नवी दिल्ली : महिलांवरील अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये जितका जलद न्याय मिळेल तितकी निम्मी लोकसंख्या त्यांच्या सुरक्षिततेबद्दल अधिक आत्मविश्वास बाळगेल, असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जिल्हा न्यायपालिकेच्या राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन सत्राला संबोधित करताना केले आहे. अत्याचारातील प्रकरणात महिलांविरोधातील गुन्ह्यांमध्ये जलद न्याय मिळावा, असेही ते म्हणाले.
दरम्यान, महिलांविरोधातील गुन्ह्यांच्या प्रकरणांमध्ये जलद न्याय मिळण्याच्या गरजेवर भर देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सांगितले की, यामुळे महिलांमध्ये त्यांच्या सुरक्षेबाबत आत्मविश्वास वाढेल. न्यायपालिका ही राज्यघटनेची रक्षक मानली जाते. तसेच, सर्वोच्च न्यायालय आणि न्यायपालिकेने ही जबाबदारी अतिशय चोखपणे पार पाडल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.
सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या उपस्थितीत जिल्हा न्यायपालिकेच्या राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन सत्राला संबोधित करताना ते म्हणाले की, देशातील जनतेने सर्वोच्च न्यायालय किंवा न्यायव्यवस्थेवर कधीही अविश्वास दाखवला नाही. आणीबाणी लागू होण्याचा काळ "अंधार" म्हणून वर्णन करताना, पंतप्रधान म्हणाले की मूलभूत अधिकार राखण्यात न्यायपालिकेने महत्त्वपूर्ण भूमिकादेखील बजावली आहे.