पृथ्वीवरील स्वर्गात, सरस्वतीच्या महाली!

27 Aug 2024 20:42:39
mumbai city sahas sanstha
 
 
समाजात आजही अनेक संस्था आणि व्यक्ती निःस्पृहपणे विविध क्षेत्रांत प्रसिद्धीपराडमुख, कोणत्याही पुरस्काराची अपेक्षा न ठेवता आपापले दायित्व निभावत आहेत. बोरिवली, मुंबईस्थित अशीच एक संस्था म्हणजे ‘साहस’. संस्थेच्या उपक्रमाचा परिचय या लेखात दिला आहे.

त्र्यंबकेश्वर तालुक्यात दुर्गम आदिवासी भागातील जिल्हा परिषद शाळांतील मुलांना शैक्षणिक साहित्य वितरणाची मालिका ‘साहस’ने सुरू केली. दि. 21 ते 24 ऑगस्ट रोजी ‘साहस’च्या या उपक्रमात सहभागी होण्याचा योग आला. बेरवळ, ओझरखेड, बोरीपाडा, कुतर माळ, पंगारपाना, तामेन माळ, घरटापाडा, सातवड पाडा, घोडी पाडा, सादड पाडा आणि हिवाली इत्यादी गावांतील प्राथमिक शाळांत शैक्षणिक स्नेह दरवळण्यात आला. सोबत काही दानशूरांनी आपले कपडे, तर काहीजणांनी नवीन कपडेसुद्धा दिले होते. सन्मानपूर्वक स्नेह स्वीकारताना बांधवांच्या चेहर्‍यावर आनंद ओसंडून वाहत होता. जवळपास सर्वच एकशिक्षकी शाळा! साधारण 50 ते 60 पटसंख्या, बालवाडी, पहिली ते सातवी वर्ग काही ठिकाणी नववीपर्यंतसुद्धा. काही हसरी, तर काही लाजरी-बुजरी निष्पाप मनाची मुलं, मुलांशी गप्पा मारताना, ती कसलीही भीडभाड न बाळगता संवाद साधत त्यांच्यातल्या गमतीजमती दाखवत गप्पा मारत होती. काही मुलांनी बांबूपासून बनवलेला ‘फोकाका’ म्हणजे फटाक्याची प्रात्यक्षिकेदेखील दाखवली. 
 
गिलसीडी’ नावाच्या झाडाचे पान बांबूच्या खालील पोकळ भागात ठेचून भरायचे, वरच्या भागालासुद्धा छोट्याशा पानाने बंद करायचे, मग दुसर्‍या त्या पोकळ बांबूत लगोलग घुसू शकणार्‍या दुसर्‍या लहान बांबूने पुढल्या बाजूस एक झटका द्यायचा... फट्ट असा आवाज! कोणतेही प्रदूषण न करणारा नैसर्गिक फटाका. जणू छोट्टीशी ठासणीची बंदुकच! हिवाली पाड्यातील चक्क 12 तासांची शाळा. हीसुद्धा जिल्हा परिषदेचीच एकशिक्षकी शाळा, बरं का! गावातील शाळेची दुरुस्ती सुरू असतानासुद्धा शाळा बंद न करता, थोडेसे गावाच्या बाहेर, धो धो पावसात, प्लास्टिकने बांधलेल्या तंबूत शाळा भरलेली. या शाळेत नववीपर्यंत विद्यार्थी. मोठ्या इयत्तेतल्या विद्यार्थ्यांनी छोट्या वर्गातल्या मुलांना शिकवायचे. सातत्याने लोडशेडिंग असले, तरी सौरऊर्जेचा पर्याय देऊन मुबलक प्रकाश. सर्व प्रकारच्या माहितीच्या फलकांनी भिंती आणि छत सजलेले होते. शेतीतील काही प्रयोगसुद्धा या मुलांच्या सहभागाने राबविलेला उपक्रम लक्ष वेधून घेत होता. केशव गावित सरांच्या विशेष परिश्रम आणि कल्पनेतून गावकर्‍यांच्या सहभागाने कृतिशील शिक्षणाची शाळा बहरत आहे.

