा निर्णय घेतला. आंतरराष्ट्रीय खेळासाठी लिंगबदलाबाबत नवीन नियमांना ‘आयसीसी बोर्डा’ने मान्यता दिल्यानंतर, आता कोणताही पुरुष खेळाडू लिंग बदलून महिला क्रिकेट संघात खेळू शकणार नाही. नऊ महिन्यांच्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
जागतिक बुद्धिबळातील सर्वोच्च संस्था असलेल्या ‘फिडे’ने लिंगपरिवर्तन करीत, पुरुषांपासून महिला बनलेल्या बुद्धिबळपटूंवर स्पर्धेत सहभागी होण्यास बंदी घातली आहे. आमचे अधिकारी लिंग परिवर्तनाची समीक्षा करेपर्यंत, ट्रान्सजेंडर महिलांना स्पर्धेत मज्जाव असेल, असे ‘फिडे’ने मागील वर्षी स्पष्ट केले होते.
अनेकजण जेव्हा याविषयी एकमत जाहीर करतात, तेव्हाच दुसरी मतप्रणालीदेखील सक्रिय होत असते. त्यात डाव्या विचारसरणीचे लोक एवढेच नव्हे, तर माजी चॅम्पियन स्प्रिंटर दुती चंदसारखी खेळाडू ट्रान्सजेंडर अॅथलेट्सच्या स्पर्धेच्या हक्कासाठी उभी राहते. दुती चंद, एक प्रसिद्ध भारतीय धावपटू आणि क्रीडा क्षेत्रातील लिंग हक्कांसाठीची वकील, हिने ट्रान्सजेंडर महिला खेळाडूंना अनेकदा पाठिंबा दर्शविला आहे. तिने असे म्हटले आहे की, “क्रीडा प्रशासकांनी त्यांना स्पर्धा करण्यापासून रोखणे अन्यायकारक आहे. कारण, इतर लोक उच्च स्तरावर त्यांचे यश स्वीकारण्यासाठी संघर्ष करतात.” लिंगाची पर्वा न करता प्रत्येकाला खेळण्याचा आणि स्पर्धा करण्याचा अधिकार आहे, या मूलभूत मानवी तत्त्वावर दुतीसारखी मंडळी भर देत असतात. तिचा असा विश्वास आहे की, “ट्रान्सजेंडर अॅथलेट्स स्पर्धांदरम्यान कोणताही अनुचित फायदा घेत नाहीत, आणि आज ते जिथे आहेत, तिथे पोहोचण्यासाठी त्यांनी आधीच लक्षणीय सामाजिक दबाव आणि अपमानावर मात केली आहे.” असे अधोरेखित करून दुती स्वीकार आणि समजून घेण्याचे आवाहन वारंवार करत असते. फक्त हिंदू संस्कृतीचाच विचार न करता, भारतीयांनीच नव्हे, तर सगळ्यांनीच ही विचित्र डावी विचारसरणी धुडकावली पाहिजेे.
नुकत्याच वाचनात आलेल्या घटनेची दखल घेत, आपण खरेच अंतर्मुख व्हायला हवे. त्या लेखात म्हटले होते की, बॉक्सिंगमध्ये घडलेल्या या प्रकाराला पार्श्वभूमी या अगोदर दि. २६ जुलै रोजी पॅरिस ऑलिम्पिकच्या उद्घाटनाची देखील आहे. मानसिक रोगी झालेल्या या वोकिझमवाल्या मंडळींनी या उद्घाटन सोहळ्याचा संपूर्ण ताबा घेतला होता, हे दिसत होते. पुरुषी वेशातल्या स्त्रिया आणि स्त्री वेषातील पुरुष आणि त्यांचे विकृत लैंगिक चाळे, यांनी व्यापलेल्या या सोहळ्यात कुठेही फ्रान्स देशाच्या संस्कृती, परंपरा यांचे दर्शन नव्हते. दिसत होती, ती पूर्णपणे मानसिक विकृत मंडळींची उद्दाम शारीरिक हालचाल.
