एस. एस. राजामौली हे माझे द्रोणाचार्य : प्रवीण तरडे

24 Aug 2024 21:46:33
talk with praveen tarade


मराठी चित्रपटसृष्टी आपल्या अभिनय, लिखाण आणि दिग्दर्शनाने गाजवणारे प्रवीण तरडे यांनी ‘अहो विक्रमार्का’ या चित्रपटाच्या निमित्ताने तेलुगू चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे. दाक्षिणात्य अभिनेते पण मूळचे पुण्याचे असलेले देव गिल यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटात प्रवीण खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. याच चित्रपटाच्या निमित्ताने दै. ‘मुंबई तरुण भारत’ने त्यांच्याशी साधलेला सुसंवाद!


राजामौलींकडे निर्मात्यांनी खलनायक प्रवीण तरडेच हवा, असा हट्ट केला तेव्हा

‘अहो विक्रमार्का’ या मराठी आणि तेलुगू चित्रपटाच्या निमित्ताने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत काम करण्याचा अनुभव सांगताना प्रवीण तरडे म्हणाले की, “दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत खलनायक म्हणून पदार्पण करण्याचा अनुभव फार वेगळा होता आणि मुळात ‘अहो विक्रमार्का’ या चित्रपटाचे निर्माते आणि याच चित्रपटाचे अभिनेते देव गिल यांच्यामुळे खरंतर मला तेलुगू चित्रपटसृष्टीचा भाग होण्याची संधी मिळाली. त्यांचा स्वत:चा खूप मोठा चाहतावर्ग आहे आणि त्यांनी मलाही त्यांच्यात सामावून घेतलं, याचा मला विशेष आनंद आहे. ते स्वत: इतके नावाजलेले कलाकार आहेत आणि निर्माते म्हणून त्यांच्या पहिल्या मराठी आणि तेलुगू चित्रपटात मी खलनायक म्हणून काम करावं, अशी त्यांची इच्छा होती. शिवाय, त्यांचे गुरु दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांनाही त्यांनी प्रवीण तरडेच खलनायकाच्या भूमिकेत हवा असल्याचे अट्टहासाने सांगितले होते, ते ऐकून मला फार जबाबदारीचं माझं काम वाटलं होतं. कारण, चित्रपटात मी जी असुराची भूमिका साकारली आहे, त्यासाठी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गजांची नावे पुढे येत होती, पण असं असूनही माझ्या नावाचा विचार झाला, याचा मला अत्यानंद आहे. कारण, देव गिल म्हणाले होते की, मी पुण्यात जन्मलो आहे, मराठी माणूस आहे. मला महाराष्ट्रातलाच खलनायक माझ्या चित्रपटात हवा आहे आणि ते ऐकून कलाकार म्हणून माझ्यावर किती जबाबदारी आणि माझ्याकडून किती अपेक्षा आहे, याचीदेखील त्याक्षणी जाणीव झाली होती.”


एस. एस. राजामौली हे माझे द्रोणाचार्य!

दिग्दर्शकीय क्षेत्रात एस. एस. राजामौली हे गुरू आहेत, असं सांगताना प्रवीण तरडे म्हणतात की, “दिग्दर्शकीय क्षेत्रात माझ्यासाठी दिग्दर्शक एस. एस. राजामौली हे गुरुस्थानी आहेत. जसं एकलव्याला द्रोणाचार्य कधी भेटले नव्हते, पण त्यांच्याकडे पाहत पाहत एकलव्य मोठे झाले होते. अगदी तसंच माझ्यासाठी राजामौली हे माझे द्रोणाचार्य आहेत. त्यांच्या प्रत्येक चित्रपटांतून मी दिग्दर्शन शिकलो आहे. भव्यता, परंपरा, धर्म, देवदेवता, संस्कृती ही चित्रपटात कशी दाखवायची, तिला कसं योग्य स्थान आणि न्याय द्यायचा, हे मी त्यांच्याच चित्रपटात पाहून शिकलो आहे आणि आपल्या मराठी चित्रपटसृष्टीत त्याचं अनुकरण करण्याचा वारंवार प्रयत्न केला आहे.”


