‘शूरा मी वंदिले’

31 Aug 2024 21:52:38
shura mi vandile bravery story


‘तुजसाठी मरण ते जनन, तुजविन जनन ते मरण’ या न्यायाने भारतीय सैन्य कायमच धीरोदात्त पद्धतीने मातृभूमीची सेवा करत असते. ही सेवा करताना भारतीय सैन्यातील असंख्य वीर हे सर्वस्वाचे दान मातृभूमीस करतात. अशा अनेक अनाम वीरांच्या बलिदानाने भारताचे स्वातंत्र्य दीर्घायू होत असते. मात्र, काळाच्या ओघात या वीरांचे विस्मरण जनतेस होत असते. अशाच एका पार्थपराक्रमी सेकंड लेफ्टनंट विष्णू आठल्ये यांच्या वीरश्रीयुक्त हौतात्म्याचे कथन असणार्‍या पुस्तकाचे केलेले हे परीक्षण.

'शूरा मी वंदिले’ हे 1962 च्या भारत-चीन युद्धातील वीरगतीप्राप्त सेकंड लेफ्टनंट विष्णू आठल्ये यांची शौर्यगाथा आहे. या पुस्तकाची संकल्पना विष्णू आठल्ये यांच्या भगिनी सुधाताई आठल्ये-नाटेकर यांची आहे. याकामी सुधाताईंना अत्यंत महत्त्वाचा पाठिंबा दिला तो, त्यांचे पती डॉक्टर श्रीनिवास नाटेकर यांनी. पुस्तकाचे संकलन आणि लेखन सतीश अंभईकर यांनी केले आहे.

1962 मध्ये भारतीय सैन्याने 20 हजारहून अधिक चिनी सैनिकांना, 37 किलोमीटर लांब किबितु - वालोंग या लोहित नदीच्या खोर्‍यामध्ये 22 दिवस रोखून ठेवले होते. नंतर, वालोंगपासून मागे सैन्याचा संपर्क तुटला. त्यामुळे सैन्याला तोफखाना, दारूगोळा, अन्न, पाणी, हिवाळ्यामधील कपडे, बूट यांची तीव्र टंचाई निर्माण झाली. असे असतानासुद्धा भारतीय सैन्याने वीरश्रीच्या सगळ्या मर्यादा ओलांडल्या होत्या.

1962 च्या इतिहासातील सर्वात भीषण लढाई याच ठिकाणी झाली होती. याच स्थळी सेकंड लेफ्टनंट विष्णू आठल्ये चिनी सैन्याशी झालेल्या लढाईमध्ये, पराक्रमाची असीम शर्थ आणि सर्वोच्च त्याग करत धारातीर्थी पडले.

‘शूरा मी वंदिले’ या पुस्तकाचे लेखक सतीश अंभईकर हे दीर्घकाळ अकोल्याचे रहिवासी होते. अकोला, जठारपेठ भागात, जिथे सेकंड लेफ्टनंट विष्णू आठल्ये राहिले होते, त्या घराजवळच त्यांचे वास्तव्य होते.

केवळ 21 वर्षांचे अल्पजीवन लाभलेल्या अकोल्यातील सेकंड लेफ्टनंट विष्णू आठल्ये या वीरपुरुषाचा इतिहास पुढील पिढीला कळावा, अशी इच्छा सतीश अंभईकर, नाटेकर, आठल्ये कुटुंबीय यांना वाटू लागली. गेली 62 वर्षे विस्मृतीत गेलेल्या शूर योद्ध्यांविषयी माहिती संकलन करताना, सतीश अंभईकरांनी प्रचंड प्रयत्न केले. लढाईमध्ये जे घडले त्याची जास्तीतजास्त माहिती पुराव्यांनिशी गोळा करताना त्यांनी, जीवाचे रान केले. आठल्ये, नाटेकर कुटुंबीयांतील सैन्यामध्ये कार्यरत असलेल्या, आणि निवृत्त झालेल्या सैनिकी अधिकार्‍यांकडून त्यांना माहिती प्राप्त झाली. म्हणूनच, सहा दशकांनंतर हे पुस्तक प्रकाशित करता आले.


तरुणाईच्या मनात शौर्य आणि अत्युच्च त्यागाची जोपासना

भगवद्गीतेवर श्रद्धा ठेवून, विष्णू आठल्येंनी रणक्षेत्रावर आपल्या कर्तव्यांचे पालन केले. लढाईत त्यांना वीरगती प्राप्त झाली, तेव्हा ते 21 वर्षांचे होते. विष्णूसारखा एक योद्धा अल्पायुष्यात स्वतःच्या शौर्याचा आदर्श मागे ठेवून गेला. सेकंड लेफ्टनंट विष्णू आठल्ये यांचे राष्ट्ररक्षणासाठी अर्पण केलेले जीवन, प्रत्येक सुजाण भारतीय नागरिकांच्या मनात तसेच, आयुष्यात शौर्य आणि अत्युच्च त्यागाची जोपासना करण्याकरिता समर्थ ठरेल.

