मुंबई : उबाठा गटाचे आमदार वैभव नाईक हे पंधरा मिनिटांत घटनास्थळी कसे पोहोचले, असा सवाल भाजप नेते निलेश राणेंनी केला आहे. मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी त्यांनी हा सवाल केला आहे. तसेच यामध्ये वैभव नाईक यांचा हात आहे का? असा सवालही त्यांनी केला.
निलेश राणे म्हणाले की, "ज्या दिवशी महाराजांचा पुतळा कोसळला तेव्हा उबाठा गटाचा आमदार वैभव नाईक हा पंधराव्या मिनिटात घटनास्थळी पोहोचला. आजूबाजूला कसलाही नियोजित कार्यक्रम नसताना आणि राहतं घर हे कणकवली शहरामध्ये जे ५० किलोमीटर लांब आहे, असं असताना घटनास्थळी पंधरा मिनिटात नाईक कसा पोहोचू शकतो?" असा सवाल त्यांनी केला. तसेच जर यातील काही वैभव नाईक याने घडवलं असेल तर आत्ताच बोटीमध्ये बसून दुबई किंवा पाकिस्तानला जायची तयारी त्याने करून ठेवावी, असा इशाराही त्यांनी दिला.
हे वाचलंत का? - काँग्रेसला धक्का! अखेर 'त्या' आमदाराचा राजीनामा
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर सध्या राज्यातील राजकारण चांगलंच तापलं असून विरोधकांकडून राज्य सरकारवर टीका करण्यात येत आहे. या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीचे नेते राजकोट किल्ल्यावर गेले असता तिथे मविआचे कार्यकर्ते आणि खासदार नारायण राणेंच्या कार्यकर्त्यांमध्ये राडाही झाल्याचे पाहायला मिळाले.