जय ‘रघुवीर’

24 Aug 2024 22:05:23
raghuveer film review


दीर्घकाळ उत्सुकता असलेल्या समर्थ रामदासस्वामींच्या जीवनावर आधारित ‘रघुवीर’ हा बहुचर्चित चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. समर्थांचे अफाट समाजजागृतीचे कार्य, राष्ट्रनिर्मितीचे विचार, तर भक्ती आणि शक्तीच्या माध्यमातून समाजात चैतन्य निर्माण करण्याचे त्यांचे प्रयत्न, हे कोणत्याही काळात आदर्शवतच म्हणावे लागतील. ‘रघुवीर’ या चित्रपटातून तेच विचार पुढे नेण्याचा प्रयत्न झाला आहे. ‘रघुवीर’ या चित्रपटाचा एक कलाकृती म्हणून घेतलेला आढावा..!

एक काळ असा होता, की जेव्हा स्वहित आणि स्वधर्म यांचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी देशवासीयांना असंख्य सुलतानी संकटांना सामोरे जावे लागले. वरून रयतेच्या मानेवर बारमाही दुष्काळाचे आस्मानी जोखड कायमचेच बसलेले. महाराष्ट्रातील वीरांची मनगटे ही सुलतानांच्या चाकर्‍या करण्यातच झुकलेली असायची. स्वधर्माची चाड उरलेली नव्हती अन् मातृभूमीच्या लज्जारक्षणाची इच्छाही! अशावेळी ‘हर हर महादेव’च्या उद्घोषाने उभ्या महाराष्ट्राच्या दर्‍याखोर्‍यांतून आणखीन एक गर्जना घुमली, ती म्हणजे ‘जय जय रघुवीर समर्थ’ आणि या गर्जनेने जशी भक्तांची मनगटे मजबूत केली, तसेच शक्तीच्या उपासनेने दासांना देवकाजाचे कार्य करण्यास समर्थही केले. ‘देशद्रोही तितुके कुत्ते। मारोनी घालावे परते। देवदास पावती फत्ते। यदर्थी संदेह नाही॥’ असे म्हणत, या महाराष्ट्राच्या नवतरुणांना लढायची दिशा दाखवली आणि गावागावांत भक्ती आणि शक्तीचे तेज असणारी तरुण पिढी उभी केली, असे थोर व्यक्तिमत्त्व म्हणजे समर्थ रामदास स्वामी होय! अशाच दिव्य विभुती असणार्‍या समर्थांच्या आयुष्यावर आधारित ‘रघुवीर’ हा चित्रपट शुक्रवार दि. 23 ऑगस्ट रोजी महाराष्ट्रभर प्रदर्शित झाला असून, समर्थांच्या आयुष्यातील निवडक घटनांचाच वेध घेण्याचा प्रयत्न या चित्रपटाच्या माध्यमातून करण्यात आला आहे.

चित्रपटाच्या कथानकाबद्दल सांगायचे झाल्यास, कथेची सुरुवात ही समर्थांच्या जन्मापासून सुरू होते आणि तिची सांगता समर्थांच्या समाधीने होते. संपूर्ण कथानकात मध्यंतरीच्या काळात समर्थांच्या आयुष्यातील काही निवडक प्रसंग दाखवण्यात आले आहेत. यामध्ये त्यांचे बालपण, विवाहप्रसंग, रामाच्या शोधार्थ भ्रमंती, मठ स्थापनेचे कार्य अशा अनेक घटनांभोवती कथानक वेगाने फिरत राहते. तसेच या कथानकात समर्थांच्या आयुष्यातील अनेक घटना दाखवल्या आहेत. यामध्ये विहिरीतून भगवंताची मूर्ती काढतानाचा आणि मुस्लीम सत्ताधीशाच्या अरेरावी आणि मनमानीपणावर चातुर्याने मात करतानाचा प्रसंग विशेष लक्षवेधक ठरावा. तसेच दीर्घकाळानंतर आईची भेट झाल्यानंतरचा प्रसंग प्रत्येक मातृभक्ताच्या मनाला पाझर फोडणारा असाच. मात्र, या प्रसंगातूनच व्यक्तिगत सुखापेक्षा राष्ट्रहित मोठे, हा संदेशही पोहोचवण्यात कथानक यशस्वी झाले आहे. तसेच शिखांचे गुरु गुरु हरगोविंदसिंहजी यांच्याशी समर्थांशी झालेली भेटदेखील चित्रपटात दाखवण्यात आली आहे. ही भेट म्हणजे ‘शमप्रधानेषु तपोधनेषु गूढं हि दाहात्मकमस्ति तेज..!’ अर्थात, क्षमेची मूर्ती असणार्‍या तपोनिधीच्या मनातदेखील गूढ असे दाहक तेजही असते, या विचारांची प्रत्यक्ष साक्षच म्हणावी लागेल. समर्थांचे कार्यच इतके व्यापक आहे, की ते मोठ्या पडद्यावर दाखवण्याला नैसर्गिक मर्यादा येणारच. तरीही कथानकामध्ये समर्थांचे पांडुरंग दर्शन किंवा छत्रपती शिवाजी महाराजांना अफजलखानाच्या भेटीच्या वेळी सावध करणारे पत्र व समर्थांच्या जीवनकार्यातील असेच काही अन्य महत्त्वाचे प्रसंग दाखवले असते, तर या चित्रपटाची शोभा अधिक वाढली असती. मात्र, छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थांच्या भेटीचा चित्रीत केलेला प्रसंग हे दिग्दर्शकाने केलेले धाडस निश्चितच कौतुकास पात्र आहे.