विष्णू आठल्ये यांनी आपले शालेय शिक्षण अकोल्यामध्ये पूर्ण केले, आणि पुणे येथील फर्ग्युसन कॉलेजला शिकत असताना त्यांनी, खडकवासल्याची नॅशनल डिफेन्स अकॅडमी अर्थात एनडीएची परीक्षा पास केली. पहिल्याच प्रयत्नामध्ये ते एनडीएची कठीण परीक्षा पास करू शकले, यावरून ते किती हुशार होते हे कळते. 1957 मध्ये एनडीएमध्ये प्रवेश केला, आणि पुढील तीन वर्षे त्यांनी एनडीएमध्ये कठोर प्रशिक्षण घेतले.

त्यानंतर एक वर्षाकरिता ते इंडियन मिलिटरी अकॅडमी अर्थात आयएमए डेहराडून येथे गेले. 1961 साली आयएमए डेहराडूनमधून उत्तीर्ण झाल्यानंतर, त्यांनी भारतीय सैन्याच्या तोफखाना विभागामध्ये ’कमिशन’ मिळवले. एनडीए, आयएमएमध्ये त्यांची कामगिरी उत्कृष्ट दर्जाचीच होती.

‘यंग ऑफिसर्स कोर्स’ करण्याकरिता ते ‘स्कूल ऑफ आर्टिलरी, देवळाली’ येथे गेले. येथे तोफखाना विभागाचे प्रशिक्षण दिले जाते. स्कूल ऑफ आर्टिलरी, देवळाली येथे तोफखाना प्रशिक्षणासाठी सर्वोत्कृष्ट तरुण अधिकार्‍याला देण्यात येणारी, ’सिल्व्हर गन’ त्यांना प्रदान करण्यात आली. यावरून त्यांच्या युद्धकौशल्याची कल्पना यावी.

गोवा मुक्ती संग्राम लढाईत विष्णू आठल्ये यांचा सहभाग -

नोव्हेंबर 1961 मध्ये भारतीय सैन्याला गोवा मुक्ती संग्राम या मोहिमेवर पाठवण्यात आले. भारतीय सैन्याने केलेल्या ‘ऑपरेशन विजय’मध्ये, चार दिवसांत गोवा भारताचा भाग बनला. या लढाईत विष्णू आठल्ये यांचा सहभाग होता. या मोहिमेत भारताच्या एकूण 34 सैनिकांनी आपल्या प्राणांचे बलिदान केले, आणि 51 जखमी झाले; 4 हजार 669 सैनिकांच्या आत्मसमर्पणासहित पोर्तुगीजांच्या बाजूने 31 सैनिक ठार आणि 57 जखमी झाले.
गोवा मुक्ती संग्रामानंतर ते पॅरा ट्रेनिंग म्हणजे, हवाई छत्रीधारी सैनिकाचे प्रशिक्षण घेण्याकरिता आग्रा येथे आले. या सरावात सैनिक विमानातून शत्रूच्या प्रदेशावर उडी मारतात, आणि लढाईत लढतात. हे अत्यंत कठीण प्रशिक्षण होते. त्यांचे पोस्टिंग 17 पॅराफिल्ड रेजिमेंट येथे करण्यात आले.

1962 च्या युद्धामध्ये 17 पॅराफिल्ड रेजिमेंटला अरुणाचल प्रदेशमध्ये आणण्यात आले. त्यानंतर सुरू झाली, ती वालोंगची लढाई.
वालोंग : 1962 च्या भारत-चीन युद्धातील भारतीय लष्कराच्या शौर्याचे प्रतीक

अरुणाचल प्रदेशातील लोहित खोर्‍यातील, लोहित नदीच्या काठावर वसलेले वालोंग हे भारतातील सर्वात पूर्वेकडील शहर आहे. वालोंग हे 1962 च्या युद्धातील सर्वात भीषण संघर्षाचे ठिकाण बनले. येथे, भारतीय लष्कराच्या 11 व्या पायदळ ब्रिगेडला चिनी सैन्याचा सामना करावा लागला.

