पाकिस्तानातून वाढते स्थलांतर

25 Aug 2024 23:08:28

Pakistani 

 
आर्थिक चिंतेने त्रस्त पाकिस्तानला आता आणखी एका समस्येने ग्रासले आहे. पल्स कन्सल्टंटच्या समोर आलेल्या एका अहवालाने पाकिस्तानची चिंता वाढवली असून, शाहबाज शरीफ सरकारवरही यामुळे टीका होऊ लागली आहे. सदर अहवालानुसार जवळपास एक कोटी पाकिस्तानी नागरिकांनी देश सोडला असून, यातील बहुतांश नागरिक इराक आणि रोमानियाला स्थायिक झाले आहे. पाकिस्तानमधील ढासळती अर्थव्यवस्था, लष्कराचा वाढता प्रभाव, पायदळी तुडवली जाणारी लोकशाही, आणि बेरोजगारी, महागाई यामुळे त्रस्त झालेल्या पाकिस्तानी नागरिकांचा भ्रमनिरास झाला आहे. त्यामुळे लाखो नागरिक देश सोडून, इतरत्र स्थायिक झाले आहेत. चांगल्या संधीच्या शोधात हे नागरिक पाकिस्तान सोडत आहे.
 
अहवालानुसार, गेल्या १७वर्षांत एकूण ९५ लाख, ५६ हजार, ५०७ नागरिक पाकिस्तान सोडून गेले आहेत. २०१५ मध्ये सर्वाधिक नऊ लाख लोकांनी पाकिस्तानमधून स्थलांतर केले. २०१३ ते २०१८ पर्यंत पाकिस्तान मुस्लीम लीग-नवाजच्या राजवटीत सर्वाधिक लोकांनी पाकिस्तान सोडले. कोविड-१९ महामारीच्या काळात २०२२ आणि २०२३ मध्ये जवळपास आठ लाख लोकांनी देश सोडला. कुशल लोकांच्या स्थलांतराचे प्रमाणही पाच टक्क्यांनी वाढले आहे. गेल्या दोन वर्षांत देश सोडून जाणार्‍यांपैकी बहुसंख्य हा कामगारवर्ग आहे. अनेक पाकिस्तानी कामगार चांगल्या नोकरीच्या शोधात, सौदी अरेबिया, यूएई, ओमान आणि कतार येथे स्थायिक झालेले आहेत. कोरोनानंतर यूएईमध्ये पाकिस्तानी कामगारांच्या संख्येत मोठी घट झाल्याचे पाहायला मिळाले. त्याउलट, सौदी अरेबियामध्ये मात्र पाकिस्तानी कामगारांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. कोविडनंतर पाकिस्तानी नागरिक यूके, इराक आणि रोमानियात सर्वाधिक स्थलांतरित होत आहेत. मुळात कोणत्याही देशाची अर्थव्यवस्था सुस्थितीत ठेवण्यामध्ये कामगारवर्गाचा महत्त्वाचा वाटा असतो.
 
अर्थव्यवस्थेचा डोलारा कामगारवर्गावर बर्‍यापैकी अवलंबून असल्याने, साहजिकच पाक सरकारची चिंता वाढली आहे. देशातील कामगारवर्ग अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणावर स्थलांतर करत असेल, तर पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेसाठी ही धोक्याची घंटा आहे. त्याचप्रमाणे, अन्य देशांमध्ये पाकिस्तानी नागरिक जाऊन तिथेही शांत राहत नाही. अनेक देशांमध्ये या कामगारांकडून गुन्हे, चोरी करण्याच्या घटना समोर आल्या आहे. कोरोनाकाळात तर पाकिस्तानची पळता भुई थोडी झाली होती. दहशतवाद्यांना पोसतापोसताच पाकिस्तानच्या नाकीनऊ येतात, तर आरोग्य व्यवस्थेकडे लक्ष देण्याइतका वेळच पाकिस्तानकडे कुठे असेल म्हणा. कोरोनाकाळात तर पाकिस्तानातील आरोग्यव्यवस्थेचा पुरता फज्जा उडाला होता. यामुळे वैतागलेल्या पाकिस्तानने त्यावेळी अफगाणिस्तानची तोरखंड आणि चमन सीमा खुली केली होती. जेणेकरून नागरिकांना अफगाणिस्तानमध्ये जाता येईल. कोणतीही चाचणी न करता लाखो लोकांनी त्यावेळी अफगाणिस्तानमध्ये प्रवेश केला होता. ज्याचा फटका दोन्ही देशांना बसला होता. त्याउलट, २०२३ साली पाकिस्तानने कागदपत्रे नसलेल्या अफगाणी लोकांना, त्वरित देश सोडण्याचे आदेश दिले होते. फाळणी झाल्यानंतर पाकिस्तानचे दोन तुकडे झाले आणि त्यातील एक तुकडा अर्थात आताचा बांगलादेश झाला. त्या देशाची अवस्थादेखील संकटात आलीच आहे.
 
पाकिस्तानात हिंदू आता अल्पसंख्याक झाले असून, बांगलादेशातही तीच परिस्थिती येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शेख हसीना यांना राजीनामा देऊन बांगलादेश सोडून भारतात आश्रय घ्यावा लागला. फुटिरतावाद्यांनी बांगलादेश ताब्यात घेऊन, तरुणांची माथी भडकावून उरलीसुरली लोकशाहीदेखील नेस्तनाबूत केली. याचा सर्वाधिक फटका तेथील हिंदू नागरिकांना बसत असून, तिथे हिंदूंवरील अत्याचार वाढले आणि हिंदूना देश सोडण्यास बाध्य केले जात आहे. पाकिस्तानातही हिंदूंची परिस्थिती याहून भिन्न नाही. भारताचा विरोध, त्याचबरोबरीने हिंदूचा द्वेष करताकरता पाकिस्तान आणि पाकिस्तानाची अर्थव्यवस्था गटांगळ्या खात आहे. मानगुटीवर बसलेले चिनी भूतही पाकिस्तानला आता डोईजड झाले आहे. इमरान खान यांच्या पक्षावर बंदी घालून लोकशाहीसुद्धा नावापुरतीच राहिली आहे. त्यामुळे पाकिस्तानातील नागरिकांचे स्थलांतर पुढील काळात आणखी वाढण्याची शक्यता आहे.
Powered By Sangraha 9.0