चित्रपटाच्या दृष्टीने आणखीन एक महत्त्वाचा भाग म्हणजे, चित्रपटातील परिसर. हा परिसरच चित्रपटातील काळाला जिवंत करत असता आणि या बाबतीत हा चित्रपट यशस्वी झाला आहे. चित्रपटातील प्रत्येक क्षण हा त्याच काळातील असल्याचे भासवतो, यात दुमत नाही. मात्र, काही ठिकाणी आधुनिक तंत्रज्ञानाचा केलेला वापर सहज लक्षात आल्याखेरीज राहत नाही. चित्रपटातील काळ जिवंत करण्यास अजून एक घटक साहाय्यकारी होतो तो म्हणजे, पात्रांच्या तोंडी असणारी भाषा. चित्रपटात असणारी भाषा ही, त्या काळातील प्रत्येक पात्राच्या व्यक्तिरेखेला साजिशी अशीच. त्यामुळे सगळेच प्रसंग अधिकच खुलले आहेत. मुळातच, चित्रपटातील व्यक्तिरेखा आणि त्यासाठी केलेली कलाकारांची निवड यथायोग्य म्हणावी लागेल. मुळातच समर्थांची भूमिका विक्रम गायकवाड यांनी उत्तमरित्या साकारली आहे. तसेच संत वेण्णाबाई यांचे पात्र साकारण्यात अनुश्री फडणीस यांना यश आले आहे. चित्रपटातील मुख्य तसेच साहाय्यक व्यक्तिरेखा साकारणार्‍या प्रत्येक कलावंतांनी आपल्या भूमिकेला अचूक न्याय दिला आहे. बालपणातील खोडकर नारायणदेखील उत्तम साकारला गेला आहे. तसेच चित्रपटात प्रासंगिक विनोदनिर्मितीचा समतोलदेखील उत्तम राखण्यात आला आहे.

कोणत्याही चित्रपटाच्या दृष्टीने संवादाइतकेच महत्त्व असते ते संगीताला. संगीत चित्रपटातील घटनांचा प्रभाव अधिक अधोरेखित करते. ‘रघुवीर’ या चित्रपटातदेखील संगीताचा वापर खुबीने करण्यात आला आहे. चित्रपटात वापरलेले पार्श्वसंगीत अपेक्षित भाव निर्माण करण्यात यशस्वी झाले आहे. मुळातच संगीत हे चित्रपटाचे मूळ नसून, ते या कलाकृतीत साहाय्यकाच्या भूमिकेत असल्याचे भान चित्रपट दिग्दर्शकांनी पाळलेले दिसते. चित्रपटात कुठेही संगीत हे मूळ उद्दिष्टापासून भरकटलेले नाही. चित्रपटात अनेक प्रसंगी समर्थांच्या श्लोकांचा वापरही सुरेखरित्या करण्यात आला आहे. समर्थांची साहित्यसंपदा विपुल आहे. त्याचाही वापर दिग्दर्शकाने यामध्ये करण्यास वाव होता. समर्थांनी त्यांचे साहित्य निर्माण करताना जसा श्लोकांचा आधार घेतला, तसेच त्यांनी अभंगरचनादेखील केली आहे. समर्थांचे अनेक अभंग प्रसिद्ध असून, ते आजही प्रेक्षकांना तोंडपाठ आहेत. त्यामुळे समर्थांच्या अभंगांची या चित्रपटात कल्पकतेने गुंफण करता आली असती.

एकूणच समर्थांच्या जीवनचरित्रावर आधारित हा चित्रपट समर्थांचे जीवनकार्यच प्रेक्षकांसमोर मांडण्याचा प्रयत्न करताना दिसतो. या चित्रपटात समर्थांना शक्ती आणि भक्ती याबाबत भोळ्या जनांना जागृत करताना दाखवले आहे. मात्र, हे करताना ‘नारायण ते रामदास’ होण्यापर्यंतचा प्रवास खूपच वेगाने पळवला आहे. मध्यंतरानंतर हा वेग अधिकच तीव्र झाल्यासारखा वाटतो. समर्थांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांची कारकीर्द पाहिली आहे. मात्र, चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांचा नसलेला उल्लेख हा विस्मयकारकच म्हणावा लागेल. परिणामी समर्थांना झालेले कष्ट, सोसलेले देहदंड यावर चित्रपट भाष्य करत नाही. तसेच कथानकातील अनेक प्रसंग इतक्या वेगाने दाखवण्यात आले आहेत, की ते बघताक्षणीच लक्षात येण्यास काहीशी अडचण निर्माण होते. मात्र, असे असले तरी समर्थांचे एकूणच जीवकार्य, त्यांचे विचार आणि त्याचा एकूणच समाजावर झालेला सकारात्मक परिणाम यांच्या माध्यमातून समर्थांची व त्यांच्या कार्याची महती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यात हा चित्रपट नक्कीच यशस्वी झाला आहे.

चित्रपट : रघुवीर
दिग्ददर्शक : निलेश अरुण कुंजीर
कलाकार : विक्रम गायकवाड, ऋतुजा देशमुख, नवीन प्रभाकर, राहुल मेहेंदळे, विघ्नेश जोशी, अनुश्री फडणीस
पटकथा, संवाद : अभिराम भडकमकर
रेटिंग : ***


कौस्तुभ वीरकर 

Powered By Sangraha 9.0