इस्लामाबाद : पाकिस्तान येथील बलुचिस्तानातील एका महामार्गावर अज्ञात हल्लखोरांनी अनेक वाहनांवर हल्ला केला. यावेळी पंजाब प्रांतातील लोकांची हत्या करण्यात आली आहे. बलुचिस्तानातील या हल्ल्यात २३ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. लोकांवर अमानुष अत्याचार करत असंख्य वाहने पेटवली आणि तिथून पळ काढण्याचे कृत्य हल्लेखोरांनी केले. बलुचिस्तानातील मुसाखेल जिल्ह्यात २६ ऑगस्ट रोजी हा हल्ला झाला आहे.
प्रसार माध्यमाने दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांनी आंतरराज्यातील महामार्ग बंद केला होता. यानंतर येथे येणाऱ्या वाहनांना थांबवून त्यांची ओळख विचारण्यात आली असून पाकिस्तानातील पंजाब प्रांतातील रहिवासी असलेल्या लोकांवर अंदाधुंद गोळीबार करण्यात आला.
यानंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढण्याआधी १० गाड्या पेटवल्या. दरम्यान याप्रकरणात हल्लेखोर नेमके कोण आहेत याबाबतची कोणतीच माहिती अद्यापही समोर आलेली नाही. याप्रकरणात बलुचिस्तानातील प्रशासनाने मृतदेह हटवून जखमींना रूग्णालयात दाखल केले.
या हल्ल्यात पाकिस्तानातील पंजाब प्रांतातील २० लोकं मृत्युमुखी पडले तर ३ लोकं ही बलुचिस्तानतील असल्याची माहिती आहे. सुरक्षा दलांनी घटनास्थळी हल्ल्याचा तपास केला आहे. आतापर्यंत कोणत्याही गटाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.
हा हल्ला बलुचिस्तानातील बंडखोर संघटनेने केल्याचा संशय आहे. कारण बलुच बंडखोर अनेकदा सांगत आहे की त्यांची संसाधने पंजाबच्या लोकांनी हस्तगत केली आहे. बलुचिस्तानातील लष्कर आणि पाकिस्तान सरकारकडून होत असलेल्या दडपशाहीचा त्यांना राग आहे. याआधी या बंडखोरांनी चीनी आणि पंजाबच्या नागरिकांवर हल्ले केले होते.