वाढवण बंदरावर संपुर्ण जगाचं लक्ष! यामुळे महाराष्ट्राचं आर्थिक चित्र बदलणार : पंतप्रधान नरेंद्र मोदी

30 Aug 2024 16:53:58
 
Modi
 
पालघर : वाढवण बंदरावर संपुर्ण जगाचं लक्ष असून या बंदरामुळे महाराष्ट्राचं आर्थिक चित्र बदलणार आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले. शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते वाढवण बंदर प्रकल्पाचे भूमिपूजन पार पडले. यावेळी ते बोलत होते.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणालो की, "आजचा दिवस हा महाराष्ट्राच्या विकास यात्रेचा एक ऐतिहासिक दिवस आहे. विकसित महाराष्ट्र आणि विकसित भारताच्या संकल्पनेचा हा महत्वपूर्ण भाग आहे. त्यामुळे आमच्या सरकारच्या काळात महाराष्ट्रासाठी अनेक मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. महाराष्ट्राकडे विकासासाठी आवश्यक सामर्थ्य आणि संसाधन दोन्ही आहेत. महाराष्ट्रातील समुद्र किनाऱ्यांशी आंतरराष्ट्रीय व्यापाराचे पूर्वापार संबंध आहेत. इथे भविष्यालील अपार संधी आहेत. महाराष्ट्राला आणि देशाला या संधींचा पुरेपूर फायदा मिळण्यासाठी आज वाढवण बंदराची निर्मिती करण्यात आली आहे. या बंदरावर ७६ हजार कोटींपेक्षा जास्त रुपये खर्च होणार आहे. हा देशातील सर्वात मोठा कंटेनर पोर्ट असेल. हे जगातील सर्वात मोठ्या बंदरांपैकी एक महत्वपूर्ण बंदर असेल. आज देशातील सर्वच कंटेनर पोर्टवरून जेवढे कंटेनर येतात आणि जातात त्यापेक्षाही जास्त कंटेनरचे काम वाढवण बंदरावर होणार आहे."
 
"हे बंदर महाराष्ट्र आणि देशाच्या व्यापाराचे तसेच औद्योगिक प्रगतीचे मोठे केंद्र बनेल. आजपर्यंत या भागाची ओळख प्राचिन बंदरांमुळे व्हायची. परंतू, यापुढे या आधुनिक बंदरांमुळेही या भागाची ओळख होणार आहे. गेल्या एका दशकात भारताच्या सागरी तटावर विकासाला अभूतपूर्व गती मिळाली आहे. आम्ही बंदरे आधुनिक केलीत, जलमार्ग विकसित केले. भारतात जहाजनिर्मिती व्हावी आणि इथल्या लोकांना रोजगार मिळावा, यावर सरकारने जोर दिला आहे. आज त्याचे परिणामही दिसत आहे," असे ते म्हणाले.
 
ते पुढे म्हणाले की, "आज वाढवण बंदरावर संपुर्ण जगाचं लक्ष आहे. जगात वाढवण पोर्टची बरोबरी करणारे खूप कमी बंदरं आहेत. या बंदरावर हजारों जहाजे आणि कंटेनर येतील. या संपूर्ण क्षेत्राचे आर्थिक चित्र बदलून जाईल. या बंदरामुळे अनेक नवनवे व्यापार इथे सुरु होतील. महाराष्ट्राचा विकास ही माझी सर्वात मोठी प्राथमिकता आहे. आज भारताच्या प्रगतीमध्ये महाराष्ट्र सर्वात मोठी भूमिका निभावत आहेत," असेही ते म्हणाले.
 
विरोधी पक्षांनी महाराष्ट्राच्या विकासाला ब्रेक लावला!
 
"महाराष्ट्रातील विरोधी पक्षांनी तुमच्या विकासावर कायमच ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला. अनेक वर्षांपासून आपल्या देशाला एका आधुनिक पोर्टची गरज होती. महाराष्ट्रातील पालघर हीच यासाठी उपयुक्त जागा आहे. परंतू, ६० वर्षे हा प्रकल्प लटकवला गेला. २०१४ मध्ये तुम्ही आम्हाला दिल्लीत सेवा करण्याची संधी दिली. २०१६ मध्ये जेव्हा देवेंद्र फडणवीसांचं सरकार आलं, तेव्हा त्यांनी गंभीरपणे हे काम सुरू केलं. २०२० मध्ये बंदर बनवण्याचा निर्णय घेतला पण त्यानंतर सरकार बदललं आणि अडीच वर्ष याठिकाणी कोणतंही काम झालं नाही," अशी टीका पंतप्रधान मोदींनी केली.
 
"या प्रकल्पामुळे इथे जवळपास १२ लाख रोजगाराच्या संधी मिळणार आहेत. महाराष्ट्राच्या विकासाला ब्रेक लावणारे हे लोक कोण होते? आधीच्या सरकारने हे काम पुढे का जाऊ दिलं नाही? महाराष्ट्रातील जनतेने ही गोष्ट कधीच विसरू नये. काही लोकांना महाराष्ट्राला मागे ठेवायचं आहे. पण आमच्या महायूती सरकारला महाराष्ट्राला देशात सर्वात पुढे न्यायचं आहे," असेही ते यावेळी म्हणाले.
 
 
Powered By Sangraha 9.0