बालरंगभूमी परिषदेच्या शिष्टमंडळाने घेतली सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार भेट

26 Aug 2024 14:12:54
 
baalrangbhumi
 
मुंबई - 'बालनाट्य संस्थां'च्या विविध अडचणी, समस्या, प्रश्न मांडण्यासाठी 'बालरंगभूमी परिषदे'च्या शिष्टमंडळाने ॲड. नीलम शिर्के-सामंत यांच्या नेतृत्वाखाली सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची नुकतीच भेट घेतली. व्यवसायिक प्रौढ नाटक, प्रायोगिक नाटक, संगीत नाटकाप्रमाणे 'व्यवसायिक बालनाट्या'ला अनुदान मिळावे ही अनेक वर्षांची मागणी होती. ती मान्य करण्यास सांस्कृतिक मंत्री यांनी अनुकूलता दर्शविली आणि "बालरंगभूमी परिषदे'ला या संबंधित योजनेचे प्रारूप बनविण्यास आणि सांस्कृतिक विभागाला सादर करण्यास सांगितले आहे. बालनाट्य स्पर्धेची केंद्रे, तारखा, अंतिम प्रवेशांचे निकष, मुलांच्या पुरस्कारांची संख्या आणि रक्कम वाढवणे, बालनाट्य सेन्सॉर सर्टिफिकेट, परीक्षक, स्पर्धा प्राथमिक व माध्यमिक गटात घेणे आदी विषयांवर केलेल्या सर्व सूचनांबाबत विचार करून निर्णय घेण्याची सकारात्मकता सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी दर्शवली. दरवर्षी 'बालनाट्य संमेलन' घेण्यास आणि त्यासाठी तशी तरतूद करण्यास सुधीर मुनगंटीवार यांनी सहमती दर्शविली. 'बालरंगभूमी परिषदे'ने केलेल्या सर्व मागण्या, सूचनांचे सारासार विचार करून अंमलबजावणी करण्याचे आश्वासन सांस्कृतिक मंत्र्यांनी 'बालरंगभूमी परिषदे'च्या शिष्टमंडळास दिले. या शिष्टमंडळात राजू तुलालवार, शैलेश गोजमगुंडे, दीपा क्षीरसागर, सतिश लोटके, दीपक रेगे, दिपाली शिर्के, योगेश शुक्ल या सदस्यांनी "बालरंगभूमी परिषदे' तर्फे चर्चेत सहभाग घेतला.
Powered By Sangraha 9.0