जीवनात ‘राम’ आणणारा राम

29 Aug 2024 20:59:21

Ram Bangad
अवघा एक टक्का लोकांनी जरी रक्तदान केले, तरी आपण एक तृतीयांश जगाचा रक्तपुरवठा करू शकतो, असा आत्मविश्वास बाळगणार्‍या आणि जीवनात ‘राम’ आणणार्‍या राम बांगड यांच्याविषयी...
 
रक्तदान मोठ्या प्रमाणावर व्हावे म्हणून सर्वच पातळ्यांवर व्यापक प्रयत्न केले जातात. अनेक सामाजिक संस्था, इस्पितळे आणि रक्तपेढ्या आपापल्या पातळीवर अशी रक्तदान शिबिरे आयोजित करून आपल्या परिसरात अत्यंत निकडीच्यावेळी रक्ताची उणीव कोणत्याही रुग्णास भासू नये म्हणून रक्त संकलित करण्यासाठी प्रामाणिकपणे कार्यरत आहेत. त्यापैकीच पुण्यातील एक गणमान्य व्यक्तिमत्त्व म्हणजे राम बांगड. आपले संपूर्ण जीवन रक्तदानासाठी समर्पित करणार्‍या राम यांचा या क्षेत्रातील प्रवास जसा अचंबित करणारा आहे, तसाच तो इतरांसाठी प्रेरकदेखील आहे.
 
 
राम बांगड म्हणतात त्यानुसार, रक्तदानाचे महत्त्व आजच्या तरुणाईने लक्षात घेतले तर, आपला देश रक्ताच्याबाबतीत सक्षम तर होईलच; मात्र यामुळे पृथ्वीतलावावरील मानवजातीला कधीही रक्ताअभावी मृत्यूच्या दारात न्यायची वेळ कुणावरही येणार नाही. आजही समाजात रक्तदान करणारे अनेक लोक आहेत. मात्र, बालपणी परोपकाराचे संस्कार रुजवून घेतलेल्या राम बांगड यांनी आपल्या महाविद्यालयीन जीवनापासूनच समाजासाठी आणि विशेषतः देवापेक्षा देशासाठी आपले आयुष्य समर्पित करण्याचा विडा उचलला. ‘बीएससी’पर्यंत शिक्षण झालेल्या राम यांच्यासाठी देश महत्त्वाचा आणि या देशासाठीच आपले अवघे जीवन समर्पित असल्याचे ते नमूद केले.
 
 
मागील ३९ वर्षांपासून ‘बँक ऑफ महाराष्ट्र’मध्ये कार्यरत असलेले राम हे रक्तदान चळवळीत केवळ ‘फोटोसेशन’ आणि ‘इव्हेंट’पुरतेच मर्यादित राहिले नाहीत, तर त्यांनी पुण्यातील प्रसिद्ध अशा श्री शंकर महाराज मठात आजतागायत तब्बल ४० महिन्यांत रक्तदान शिबिरे आयोजित केली. या शिबिरांतून १३ हजार २१० भाविकांनी रक्तदान केले. विशेष म्हणजे, दर महिन्याच्या अष्टमीला रक्तदान शिबीर मठात आयोजित केले जाते. नुकतेच दि. १३ ऑगस्टला घेतलेल्या शिबिरात ३२६ भाविकांनी रक्तदान केले आणि या मठातील ४१ वे रक्तदान शिबीर होते.
 
 
‘श्री सद्गुरू शंकर महाराज समाधी ट्रस्ट- रक्ताचे नाते चॅरिटेबल ट्रस्ट’च्यावतीने नियमित रक्तदान शिबिरे घेतली जातात. दुसर्‍यांनाच रक्तदान करा, असे न सांगता कोरोनाकाळात राम यांनी एकूण १७८ वेळा स्वत: रक्तदान केले. यामध्ये प्लाझ्मा १५ वेळा आणि प्लेटलेट्स २५ वेळा दान केले. आणखी एक उल्लेखनीय बाब म्हणजे, जगात सर्वाधिक (१५ वेळा) प्लाझा देणारा ज्येष्ठ नागरिक म्हणूनही राम बांगड यांची नोंद झाली आहे. कोरोनाकाळात ९०० हून जास्त कोरोना रुग्णांना प्लाझ्मा मिळवून देण्यातही त्यांनी मोलाची भूमिका बजावली. यामुळे अनेकांना नवजीवन मिळाले. चिंचवडमधील मोरया गोसावी समाधी येथेदेखील प्रत्येक चतुर्थीला रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यास राम यांनी प्रारंभ केला. तेथेदेखील १८०० हून अधिक बॅग्ज रक्तदान झाल्याचे ते सांगतात.
 
