बेरोजगार सेवा संस्थांना विनानिविदा १० लाखापर्यंतची कामे घेता येणार!

28 Aug 2024 14:56:33
minister mangal prabhat lodha decision


मुंबई :         महाराष्ट्रात कार्यरत असलेल्या बेरोजगार सेवा संस्थांसाठी विनानिविदा कामे घेता येणार आहे. या कामाची मर्यादा १० लाखापर्यंत वाढवण्याची घोषणा राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केली. सदर कामाची मर्यादा ३ लाखांपर्यंत होती, ती आता १० लाखापर्यंत वाढवण्याची घोषणा मंत्री लोढा यांनी यावेळी केली.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली कौशल्य विकास विभागांतर्गत विविध प्रकारे रोजगाराच्या संधी उपलब्ध केल्या जात आहेत. तसेच, रोजगार निर्मितीसाठी महारोजगार मेळावे, पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावे, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सारख्या सर्वंकष योजना तयार झाल्या आहेत, अशी माहिती मंत्री लोढा यांनी दिली आहे.

ते पुढे म्हणाले, बेरोजगार सेवा संस्थांना स्वतःच्या कामाचा आवाका वाढवता येईल, त्यातून नवीन संधी निर्माण होतील आणि पर्यायाने रोजगार निर्मिती होईल, याकरिता ही घोषणा अतिशय महत्त्वाची असल्याचे मंत्री लोढा म्हणाले. रोजगार संपन्न समृद्ध महाराष्ट्र घडवण्यासाठी आजचा निर्णय अतिशय महत्वाचा ठरेल, असा विश्वासही मंत्री लोढा यांनी यावेळी व्यक्त केला.

राज्यात २०२३ अखेर २ हजार पेक्षा जास्त संस्था कार्यरत असून ३५ हजारांपेक्षा जास्त सदस्य आहेत. इतर संस्थांच्या तुलनेत बेरोजगार सेवा संस्थांना मिळणाऱ्या कामांची संख्या कमी असल्याने विनानिविदा मिळणाऱ्या कामांची मर्यादा ३ लाखांपासून १० लाखांपर्यंत वाढवण्याची मागणी केली गेली होती. या मागणीला विचाराधीन घेत त्या अनुषंगाने मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी महत्वपूर्ण घोषणा केली आहे.




Powered By Sangraha 9.0