देशप्रेमी ते पर्यावरणप्रेमी...

28 Aug 2024 21:24:31
ramesh ganpat kharmale


१७ वर्षे देशसेवेसाठी समर्पित केल्यानंतर आता पर्यावरण संवर्धनासाठी आपले आयुष्य वाहिलेल्या जुन्नरच्या रमेश गणपत खरमाळे यांचा जीवनपरिचय करून देणारा लेख...

ही कथा आहे एका अशा पर्यावरणप्रेमीची, ज्यांनी आयुष्याची १७ वर्षे हातात बंदूक घेऊन देशसेवा केली. सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर या राष्ट्रप्रेमी व्यक्तिमत्त्वाने हरीत वसुंधरेचे महत्त्व लक्षात घेत, पर्यावरण संवर्धनासाठी विशेष योगदान देण्यास सुरुवात केली. त्यांच्या या कार्याची विशेष दखल ‘इंडिया बुक ऑफ रेकार्ड’नेही घेतली. असे हे जुन्नरचे माजी सैनिक व पर्यावरणप्रेमी रमेश गणपत खरमाळे.

पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील खोडद गावात दि. १३ नोव्हेंबर १९७६ रोजी एका अतिशय गरीब कुटुंबात रमेश यांचा जन्म झाला. दोन बहिणी, भाऊ, आई, वडील असा त्यांचा परिवार. भावंडांमध्ये रमेश सर्वांत लहान. घरच्या परिस्थितीमुळे बहिणींचे शिक्षण चौथीपर्यंतच होऊ शकले. त्यामुळे शेतीची कामे करणे, मजुरी करून घर चालवणे असा त्यांचा दिनक्रम. वडील मुंबईला माथाडी कामगार म्हणून कार्यरत होते. रमेश यांनी मात्र इतरांच्या शेतातील कामे, मजुरी करून त्यानंतर शाळा, शाळेनंतर पुन्हा तीच कामे करून घर, असे करत आपले बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. एक काळ असा होता की, त्यांना अन्नाचा कणही नशिबात नव्हता.अशा अनेक संकटांवर मात करत ते आज ‘बीएससी अ‍ॅग्रिकल्चर’चे शिक्षण घेत आहेत.

१९९५ सालच्या दरम्यान रमेश यांना सैन्य भरतीचे पत्र आले. तेव्हा त्यांच्या वडिलांकडे १०० रुपयेही नव्हते. मात्र, मुलाकरिता त्यांनी १०० रुपये उसने घेऊन मुलाला सैन्यभरतीसाठी देऊ केलेे. रमेश यांनी त्या १०० रुपयांवर पुण्यात सात दिवस काढले. वडापाव खाऊन अक्षरश: दिवस पुढे ढकलले. ‘मराठा लाईट इन्फंट्री, बेळगाव’ येथे दि. २० ऑगस्ट १९९५ रोजी भारतीय सैन्यात त्यांची भरती झाली. कर्नाटक, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, बिहार, अरूणाचल प्रदेश, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीरमध्ये त्यांनी राष्ट्रसेवेचे कर्तव्य निभावले. १७ वर्षांच्या देशसेवेनंतर ‘हवालदार’ पदावरून २०१२ मध्ये त्यांनी निवृत्ती घेतली. निवृत्तीनंतर थेरगाव, पुणे येथे युनियन बँकत ‘गनमॅन’ म्हणूनही त्यांनी सहा महिने नोकरी केली. सध्या २०१४ सालापासून वनविभाग, जुन्नरमध्ये वनरक्षकपदावर ते कार्यरत आहेत.

