ठाण्यातील अत्रे कट्ट्याच्या निर्मितीची आणि लेखिका, उत्तम वक्त्या संपदा वागळे यांच्या यशाच्या प्रवासाची रंजक कहाणी सांगणारा प्रवास...
"आचार्य अत्रे हे नेहमी म्हणत ‘दहा हजार वर्षांत असा कार्यक्रम झाला नाही, किंवा दहा हजार वर्षांत असा वक्ता झाला नाही.’ त्याचप्रमाणे, दहा हजार वर्षांत झाला नाही, असा कट्टा आम्हाला तयार करायचा होता. म्हणून आमच्या कट्ट्याला ‘आचार्य अत्रे कट्टा’ हे नाव देण्यात आले”, असे अत्यंत उत्स्फूर्तपणे ठाण्यातील ‘आचार्य अत्रे कट्टा’च्या सभासद आणि लेखिका संपदा वागळे सांगतात. नौपाड्यातील भास्कर कॉलनीत जिजाऊ उद्यान येथे गेली २४ वर्षे, अविरतपणे अत्रे कट्टा नागरिकांना मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे.
स्टेट बँक ऑफ इंडियातील नोकरीतून स्वेच्छानिवृत्ती स्वीकारून, सामाजिक कार्यात स्वतःला झोकून देणारे ठाण्यातील एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व म्हणजे लेखिका आणि वक्त्या संपदा सीताराम वागळे. बीएस्सीपर्यंत शिक्षण घेतलेल्या संपदा वागळे यांनी, स्टेट बँकेत २६ वर्षे नेटाने नोकरी केली. सेवेत असताना त्या अनेक पुरस्कारांच्या मानकरीही ठरल्या. स्टेट बँकेत ग्राहक सेवा व डिपॉझिटस् आणल्याबद्दल त्यांना चांदीची ढाल देऊन गौरविण्यात आले. मात्र, मार्च २००१ मध्ये बँक कर्मचार्यांसाठी स्वेच्छानिवृत्तीची सवलत घोषित झाली. त्यावेळी संपदा वागळे यांच्यासह ठाण्यातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वेगवगेळ्या शाखांतील ३०-३५ जणींनी स्वेच्छानिवृत्ती घेण्याचे ठरविले. यामागे प्रत्येकीचा हेतू कुटुंबाला वेळ देणे, स्वतःचे छंद जपणे हा होता. दि. १ एप्रिल २००१ या दिवशी संपदा वागळे यांच्यासह ३० जणींचा निरोपसमारंभ झाला. हा कार्यक्रम सगळ्यांनी एकत्र जमून जल्लोषात साजरा केला. त्यावेळी प्रत्येकीने आपले छंद सांगितले. पुढे काय करणार याचे मनसुबेही सांगितले. घरी येऊन संपदाताईंनी त्यावर एक लेख लिहिला, आणि प्रकाशित करण्यासाठी ‘लोकसत्ता’ या वृत्तपत्राला पाठविला. लेखनकौशल्यामुळे हा लेख थेट ‘चतुरंग’ या विशेष पुरवणीत छापून आला. तेव्हा संपदाताईंना विश्वास वाटला की, ‘आपल्याला लेखन जमू शकते.’ याच वृत्तपत्रात त्यांना सदर लिहिण्याची संधी मिळाली. संपदाताईंनी नित्यनेमाने ही सदरे लिहिली. याच सदरांतील लेखनावर आधारित संपदा वागळे यांची, तीन पुस्तके प्रकाशित झाली. कालांतराने जीवनकथा लिहिणार्यांनी संपदाताईंना शब्दांकनाची संधी दिली. अशी सर्वमिळून संपदाताईंची आत्तापर्यंत, नऊ पुस्तके प्रकशित झाली आहे.
