मिशन ऐतिहासिक कल्याण शहराच्या ‘कल्याणा’चे

26 Aug 2024 22:40:43
mission historical kalyan city

 
कल्याण जंक्शन हे उपनगरीय वाहतूक आणि त्याचप्रमाणे लांब पल्ल्यांच्या लोहमार्ग वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. उपनगरीय रेल्वेस्थानकांमधील सर्वाधिक प्रवासी असलेले कल्याण रेल्वेस्थानक महत्त्वाचे स्थानक आहे. कल्याण हे वाढत्या शहरी आणि नागरिकीकरणात आमूलाग्र बदललेले आहे. एकीकडे वाढणार्‍या लोकसंख्येचा भार आणि उपलब्ध नागरी सुविधांवरील वाढलेला ताण पाहता शहराच्या विकासासाठी एखादे मिशन हाती घेणे ही काळाची गरज आहे. कल्याण पूर्वच्या मानाने कल्याण पश्चिम याठिकाणच्या लोकसंख्येचा वेग प्रचंड आहे. त्यामुळे इथे जास्तीतजास्त पायाभूत सुविधा उपलब्ध होतील, यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. शहरातील रेल्वेस्थानक असो अथवा महत्त्वाचे चौक याठिकाणी केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी योजनेंतर्गत विकासकामे सुरू आहेत. भविष्यात कल्याण शहराचे चित्र बदलणार असले तरी जे प्रश्न आज आ वासून उभे आहेत त्या घनकचरा, पाणी, वाहतूककोंडी, मनपा शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी कल्याणचे नगरसेवक, उपमहापौर आणि आमदार म्हणून राहिलेले नरेंद्र पवार यांनी ’मिशन’ हाती घेतले आहे. नरेंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या प्रतिनिधीशी बोलताना मांडलेला विकासाचा आराखडा...

शहरामधील सर्वात मोठी समस्या ही डम्पिंग ग्राउंडची आहे. शहराच्या प्रवेशद्वारावरच आधारवाडी येथे कल्याण-डोंबिवलीचा दररोज निर्माण होणारा कचरा टाकला जायचा. यात दुर्गंधीच्या दर्पाने इथल्या आजूबाजूच्या स्थानिक रहिवाशांचा श्वास कोंडायचा. त्याचबरोबर एप्रिल, मे महिन्यांत डम्पिंगच्या सुक्या कचर्‍याला आगी लागून परिस्थिती अधिकच गंभीर बनायची. आजच्या घडीला हे डम्पिंग ग्राउंड बंद होऊन उंबर्डे येथील जागेत ओला आणि सुक्या कचर्‍याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावली जात असली तर कचर्‍याची समस्या सुटलेली नाही. सुका आणि ओल्या कचर्‍याचे वर्गीकरण करूनही आजही मोठ्या प्रमाणात कचरा रस्त्यावर टाकला जात आहे. कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. परंतु, यावर ठोस उपाययोजना झालेली नाही. मात्र, यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी डम्पिंगमुक्त कल्याण पश्चिम आणि शून्य कचरा मोहिमेचा एक आराखडा तयार केला गेला आहे. या योजनेमध्ये दैनंदिन जमा होणार्‍या कचर्‍याचे वर्गीकरण करून रोजच्या रोज कचर्‍याची विल्हेवाट लावली जाणार आहे.

नागरिक रस्त्यावर कचरा टाकतात. पालिकेच्या कचराकुंड्या रस्त्यावर असतात. त्यामुळे शहराचे विद्रुपीकरण होते. याला पर्याय म्हणून भूमिगत कचराकुंड्या तयार करून त्यावर स्टीलच्या जाळ्या टाकल्या जातील. महापालिकेची कचरागाडी आली की, हायड्रॉलिक जॅकच्या साहाय्याने हा कचरा उचलून तो गाडीत जमा केला जाईल, अशी संकल्पना आहे. आजमितीला खासगी शाळांचे प्रस्थ वाढत आहे. या शाळांचे शुल्क सर्वसामान्यांना परवडणारे नाही. त्यामुळे याला पर्याय म्हणून कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळांचा दर्जा सुधारणे हे माझे आणखीन एक मिशन आहे. महापालिकेच्या सुरुवातीला 65 शाळा होत्या. परंतु, शाळांचा दर्जा बरोबर नसल्याने विद्यार्थी पटसंख्या पाहतापाहता घटली. यात महापालिका शाळांची संख्या 65 वरून 59 वर आली आहे. या शाळांची एकूणच स्थिती पाहता या शाळा अद्ययावत करण्याचा मानस आहे. मुंबई महापालिकेच्या धर्तीवर अद्ययावत वर्ग, सी.बी.एस.सी. बोर्ड कल्याणमधील महापालिकेच्या शाळेत आणायचे उद्दिष्ट आहे.

कल्याण पश्चिम हा भाग वाहतूककोंडीच्या समस्येने सध्या बेजार झाला आहे. अर्धा किलोमीटर जायलादेखील अर्धा ते पाऊण तासांचा कालावधी वाहनचालकांना लागत आहे. सध्या महत्त्वाच्या रस्त्यांवर सिग्नल यंत्रणा उभारण्यात आली आहे. पण, शहरातील एकूणच वाहतूककोंडी फोडण्यासाठी चौकाचौकांत सिग्नल यंत्रणा उभारणे गरजेचे आहे. मुख्य रस्त्यांचे, चौकाचे रुंदीकरण करणे, वाहतूक पोलीस अणि वॉर्डनची संख्या वाढवून घेणे, कल्याण-भिवंडी रस्ता, पत्रीपूल, कल्याण-मुरबाड रस्ता या वर्दळीच्या रस्त्यांवरील वाहतुकीचा अभ्यास करणे गरजेचे आहे. वाहतुकीस अडथळा ठरणार्‍या गोष्टी वेळीच निष्कासित कराव्या लागतील. या ’मिशन’वर झोकून काम झाल्यास 2029 पर्यंत आपल्या स्वप्नातील कल्याण नगरी नक्कीच पाहायला मिळेल, असा विश्वास व्यक्त करायला अतिशयोक्ती वाटत नाही.

आर्थिकदृष्ट्या कमकुवत पालकांना आपल्या मुलांना सीबीएससी बोर्डात मोफत शिक्षण देता येईल. यामुळे चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळण्याचा मार्ग सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थी-विद्यार्थिनींना उपलब्ध होईल. कल्याण शहराला प्रथितयश खेळाडूंची परंपरा आहे. आजच्या घडीला शहरातील विक्रमवीर क्रिकेटपटू प्रणव धनावडे याने मोठे यश संपादन केले आहे. परंतु, शहरात चांगल्या मैदानांची वानवा आहे. हे चित्र पाहता खेळाची मैदाने, स्टेडियम यांची संख्या वाढविणे यासाठीदेखील प्रयत्न करणार आहे. कल्याण पश्चिममध्ये मोजकीच खेळाची मैदाने आहेत. त्यांचीही अवस्था फार चांगली नाही. सर्व इनडोअर आणि आऊटडोअर खेळ एकाच जागी खेळता येतील, असे सोयीसुविधा असलेले स्टेडियम उभारण्याची योजना आखली आहे.



Powered By Sangraha 9.0