अहमदनगर : शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना कर्जत-जामखेडमध्ये मोठा धक्का बसला आहे. कर्जत-जामखेडचे तालुकाध्यक्ष मधुकर राळेभात यांनी रोहित पवारांवर गंभीर आरोप करत पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यामुळे ऐन निवडणूकीच्या तोंडावर रोहित पवारांना हा मोठा धक्का मानला जात आहे.
राजीनामा दिल्यानंतर मधुकर राळेभात यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, "मागील निवडणूकीत शरद पवार साहेबांच्या विचारांवर विश्वास ठेवून आम्ही या मतदारसंघात काम केलं होतं. स्थानिक उमेदवाराला पराभूत करून आमदार रोहित पवारांना निवडून आणलं. परंतू, त्यांची काम करण्याची पद्धत आणि कार्यकर्त्यांशी वागण्याची पद्धत आम्हाला पसंत नाही. त्यांनी कार्यकर्त्यांना कायम दुय्यम वागणूक दिली आणि वरिष्ठ कार्यकर्त्यांना बाजूला ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आम्ही उद्विग्न झालोत आणि पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला," असे ते म्हणाले.
हे वाचलंत का? - बदलापूर अत्याचार प्रकरण! आरोपी अक्षय शिंदेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
ते पुढे म्हणाले की, "मी आजपासून १५ तारखेपर्यंत प्रत्येक गावात जाऊन माझ्या कार्यकर्त्यांना भेटणार आहे. त्यांच्याशी विचारविनिमय करून त्यांचं म्हणणं ऐकून पुढचा निर्णय घेणार आहे," असेही त्यांनी सांगितले.