सृजनशील अवलिया

30 Aug 2024 21:03:52


Artist Sebestian Joseph 
आपल्या कलेतून सर्जनशीलतेचा आविष्कार घडविणारे चित्रकार सेबेस्टिन जोसेफ यांच्याविषयी...
 
व्यक्ती तितक्या प्रकृती’ असे म्हणतात. अशा सगळ्या प्रकृती एकाच व्यक्तीमध्ये असणारा अवलिया ठाण्यात आहे. आपल्यातील कलागुणांची पोटापुरतीच जाण असलेले अवलिया, सेबेस्टिन जोसेफ यांचा जन्म केरळ राज्यातील कोचीन एडापल्ली येथे १९५६ साली झाला. वडील भारतीय संरक्षण दलात, तर मोठा भाऊ चित्रपटक्षेत्रात कार्यरत. सेबेस्टिन यांना लहानपणापासून चित्रकलेची आवड. प्रत्येकात एक ’कलाकार’ दडलेला असतो. त्याच्यातील अंगभूत कला-गुणांचा विकास करायची संधी मिळाली की, कलेला आकार मिळून एक कलाकार तयार होतो. सेबेस्टिन यांनी जेमतेम दहावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर पुढे राजा रविवर्मा आर्ट महाविद्यालयात तीन वर्षांचा आर्ट डिप्लोमा केला. चित्रकलेचा डिप्लोमा केल्यानंतर सेबेस्टीन रोजगाराच्या शोधात घराबाहेर पडले. अंगी चित्रकलेचे प्रावीण्य असतानाही त्यांना चेन्नईतील ‘एव्हीएम प्रॉडक्शन’च्या स्टुडिओमध्ये चित्रीकरण तंत्राचे काम मिळाले.
 
स्टुडिओत अनेक चित्रपटांसाठी सेट उभारताना त्यांनी आपले कसब पणाला लावले. एकदा तर ‘डमी हेलिकॉप्टर’ बनवून रजनीकांत, चिरंजीवी अशा नामवंत कलाकारांसोबत ‘स्टुडिओ आर्टिस्ट’ म्हणून १५ वर्षे काम केले. पुढे हैदराबाद येथील रामोजी फिल्म स्टुडिओतही काम केले. परंतु, इनडोअर चित्रीकरण बंद पडून आऊटडोअर चित्रीकरण सुरू झाल्याने ही नोकरी सोडून सेबेस्टिन, केरळमध्ये ‘व्हीनस सर्कस’मध्ये साईन बोर्ड व आर्ट वर्क करण्याच्या कामाला लागले. ते साल १९९० होते. रंग कुंचल्याच्या अदाकारीसोबतच सेबेस्टिन सर्कसमध्ये सायकल, दुचाकीवरील कसरती करायला शिकले. सर्कसमध्ये तेव्हा प्रति-शो १६० रुपये मेहनताना मिळे. दिवसाला तीन शो मधून बर्‍यापैकी आमदनी होत असे. पाच वर्षे आयुष्याची सर्कस अनुभवल्यानंतर केरळमधीलच वाद्यवृंदांच्या वेगवेगळ्या ऑर्केस्ट्रामध्ये ‘मिमिक्री आर्टिस्ट’ म्हणून सेबेस्टिन काम करू लागले. दाक्षिणात्य कलाकारांचे हुबेहूब आवाज काढणे, तबला, ड्रम, केरळचे तालवाद्य चेंदा मेलम आदी वाद्ये वाजवण्यासह डिस्को नृत्यही ते करू लागले.
 
दरम्यान, कोविड काळात सगळे जगच ठप्प झाले. त्याचा फटका सेबेस्टिन यांनाही बसला. हाती रोजगार उरला नसला तरी आधीच्या कामांची थोडीबहुत जमापुंजी खिशात होती. द्रविडी स्पर्श असलेल्या मल्याळम भाषेसोबत तोडकीमोडकी इंग्रजी भाषा ज्ञात होती. त्यामुळे अन्य राज्यांत कुठेही नोकरी मिळण्याची आशा नव्हती, अंगात चित्रकला भिनलेली असल्याने ‘कोविड’च्या संक्रमण शिबिरात जाऊन तेथील रुग्णांची तसेच, कर्मचार्‍यांची स्केचेस काढू लागले. या स्केचेसचा मोबदला म्हणून कुणी ५०, १०० रुपये द्यायचे, अनेकदा तर काही गरजू सेबेस्टिनकडूनच पैसे घेऊन जायचे.
 