हिवाळी शाळेतील मुलांच्या कुतुहलाला अजून चालना देण्यासाठी भूषणजींच्या सल्ल्याने तो सौरऊर्जा कुकर केशव गावित सरांकडे सुपुर्द केला. त्याचा वापर करताना, मुलांच्या अजून नवनवीन कल्पनांना चालना देण्याच्या दृष्टीने माझ्याकडील माहिती मुलांसोबत समरस करण्याची संधी मिळाली. अशीच अजून एक घरटे पाड्यातील शाळा. सुनील कुवर सर, वनभाज्या आणि वनौषधीची रोपे कुंडीत लावून लहानग्यांच्या मनात कुतूहल निर्माण करताना त्यांची उपयोगिता समजावून सांगतात. प्रत्येक शाळेतील शिक्षक आपापल्यापरीने, तुटपुंज्या साधनांच्या आधारे मुलांचा बुध्यांक, समज आणि क्षमता वाढविण्यासाठी अनेकानेक उपक्रम राबवित आहेत. ‘साहस’चे अध्यक्ष भूषण परब, त्यांचे वयोवृद्ध वडील, पत्नी आणि दहावीतील मुलगा युवराज आपल्या संपूर्ण कुटुंबासह प्रत्यक्ष गावागावांत जाऊन शैक्षणिक साधनांचे वितरण करताना, त्यांचे सहकारी दीपा ताई, रामचंद्र धुमक, शर्माजी खांद्याला खांदा लावून सोबत देत आहेत. आमचा संपूर्ण प्रवास सुखरूप करणारे आमचे रथसारथी श्रीकृष्ण सहदेव खवळेसुद्धा उत्साहाने उपक्रमात सहभागी झाले होते. बेरवळचे माजी सरपंच प्रकाश मौळे यांचे विशेष सहकार्य, मार्गदर्शन वेळोवेळी असतेच.

प्रामुख्याने अशा आदिवासी दुर्गम भागात पिण्याचे पाणी, रस्ते गावागावांपर्यंत पोहोचविण्याचे काम सरकार करीत आहेत. तरी पावसाळ्यात रस्त्यासहित डोंगर खचणे, पिण्यास शुद्ध पाणी, उन्हाळ्यातील पाणी प्रश्न, कुपोषण दूर होण्यासाठी पोषक आहार यासाठी उपाययोजना राबविण्याची नितांत गरज आहे. ग्रामीण आणि आदिवासी दुर्गम भागातील नागरिकांचे रोजगारामुळे विस्थापन होऊ नये, म्हणून स्थानिक उपलब्धी, पारंपरिक कौशल्य इत्यादी सर्वेक्षणानुसार आधुनिक ग्रामविकासावर आधारित आधुनिक शिक्षणपद्धती राबविण्याची नितांत आवश्यकता आहे. असो, बेरवळातील श्रद्धेचे ठिकाण म्हणजे हनुमान मंदिर. सध्या या मंदिरात हरिनाम सप्ताह सुरू आहे. हरीची स्पंदने दिवसभर मातीत राबलेल्या कायेला नवीन ऊर्जा देत होती. ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’ जयघोषात आदिवासी तल्लीन होऊन नाचत होते. आम्हीसुद्धा त्या तालात पाऊले जुळवून रममाण झालो होतो. आमचा निवास प्रकाशजींच्या बहिणीच्या घरी होता. त्यांची बहीण आणि वहिनीने आपुलकीने जेवूखाऊ घातले. त्या पंचपक्वान्नात नाचणीची भाकरी, झुणका, डांगर, खुरसानीची भाजी, इतर वनभाज्या, त्यांच्या शेतातच पिकवलेला कोलम तांदुळाचा भात, कुळीथ, उडीद कडधान्याची उसळ अशी मेजवानीच होती. चुलीवरील जेवण आणि त्याचा आस्वाद! तीन दिवस तर जणू स्वर्गातच असल्याची ती अविस्मरणीय अनुभूतीच म्हणण्यात कोणतीच अतिशयोक्ती नसेल.


दयानंद सावंत
9820939957
Powered By Sangraha 9.0