रमेश खरमाळे जितके पर्यावरणप्रेमी, तितकीच त्यांना समाजाकार्याचीही आवड. विविध प्रकारच्या मदतकार्यात ते अग्रेसर. माळशेज घाटात एसटी बस दरीत कोसळून झालेल्या दुर्घटनेत २७ जण दगावले. त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात रमेश यांनी मदतीचा हात दिला होता. किल्ले हडसर पाहण्यासाठी आलेले पुण्याचे १६ पर्यटक रात्री खिळ्याच्या वाटेवर अडकले होते. त्यांची सुटका करण्यात त्यांचा प्रमुख सहभाग होता. २०१७ साली रात्री कुकडी नदीच्या पुरात अडकलेल्या एकाच कुटुंबातील तीन व्यक्तींना जीवदान देण्यात मुख्य भूमिका रमेश यांनी बजावली होती. वनविभागात नोकरी करताना विहिरीत पडलेल्या जवळपास ३२ बिबट्यांना ‘रेस्क्यू’द्वारे त्यांनी जीवदान दिले. सन २०१३ला जुन्नरमध्ये मुलांच्या करिअरकरिता पोलीस, सैन्यदल, नौदल, हवाईदल आणि इतर नोकरी संदर्भाकरिता ‘शिवशक्ती अ‍ॅकॅडमी’ची स्थापना त्यांनी केली. आदिवासी मुलांना मोफत पोलीस प्रशिक्षण देऊन त्यांनी अनेक अदिवासी मुलांना पोलीसदलात सक्रिय केले आहे. २०१९ साली जुन्नर तालुक्यातील ऐतिहासिक व नैसर्गिक वारसा सचित्र व नावासहित तेलुगू भाषेत अकरावीच्या ‘बालभारती’ पुस्तकात समाविष्ट करण्यात रमेश यांचे विशेष योगदान आहे.

जुन्नर तालुक्यातील धामणखेल डोंगरमाथ्यावर सलग ६० दिवसांत ३०० तास काम करत पत्नीसोबत दोघांनी ७० जलशोषक समतल चर खोदून तयार केले. हे सर्व काम सुमारे ४१२ मीटरचे करत जमिनीत एका पावसात आठ लाख लीटर पाणी जिरेल, एवढे वैयक्तिक श्रमदानातून योगदान दिले आहे. सन २०१४ मध्ये किल्लेसंवर्धनासाठी ‘शिवाजी ट्रेल’मध्ये सहभागी होत, तालुक्यातील सात किल्ल्यांवर विविध शाळा व महाविद्यालयांच्या माध्यमातून संवर्धनकार्यही त्यांनी केले. जुन्नर तालुक्याला लाभलेला नैसर्गिक व ऐतिहासिक वारसा जगासमोर येण्यासाठी, त्यांनी ‘निसर्गरम्य जुन्नर तालुका’ नावाचे एक ‘फेसबुक पेज’ही सुरु केले आहे. तालुक्यातील अनेक गावांना भेटी देऊन तेथील ऐतिहासिक वास्तूंची पाहणी करून ती या पेजच्या माध्यमातून मांडण्याचा यशस्वी प्रयत्न रमेश करतात. आजच्या घडीला या पेजला ८९ देशांतून प्रतिसाद मिळाला आहे. या पेजच्या माध्यमातून त्यांनी समाजातील गरजूंकरिता वेळोवेळी मदतनिधी उभा करत, त्यांची साहाय्यता केल्याची बरीच उदाहरणे आहेत.

महाराष्ट्र शासनानेही त्यांच्या या कार्याची दखल घेतली असून, त्यांना ‘शिवनेरी भूषण शौर्य’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ‘कल्याण बोर्ड’चा ‘महाराष्ट्र राज्य सैनिक पुरस्कार’, सन २०१९चा ‘माजी सैनिक विशेष गौरव पुरस्कार’ अशा एक-दोन नव्हे, तर अनेक पुरस्कारांनी रमेश यांना सन्मानित करण्यात आले आहे. भविष्याच्या दृष्टीने पर्यावरणाबाबत जनजागृती होणे गरजेचे असल्याचे सांगत, ते आज राज्यभरात पर्यावरणाचे महत्त्व पटवून देत आहेत. रमेश खरमाळे यांच्या पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे अनेक शुभेच्छा!
Powered By Sangraha 9.0