जगभरातील लोकांनी हे बघितले आहे. याविरुद्ध धर्म, पंथ, परंपरा आणि मूळ संस्कृतीचे वाहक मूग गिळून बसले आहेत, ही याविषयाची दाहकता अधिक वाढवणारी आहे. पोप हे नावालाच आहेत का? ते का या गोष्टीचा निषेध करायला उभे राहात नाही? का चर्च व्यवस्था पण सोराससारख्या भांडवलदारांच्या घरी पाणी भरायला गेली आहे?
सध्या पाश्चिमात्य देशांत ‘वोक’लेले आपल्या देशात ‘पक्वान्न’ म्हणून वाढण्याचा प्रयास चालू झाला आहे. त्याला कायदेशीर बैठक देण्याचे प्रयत्नही लगबगीने चालू आहेत. याच्या परिणामांची कल्पना पाश्चिमात्य देशातील आजची परिस्थिती पाहिल्यावर सहज लक्षात येते. ‘येथे असले काही होणार नाही, चालणार नाही,’ अशा भ्रमात वावरणे परवडणार नाही. या ‘वोकिझम’चा चंचुप्रवेश झाला आहे आणि तो जे आहे, ते नष्ट केल्याविना थांबणार नाही. आपल्या मनाला वाटते ते स्वतःचे लिंग, असे मानण्याचे सामाजिक दुष्परिणाम काय होतील? याची वोकिझमच्या पुरस्कर्त्यांना जराही कल्पना नाही.
पाश्चिमात्य देशांत पुरुष ‘आपण स्त्री आहोत,’ असे म्हणत महिलांचे लैंगिक शोषण करू लागले आहेत. पुरुषांच्या पोहण्यामध्ये १००च्या पुढील मानांकन असणारा जलतरणपटू ‘आपण महिला आहोत,’ असा दावा करत ‘अव्वल महिला जलतरणपटू’ ठरत आहे. ट्रान्सजेंडर प्रमाणेच ‘ट्रान्सएबल्ड’ हा प्रकारही वाढीस लागला आहे. डोळे असूनही ‘ट्रान्सआंधळे’ झाले आहेत. याची पुढची पायरी म्हणजे स्वतःचे शस्त्रक्रिया करवून स्वतःस दिव्यांग ठरवू लागले आहेत. त्यांच्या विशेषाधिकारांची मागणीही होऊ लागली. ‘तिकडची घाण हे पंचपक्वान्न,’ या विद्वानांच्या उक्तीस अनुसरून लवकरच भारतात ‘ट्रान्सदिव्यांग’ सिद्ध होतील, यात शंका नाही. सर्वांग केसाळ असलेल्या दाढीवाल्या बाईंची छायाचित्रे भारतीय नियतकालिकांवर छापली जाऊ लागली आहेत. हे अतिशय गंभीर आहे.
भारतात नसलेली समस्या आणून तिला भारतीय बनवणे चालू आहे. मुळातच जे भारतीय नाही, ते इथल्या समाजात आणि संस्कृतीत रुजवण्याचा अट्टहास का? आधीच सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात ‘ट्रान्सजेंडर’ शौचालये उभारण्यात आली आहेत. न्यायाधीशांच्या वोकिझमच्या नादापायी, संपूर्ण समाजाचेच ‘ट्रान्सजेंडर’ शौचालय करायचे आहे का? असा एक विचार माझ्या वाचनात आला होता. वोकिझमचा, तसेच ‘ट्रान्सजेंडर’सारखे अनेक विचार करून आपण, हिंदुस्थानी लोकांनी तरी त्यावरचे उपचार अमलात आणले पाहिजे. नाहीतर पुढच्या पिढीत हे कधी प्रसारित होऊन सगळे अवघड होऊन बसेल, हे आपल्याला कळणारही नाही.
इति!
श्रीपाद पेंडसे
(लेखक माजी खेलकूद आयाम प्रमुख, पश्चिम महाराष्ट्र प्रांत, जनजाती कल्याण आश्रम आणि माजी हॉकीपटू आहेत.)
९४२२०३१७०४