 
राम सध्या ‘रक्ताचे नाते ट्रस्ट’चे अध्यक्ष आहेत. बँकेत नोकरी करताना सामाजिक भान जपत युनियन आणि कर्मचारी सोसायटीचे अध्यक्ष म्हणून जबाबदारीदेखील त्यांनी लीलया पार पाडली. रक्तदानाच्या कामाची माहिती देताना त्यांनी या ट्रस्टमार्फत १५ राज्ये आणि २२ जिल्ह्यांत ५० हजारांहून जास्त रक्तदाते असल्याची माहिती दिली. चार वर्षांपूर्वी पुण्याहून थेट काश्मीरला जाऊन त्यांनी रक्तदान शिबीर आयोजित केले होते. आजतागायत त्यांनी एक हजारांहून अधिक रक्तदान शिबिरे आयोजित केली आहेत. शिवाय अन्य सामाजिक कार्यांतही त्यांचा सक्रिय सहभाग व पुढाकार असतो. ते आर्थिक मागासलेल्या वर्गातील रुग्णांना मोफत रक्त मिळवून देण्यासाठीही प्रयत्नशील असतात. थोडथोडके नव्हे तर दरवर्षी तब्बल १५ ते २० लाख रुपये मूल्याचे रक्त गरजूंना मोफत मिळवून देण्याची अद्वितीय कामगिरी ते करीत आहेत.
 
त्यांच्या या जीवनदाते निर्माण करण्याच्या आणि स्वतः जीवनदाता म्हणून केलेल्या कार्याचीदेखील अर्थातच अनेक संस्थांनी दखल घेतली. त्यामुळे त्यांना असंख्य पुरस्कारांनी आजतागायत गौरविण्यात आले आहे. २००८ साली ‘रक्तमित्र’ हा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्यावर त्यांनी मागे वळून बघितले नाही. २००९ मध्ये ‘जीवनगौरव पुरस्कारा’चे ते मानकरी ठरले. २०११ मध्ये ‘सुनील दत्त पुरस्कार’, २०१३ : अभिनेता अक्षय कुमार यांच्या हस्ते सत्कार, २०१४ मध्ये पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते ‘पुणे हिरो पुरस्कार’, २०१६ मध्ये ‘सामाजिक समरसता मंच पुरस्कार’, २०१९ मध्ये ‘महेश गौरव राज्यस्तरीय पुरस्कार’, २०२० ला ‘सूर्यदत्ता ग्रुप’कडून ‘नॅशनल अवॉर्ड २०२१’ ला ‘महाराष्ट्र जन सन्मान पुरस्कार, २०२२ मध्ये ’खडइढख’ यांच्यातर्फे जम्मू येथे सत्कार, २०२२ ला ‘गौरवरत्न पुरस्कार’, २०२३ साली राज्यस्तरीय अहिंसा पुरस्कार’, २०२४ ला ‘हेल्थ हिरो अवॉर्ड’ आणि २०२४ ला ‘लोकगौरव पुरस्कार’, ‘फ्रेंड्स एलेव्हन फुटबॉल क्लब’चा ‘जीवनगौरव पुरस्कार’, अशा २५० हून अधिक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
 
 
आपल्या सभोवतालच्या मानवजातीला मित्र मानून ते, “मित्रांनो, काळजी घ्या, माणुसकी जपा, स्वतःचे आरोग्य सांभाळा”, असा सोपा संदेश देत असतात. तरुणांना तर ते नियमित रक्तदान, प्लेटलेट्स दान करण्याचे कळकळीचे आवाहन करीत असतात. याचे कारण नमूद करताना त्यांनी देशातील भीषण वास्तवदेखील अधोरेखित केले. ते म्हणतात, ”अनेक हॉस्पिटलमध्ये रक्ताचा अपुरा साठा असतो. रुग्णांना वेळेत रक्त मिळत नाही. नातेवाईकांना यासाठी सांगता न येणारी भटकंती करावी लागते.” भरपूर पैसा असूनही, अशी वेळ कुणावरच येऊ नये म्हणून ते तरुणांना भरधाव गाड्या न चालविण्याचे आवाहन करतात. त्यांच्या या अमूल्य अशा कामगिरीस दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून शुभेच्छा.
 
 
- अतुल तांदळीकर
Powered By Sangraha 9.0