मुंबई : मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा दुर्घटनेच्या निषेधार्थ येत्या १ सप्टेंबर रोजी महाविकास आघाडीकडून आंदोलन करण्यात येणार आहे. राजकोटमधील राड्यानंतर उद्धव ठाकरे, शरद पवार आणि नाना पटोलेंनी एक संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी ही माहिती दिली.
उद्धव ठाकरे म्हणाले की, "महायूतीच्या कारभाराने भ्रष्टाचाराचा कळस गाठला आहे. त्यांच्या कारभाराचा निषेध करण्यासाठी आम्ही महाराष्ट्र बंद पुकारला होता. पण त्यांनी कोर्टाच्या माध्यमातून यावर बंदी आणली. त्यानंतर आता मालवणमधील घटनेच्या निषेधार्थ काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये काही शिवद्रोही रस्ता अडवून बसलेत."
हे वाचलंत का? - कोकणात राडा! राणे विरुद्ध ठाकरे आमने-सामने
"रविवार, १ सप्टेंबर रोजी दुपारी ११ च्या सुमारास हुतात्मा स्मारकास वंदन करून गेटवे ऑफ इंडियाला उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर जाणार आहोत. त्याठिकाणी आम्ही सरकारचा निषेध करणार आहोत. त्यावेळी माझ्यासह शरद पवार, नाना पटोले आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते सहभागी होतील. या आंदोलनात शिवप्रेमींनीदेखील सहभागी होऊन सरकारच्या कारभाराचा निषेध करावा," असे आवाहन त्यांनी केले.