ठाण्यातील अत्रे कट्ट्याचा प्रवासही तितकाच रंजक आहे. अत्रे कट्टा सुरू करण्याची संकल्पना संपदा वागळे आणि त्यांच्या मैत्रिणीच्या डोक्यात आली. आणि दि. २५ एप्रिल २००१ मध्ये अत्रे कट्ट्याची मुहुर्तमेढ रोवली गेली. आज या कट्ट्याने २४ वर्षे पूर्ण केली आहेत. आजपर्यंत अत्रे कट्ट्यावर २ हजार, ३०० हून अधिक कार्यक्रम झाले. २००१ मध्ये कट्टा सुरू करताना या कट्ट्याचे स्वरूप भविष्यात इतके व्यापक होईल असे संपदा वागळे यांना वाटलेही नव्हते. संपदाताईंच्या लेखनातून निर्माण झालेल्या ऋणानुबंधामुळे, अनेक दिग्गज संपदाताईंच्या एका हाकेवर कट्ट्यात सहभागी होतात. वृत्तपत्रात ‘घर दोघांचं’ या सदरात , संपदाताई नामवंतांच्या घराविषयी आणि कौटुंबिक जिव्हाळ्याविषयी लेखन करत असत. त्यामुळे आपसूकच त्यांच्या घरी भेट देत, विश्वास आणि जिव्हाळ्याचा एक बंध निर्माण झाला. अहमदनगरमधील माऊली सामाजिक संस्था, कुपोषण आणि बालमृत्यूवर काम करणारी ‘शबरी सेवा समिती’, पारधी समाजासाठी काम करणारी श्रीगोंद्यातील ‘बाबा आमटे महामानव संस्था’, या सर्व संस्थांविषयी संपदाताईंनी नुसतेच लिहिले नाही तर, संस्थाचालकांना कट्ट्यावर आमंत्रितही केले. यामुळे लोकांना ही माणसे आणि त्यांचे महान कर्तृत्व प्रत्यक्ष कळले.
या कट्ट्यावर मान्यवरांना ऐकण्याची आणि श्रोत्यांना बोलण्याची संधी मिळते, हे या कट्ट्याचे वैशिष्ट्य आहे. संपदाताई म्हणतात, सर्वसामान्य नागरिक कार्यक्रमांत फक्त श्रोते असतात. त्यांना बोलण्याची संधी मिळत नाही. त्यामुळे पहिला अर्धा तास हा आलेल्या श्रोत्यांसाठी आणि नंतरचा एक तास हा मान्यवरांना बोलण्यासाठी असतो. त्यातूनच ‘कोणीही कोणाशीही बोला’ हे या अत्रे कट्ट्याचे ब्रीदवाक्य ठरले. बुधवारी ६ ते ७.३० ही कट्ट्याची वेळ असते. कार्यक्रमांच्या वैविध्यामुळे या कट्ट्याला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळू लागला. या कट्ट्यावर केवळ दिग्गजच नाहीत, तर वेगवेगळ्या क्षेत्रातील महिला येऊन गेल्या आहेत. संपदा वागळे या लेखिका असण्यासोबतच उत्तम वक्त्यादेखील आहेत. अनेक सामाजिक संस्थांचे कार्य अवाक् करणारे असते. या संस्थांची कामे, ग्रामीण घटकांच्या समस्या, खेड्यात आलेल्या अनुभवांचे कथन संपदा वागळे आपल्या कार्यक्रमातून करतात. आजपर्यंत त्यांचे विविध विषयांवरील संवादाचे २५० हून अधिक कार्यक्रम झाले आहेत.
अशा सामाजिक भान जपणार्या संपदा वागळे यांना गेल्यावर्षी ‘ठाणे गौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या पुस्तकांना आणि लेखन साहित्यालाही, राज्यभरातून विविध सन्मानांनी गौरविण्यात आले आहे. २४ वर्षे अविरतपणे, अत्रे कट्ट्याच्या माध्यमातून नागरिकांना खुले व्यासपीठ निर्माण करून देणार्या या टीमला आता तरुण कार्यकर्त्यांची आवश्यकता आहे. ‘आज आम्ही सर्व अत्रे कट्टा चालविणारे वयाच्या साठीत आणि सत्तरीकडे प्रवास करत आहोत. कट्टा हा आमच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. मात्र आता तरुणांनी समोर येत या कट्ट्याची जबाबदारी घ्यावी, असे आम्हाला मनापासून वाटत आहे. आम्ही अत्यंत मेहनतीने उभारलेला हा सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रम अविरतपणे सुरू राहावा, हीच आमची मनीषा आहे,’ असे संपदा वागळे अत्यंत भावूकपणे सांगतात. अशा लेखिका, वक्त्या आणि सामाजिक भान असणार्या संपदा वागळे, यांच्या कार्याला दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या अनेकानेक शुभेच्छा!