केरळमध्ये डाळ शिजेना म्हणून मग रेल्वे पकडून त्यांनी थेट गोवा गाठले. तेथेही समुद्रावरील पर्यटकांचे स्केचेस काढून गुजराण होत होती. तिथे थोडीबहुत हिंदी भाषा अवगत केली. दरम्यानच्या काळात ठाण्यातील काही पर्यटक गोव्यात गेले होते. त्यांनी, सेबेस्टिनकडून पेन्सिल वर्कची स्केचेस काढली आणि सेबेस्टिनची ही कला हेरून त्यांना ठाण्यात आणले. ठाण्यातील निसर्गरम्य येऊरमधील एका मोठ्या हॉटेलच्या प्रांगणात चित्रे काढण्यासाठी बोलावून घेतले. याठिकाणी ताजमहाल, निसर्ग, प्राणी, पक्षी अशी चित्रे काढली. तैलचित्र, निसर्गचित्र, व्यक्तिचित्र, पेन्सिल वर्क अशी असंख्य चित्रे रेखाटून भिंती जिवंत केल्या. त्यांच्या या चित्रांची अनेकांनी प्रशंसा केली. रंगांच्या दुनियेत एक वर्ष त्यांनी येऊरमध्ये काढले. नंतर, मुंबईत गेटवे ऑफ इंडिया येथे पदपथावर हजारो पर्यटकांची स्केचेस काढली. दिवसा मुंबईत अन् रात्री ठाण्यात हा प्रवास सुरू असताना सेबेस्टिनच्या चित्रकलेची ख्याती सर्वदूर पसरली आणि त्यांना ठाणे महापालिकेअंतर्गत शहरभर सुरू असलेल्या रंगरंगोटी आणि विविध चित्रे काढण्याची संधी उपलब्ध झाली.
 
निसर्ग एक स्वतः अद्भुत चित्रकार असला तरी वास्तवात ही चित्रं रेखाटणारा विरळाच म्हणावा. असाच हा आगळा चित्रकार सध्या ठाणेकरांची मने जिंकत आहे. केरळच्या या चित्रकाराची शैली सर्वांना थक्क करणारी असून, ज्या पद्धतीत हवी त्या शैलीत ते चित्रे रेखाटतात, ठाणे शहराचा मानबिंदू म्हणून ओळखल्या जाणार्‍या सॅटिस पुलाखाली निसर्गाची वेगळी नजाकत बघायला मिळते. समुद्रातील विविध माशांची बोलकी जैवविविधता चित्रकार सेबेस्टिन जोसेफ या चित्रकाराच्या कुंचल्यातून चितारली आहेत. त्यात शार्क, डॉल्फिन, कासव, अशी विविध चित्रे त्यांनी रेखाटली आहेत. मोठी भिंत आणि छतावर चित्र काढताना चित्रकारांची खरी कसोटी लागते. निसर्गसंपन्न ठाणे शहराची छबी चित्ररूपाने रेखाटताना सेबेस्टिन यांनी आपला जीव ओतल्याचे दिसते. यामुळे स्मार्ट ठाण्याला एक वेगळा लूक मिळून ठाणेकरांना सॅटिसखाली समुद्री सफर घडवल्याची अनुभूती या चित्रांमुळे येते, असे ते सांगतात.
 
चित्रकलेसोबत सेबेस्टिन यांना गायन, नृत्य, वाद्य वाजवण्याचा छंद आहे. मनी कुठलीही महत्त्वाकांक्षा नसली तरी जोवर हात चालतील, तोवर कलेची उपासना करीत राहायचे आहे. समाजसेवेची आवड असल्याने नेहमीच गरीब आणि गरजूंना मदत करण्यासाठी पुढाकार घेणार्‍या सेबेस्टिन यांना दोन अनाथ मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याचा मानस आहे. अशी दैवी देणगी लाभलेले सेबेस्टिन यांना आपल्या कलेतून होणारी आमदनी स्वत:सह इतरांसाठी खर्च करण्याची त्यांची वृत्ती इतरांसाठी प्रेरणादायी आहे. केरळ राज्याच्या चित्ररथात योगदान दिल्याबद्दल सेबेस्टिन यांना तत्कालीन राष्ट्रपती भारतरत्न अब्दुल कलाम आझाद यांच्या हस्ते ५० हजारांचे पारितोषिक मिळाल्याचे ते सांगतात. अशा या हरहुन्नरी चित्रकाराला भावी वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या मनःपूर्वक शुभेच्छा!
 
 
Powered By Sangraha 9.0