अभिनयाचे धडे मी पत्नी स्नेहलकडून घेतो

प्रवीण तरडे यांच्या पत्नी अभिनेत्री स्नेहल तरडे यादेखील नावाजलेल्या कलाकार आहेत. ज्यावेळी पहिल्यांदा असुराची भूमिका समोर आली, त्यावेळी त्यांची प्रतिक्रिया काय होती, याबद्दल सांगताना प्रवीण म्हणाले की, “ज्यावेळी पहिल्यांदा मला ‘अहो विक्रमार्का’ चित्रपटातील खलनायकाच्या भूमिकेसाठी विचारणा केली होती आणि माझा लूक मला पाठवला होता, तो मी आधी माझी पत्नी अभिनेत्री-दिग्दर्शिका स्नेहल यांना दाखवला होता आणि त्यांनी मला सांगितलं की, नक्कीच ही नवी भूमिका आणि नवी कलाकृती मी करायला हवी. कारण, त्या अतिशय सुंदर आणि अभ्यासू अभिनेत्री आहेत. मी अभिनयाचे धडे आजही त्यांच्याकडून घेतो. कारण, आजवर त्यांनी ज्या-ज्या चित्रपटांत अभिनेत्री म्हणून काम केलं आहे, त्या प्रत्येक भूमिकेसाठी त्यांना पुरस्कार मिळाला आहे.”


दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीकडून भव्यता आणि आपला चित्रपट पाहण्याची वृत्ती शिकावी

चित्रपटसृष्टीचा पायाच मुळात मराठी माणसाने रोवला आहे. त्यामुळे कोणत्याही अन्य भाषिक चित्रपटसृष्टीकडून मराठी चित्रपटसृष्टीने काही शिकण्याची गरज नाही. पण, काही बाबी आत्मसात करण्याची गरज आहे. त्याबद्दल बोलताना प्रवीण म्हणाले की, “मराठी चित्रपटसृष्टीने तसं पाहायला गेलं तर कुणाकडून काही शिकण्याची गरज नाही. कारण, आशयांच्या बाबतीत आपण फार समृद्ध आणि प्रगल्भ आहोत. जर काही बाबी आत्मसात करायच्या असतील तर त्यातील एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, मराठी चित्रपटांनी बजेटकडे थोडं लक्ष देणं गरजेचं आहे. मुळात मराठी प्रेक्षक फार चोखंदळ आहेत. काहीही दाखवलं तरी त्याला ते प्रतिसाद देतील असं नाही. त्यांच्या पुढ्यात येणारी प्रत्येक कलाकृती ते फार विचारपूर्वक पाहतात आणि त्यावर आपली प्रामाणिक मतं देतात. शिवाय, मराठी प्रेक्षकांना विषय पटला आणि मनापासून आवडला तरच ते चित्रपट पाहतात, अन्यथा ते पाहत नाहीत. त्यामुळे मराठी प्रेक्षक, दिग्दर्शक आणि संपूर्ण चित्रपटसृष्टीने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीकडून भव्यता आणि आपला चित्रपट पाहण्याची वृत्ती शिकावी.”


स्नेहल यांच्या दिग्दर्शनाखाली काम करायला आवडेल
 
‘फुलवंती’ या चित्रपटाच्या निमित्ताने स्नेहल प्रवीण तरडे या दिग्दर्शकीय क्षेत्रात पदार्पण करणार आहेत. त्याबद्दल बोलताना ते म्हणाले की, “स्नेहल तरडे यांच्या दिग्दर्शनाखाली मला अभिनय करायला फार आवडेल. खरंतर, स्नेहल यांचे सध्या धार्मिक, भारतीय संस्कृती आणि वेद परंपरा यावर एका चित्रपटासाठी अभ्यासपूर्वक लिखाण सुरू आहे. त्यामुळे या चित्रपटाचा मी भाग असेन की नाही, मला माहीत नाही, पण नक्कीच त्यांच्यासोबत काम करायला आवडेल. कारण, त्यांचा अभ्यास, व्यासंग आणि बैठक यावर त्यांची भक्कम पकड आहे आणि ती बाब त्यांच्याकडून नक्कीच शिकण्यासारखी आहे.”
 
तसेच, लवकरच प्रवीण तरडे दिग्दर्शित आणि लिखित ‘धर्मवीर 2’ हा चित्रपटदेखील प्रदर्शित होणार आहे.

 
Powered By Sangraha 9.0