लेफ्टनंट विष्णू आठल्ये यांच्या बॅटरीने युद्धादरम्यान महत्त्वपूर्ण तोफखाना मदत केली. यावेळी 20 हजार चिनी सैन्याने लाटेमागून लाटेवर हल्ले करत असतानाही, भारतीय सैनिक विलक्षण धैर्याने लढले. निकृष्ट उपकरणे, तशीच शस्त्रास्त्रे आणि दारूगोळ्याची तीव्र टंचाई असूनही ते धैर्याने उभे राहिले.

या लढाईत 642 भारतीय सैनिक आणि 752 चिनी सैनिक मारले गेले. तथापि, भारतीय सैन्याने केलेल्या प्रतिकारामुळे, चिनी सैन्याला सुमारे 20 दिवस उशीर झाला, ज्यामुळे आसामच्या मैदानी प्रदेशाकडे जाण्याच्या त्यांच्या योजनांना खीळ बसली.
भारतीय सैनिकांच्या शौर्याची कबुली

वालोंग येथे भारतीय सैनिकांनी त्यांच्या राष्ट्राचा, लष्कराचा आणि त्यांच्या रेजिमेंटचा सन्मान राखला. 1962 च्या युद्धानंतर लिहिल्या गेलेल्या चिनी सैन्याच्या युद्ध इतिहासामध्ये, भारतीय सैनिकांच्या शौर्याची कबुली दिली आहे.

जानेवारी 1963 मध्ये अमेरिकेच्या टाईम मासिकाने वालोंग येथे लढलेल्या, भारतीय सैन्याला श्रद्धांजली वाहताना असे म्हटले की, वालोंग येथे भारतीय सैन्याकडे सर्व गोष्टींची कमतरता होती,मात्र त्यांच्याकडे शौर्य, धैर्य, हिंमत, लढाऊ वृत्ती यांची अजिबात कमी नव्हती, ज्यामुळे त्यांनी चिनी सैन्याचा मुकाबला केला.

या लढाईतील हुतात्म्यांचे स्मरण केले पाहिजे, आणि त्यांच्या सर्वोच्च बलिदानाचा सन्मान केला पाहिजे.

त्यातूनच तरुण पिढीला नक्कीच प्रोत्साहन मिळेल

1962 च्या चीन-भारत युद्धामध्ये आपल्या शौर्याने आणि मातृभूमीच्या रक्षणार्थ दिलेल्या बलिदानाने, भारतमातेचा सुपुत्र असलेल्या सेकंड लेफ्टनंट विष्णू आठल्ये यांनी, नेफा आघाडीवर वालोंग क्षेत्रात झालेल्या भीषण रणसंग्रामात, आपले नाव भारताच्या युद्ध इतिहासात कायमचे कोरून ठेवले आहे. परंतु, पुढील 62 वर्षे ते विस्मृतीत गेले होते. सतीश अंभईकर यांनी विष्णू आठल्ये यांच्या सैनिकी कर्तृत्वाचा शोध घेण्याचा प्रयत्न या पुस्तकात केला आहे. त्याबाबतची अप्रकाशित, विखुरलेली माहिती संकलित करून, हे लेखन त्यांनी केले. वाचकांना हे पुस्तक स्फूर्तिदायी वाटावे हीच त्यांची, नाटेकर, आठल्ये कुटुंबीय आणि इतर नातेवाईक यांची इच्छा आहे.

तरुण पिढीला 1962 च्या युद्धामधील महापराक्रम कळावा, आणि त्यापासून प्रोत्साहन घेऊन त्यांनी सैन्यात सामील व्हावे, किंवा देशभक्त नागरिक म्हणून इतर क्षेत्रांमध्ये काम करावे, हीच इच्छा आहे. यामुळे महाराष्ट्रातील अनेक शाळा-महाविद्यालयांना हे पुस्तक नाटेकर, आठल्ये कुटुंबीयांकडून, विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. आशा करूया यामुळे तरुण पिढीला नक्कीच प्रोत्साहन मिळेल, आणि ते देशभक्त नागरिक बनण्याचा प्रयत्न करतील.

सेकंड लेफ्टनंट विष्णू आठल्ये यांचे नाव, राष्ट्रीय युद्ध स्मारक नवी दिल्ली, युद्ध स्मारक पुणे, तवांग आणि वालोंग, अरुणाचल प्रदेश येथील युद्ध स्मारकात कोरण्यात आले आहे.

मातृभूमीच्या रक्षणार्थ, शौर्याने लढून तिच्या चरणी प्राणाचे बलिदान करणार्‍या, भारतीय सेनादलातील शूरवीर योद्ध्यांना हे पुस्तक कृतज्ञतापूर्वक समर्पित करण्यात आलेले आहे. या वीर जवानांना ईश्वर सद्गती प्रदान करो.

(नि.) ब्रि. हेमंत महाजन
Powered By Sangraha 9.0