काही दिवसांपूर्वी शरद पवार गटाचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केले होते. हे प्रकरण ताजं असतानाच आता तुरुंगात असलेले बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझे यांनी १०० कोटी रुपये वसूलीप्रकरणात अनिल देशमुखांबाबत मोठा गौप्यस्फोट केलाय. त्यांनी याबाबत फडणवीसांना एक पत्रही लिहिल्याचं सांगितलंय. सचिन वाझेंच्या या गौप्यस्फोटानंतर आता अनिल देशमुखांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जातीये. सचिन वाझेंनी अनिल देशमुखांवर नेमके कोणते आरोप केलेत? देवेंद्र फडणवीसांना लिहिलेल्या पत्रात सचिन वाझेंचं म्हणणं काय? आणि या आरोपांमुळे अनिल देशमुख कोंडीत सापडणार का? या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया.
उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अनिल परब आणि अजित पवार यांना अडचणीत आणण्यासाठी फडणवीसांनी आपल्याला एका प्रतिज्ञापत्रावर सही करायला सांगितलं होतं. शिवाय असं केल्यास शंभर कोटी रुपये वसूली प्रकरणात ईडीच्या आरोपांतून तुमची सुटका होईल, अशी ऑफर फडणवीसांकडून आपल्याला देण्यात आली होती. पण मी ती स्विकारली नाही. त्यामुळे ईडी, सीबीआयला पुढे करुन त्यांनी माझ्यावर कारवाई केली, असा दावा अनिल देशमुखांनी केला होता. या संपूर्ण प्रकरणामुळे राज्याचं राजकारण चांगलंच तापलं होतं. अनिल देशमुखांना तीन वर्षांनंतर आताच का जाग आली? असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला. मात्र, महाविकास आघाडीच्या कोणत्याही नेत्याने यावर थेट बोलणं टाळत मौन बाळगलंय. त्यामुळे राजकीय लालसेपोटी टाकलेला हा डाव असल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या.
हे प्रकरण ताजं असतानाच आता १०० कोटी रुपये वसूली प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन वाझे यांनी अनिल देशमुखांवर गंभीर आरोप केलेत. "अनिल देशमुख हे त्यांच्या पीएच्या माध्यमातून पैसे घेत होते. सीबीआयकडे याबद्दलचे सगळे पुरावे आहेत. याबद्दल मी फडणवीसांना पत्र लिहिलं आहे. त्यात जयंत पाटील यांचंही नाव लिहिलं आहे. मी नार्को टेस्ट करण्यासाठी कधीही तयार आहे," असा दावा सचिन वाझेंनी केलाय. वैद्यकीय चाचणीसाठी नेत असताना वाझेंनी माध्यमांना ही माहिती दिलीये. या आरोपांनंतर अनिल देशमुखांनी पत्रकार परिषद घेतली आणि ही फडणवीसांची नवी चाल असल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, "सचिन वाझे हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा व्यक्ती आहे. त्यामुळे त्याच्या वक्तव्यावर विश्वास ठेवता येणार नाही, असं मुंबई उच्च न्यायालयाने सांगितलंय. या सचिन वाझेला हाताशी धरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माझ्यावर आरोप करत आहेत, असं देशमुखांनी म्हटलंय.
२०२१ मध्ये उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटेलिया निवासस्थानाबाहेर स्कॉर्पिओ गाडीत जिलेटीन स्फोटकाच्या कांड्या आढळल्या होत्या. तसेच या गाडीचा मालक मनसूख हिरेनचा अचानक मृत्यू झाल्यामुळे सचिन वाझेंना अटक करण्यात आली होती. तर दुसरीकडे, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी मार्च २०२१ मध्ये माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलीसांना मुंबईतील हॉटेल्स आणि बारमालकांमार्फत दरमहा शंभर कोटी रुपयांच्या वसुलीचे टार्गेट दिल्याचा आरोप केला होता. त्यानंतर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग करण्यात आला होता. या तपासात देशमुख आणि त्यांच्या साथीदारांनी सत्तेचा गैरफायदा घेतल्याचा ठपका ठेवत चार्जशीट दाखल केले होते. याच प्रकरणात देशमुखांविरोधात मनी लाँण्ड्रींगचा गुन्हाही दाखल करण्यात आला होता. त्यानंतर नोव्हेंबर २०२१ मध्ये अनिल देशमुखांना अटक करण्यात आली. जवळपास १३ महिने तुरुंगात राहिल्यानंतर ते सध्या जामीनावर बाहेर आहेत.
तर दुसरीकडे, सचिन वाझे हे सध्या आर्थर रोड तुरुंगात आहेत. सचिन वाझेंनी केलेल्या आरोपांमुळे अनिल देशमुखांची चांगलीच कोंडी झाल्याचं दिसतंय. मुळात अनिल देशमुखांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर केलेल्या आरोपांवर महाविकास आघाडीतील कुठल्याच नेत्याने प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे केवळ राजकीय द्वेषापोटी आणि फेक नरेटिव्ह चालवण्यासाठी देशमुखांनी फडणवीसांवर डाव टाकला होता का? आणि आता हा डाव त्यांच्यावरच उलटलाय का? असा प्रश्न उपस्थित होतोय. सचिन वाझेंनी आपल्या पत्रात आणखी काय काय खुलासे केलेत याबद्दलची माहिती हळूहळू पुढे येईलच. पण सध्या त्यांनी केलेल्या आरोपांमुळे अनिल देशमुखांच्या अडचणी वाढणार का? हे पाहण औत्सुक्याचं ठरेल.