सलग तिसर्‍या दिवशी गोदेची पूरस्थिती कायम; पालकमंत्री दादा भुसे यांच्याकडून पाहणी

26 Aug 2024 21:03:09
heavy rainfall in nashik city


नाशिक  :
     मागील तीन दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे नाशिक शहरासह जिल्ह्यातील जनजीवन काहीसे विस्कळीत झाले आहे. त्यातच खरीप हंगामातील पेरणी केलेल्या पिकांमध्ये पाणी साचल्याने ते खराब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, सलग सुरू असलेल्या पावसामुळे गोदामाईला आलेला पूर तिसर्‍या दिवशीही कायम होता. त्यामुळे काठालगत असलेल्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

गंगापूर धरणामधून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आल्याने सोमवार, दि. 26 ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास दुतोंड्या मारुतीच्या मानेला पाणी लागले होते. तसेच जिल्ह्यातील 18 धरणांमधून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू करण्यात आल्याने जायकवाडी धरणामधील जलसाठ्यात वाढ व्हायला सुरुवात झाली आहे.

दरम्यान, मागील आठवड्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये पावसाचे प्रमाण तुरळक होते. दुष्काळाच्या सावटाखाली कायम असलेले नांदगाव, सिन्नर आणि येवला तालुक्यात अनुक्रमे 62.6, 57.8 आणि 37.83 मिलिमीटर पाऊस पडला होता. मात्र, तीनच दिवसांत यामध्ये मोठी वाढ झाली असून, नांदगाव तालुक्यात 208.9, येवल्यात 126.2 आणि सिन्नर तालुक्यामध्ये 157.5 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे या तालुक्यामध्ये देखील शेतीचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.

त्याचप्रमाणे पावसाचे माहेरघर असलेल्या सुरगाणा तालुक्यात 882.9, इगतपुरीत 604.7, पेठमध्ये 703.2 आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये 626.6 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर, इतर तालुक्यांमध्येही समाधानकारक पावसाची नोंद झाली आहे.


दादा भुसेंकडून गोदावरीची पाहणी 

घाटमाथ्यावर जोरदार पाऊस सुरू असल्याने गोदावरीच्या पाणीपातळीत कमालीची वाढ झाली असून नदी दुथडी भरून वाहत आहे. गोदा घाटावरील सर्व मंदिरे अजूनही पाण्याखाली आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी होळकर पुलावर जाऊन आढावा घेतला. यावेळी त्यांनी पाणीपातळीची पाहणी करत प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या. यावेळी तेथे उपस्थित असलेल्या नागरिकांशी संवाद साधून प्रशासनाला सहकार्य करण्याचे तसेच खबरदारी घेण्याचे आवाहन त्यांनी केले.


कोणत्या तालुक्यात किती पाऊस

(सोमवार, दि. 26 ऑगस्टपर्यंत)
मालेगाव- 174.7
सटाणा- 265.8
कळवण- 353.9
नांदगाव 208.9
सुरगाणा 882.9
नाशिक 284.4
दिंडोरी 386.7
इगतपुरी 604.7
पेठ 703.2
निफाड 151.7
सिन्नर 157.5
येवला 126.2
चांदवड 237.0
त्र्यंबकेश्वर 626.6
देवळा 207.9

धरण जलसाठा(टक्क्यांमध्ये) विसर्ग (क्युसेकमध्ये)

गंगापूर 89.84 8,428
पुणेगाव 86.04 6,000
भावली 100 701
मुकणे 74.26 00
वालदेवी 100 183
नांदूरमध्यमेश्वर 81.71 62,371
भोजापूर 100 1,524
चणकापूर 87.52 16,268
हरणबारी 100 7,643
केळझर 100 2,716
आळंदी 100 243
गौतमी गोदावरी 99.86 2,560
करंजवण 97.00 9,908
पालखेड 77.34 20,890
ओझरखेड 100 4,952
तिसगाव 100 804
दारणा 93.75 12,178
काश्यपी 82.67 00
नागसाक्या 00 00
गिरणा 60.12 00
पुनद 75.11 00
माणिकपुंज 90.15 00
कडवा 86.02 3.110
वाघाड 100 3,116


Powered By Sangraha 9.0