रशिया-युक्रेन युद्ध : युद्धविराम आणि वाटाघाटींची शक्यता

24 Aug 2024 22:25:26
pm narendra modi ukraine tour


भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच युक्रेनला भेट दिली. या दौर्‍यादरम्यान पंतप्रधान मोदी यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होल्दोमीर झेलेन्स्की यांच्याशी विविध विषयांवर चर्चाही केली. तसेच रशिया-युक्रेन दरम्यान शांततेसाठी महत्त्वाची भूमिका बजावण्यासाठी भारत सज्ज असल्याचेही मोदींनी यावेळी प्रकर्षाने अधोरेखित केले. त्यामुळे आगामी काळात रशिया-युक्रेन युद्धावर भारताच्या मध्यस्थीने तोडगा निघतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

पंतप्रधान मोदी यांनी युक्रेन दौर्‍यापूर्वी मॉस्कोमध्ये रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचीही भेट घेतली होती. त्यानंतर आता मोदींचा कीव्ह दौराही यशस्वीरित्या संपन्न झाला आहे.

युक्रेनबरोबरच्या रशियाच्या युद्धावर भारताने प्रारंभीपासून तटस्थ भूमिका स्वीकारली आहे. भारताचे मॉस्कोशी ऐतिहासिक संबंध आहेत. भारताने युद्धावर पुतीन यांच्यावर टीका करणे टाळले असले, तरी संघर्ष संपवण्यासाठी त्यांना वारंवार शांततेचे आवाहन करण्यात आले आहे. मॉस्कोसोबतचे संबंध कायम ठेवण्यासाठी भारताने पाश्चिमात्य देशांच्या दबावाचा देखील प्रतिकार केला आहे.


दोन्ही देशांना सैनिक, दारूगोळा आणि क्षेपणास्त्रांची कमी

रशिया-युक्रेन युद्ध गेल्या अडीच वर्षांहून सुरू आहे. हे युद्ध केव्हा संपेल, याविषयी आज कुणीही सांगू शकत नाही. या युद्धामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान, मोठी शस्त्रे, दारूगोळा यांचा प्रचंड वापर झाल्यामुळे, दोन्ही बाजूला हजारो सैनिकांचा मृत्यू झाला. हजारो जखमी झाले. हजारो सैनिक युद्धकैदी झाले आणि अनेक पळून गेले आहेत. ज्यामुळे रशिया आणि युक्रेनला सैनिकांची कमतरता जाणवत आहे. युद्धाची तीव्रता कमी होण्याचे मुख्य कारण आहे, लढण्याकरिता सैनिकांची कमी.

याशिवाय दोन्ही बाजूंना दारूगोळा आणि क्षेपणास्त्रांच्या कमतरतेलाही तोंड द्यावे लागत आहे. कारण, क्षेपणास्त्रे फ़ायर झाली की, ती पुन्हा वापरता येत नाही. नवीन क्षेपणास्त्रे बनवणे खर्चिक असते. क्षेपणास्त्रांची किंमत ही शंभर कोटींपासून तर दहा हजार कोटी रुपये इतकी असू शकते.

क्षेपणास्त्रांच्या फ़ायरिंगमुळे नौदलाची मोठी लढाऊ जहाजे पांढरा हत्ती बनली आहे. कारण, लांबून अशा जहाजांवरती फायर करून त्यांना बुडवता येते. नेमके हेच रशियाच्या नौदलाच्या बरोबर झालेले आहे.


युक्रेनचा हल्ला ‘बचावात्मक प्रतिहल्ला‘

दि. 24 फेब्रुवारी 2022 रोजी रशियाचे अध्यक्ष पुतीन यांनी युक्रेनवर आक्रमण केले. आता रशियावर प्रथमच युक्रेनने प्रतिहल्ला केला आहे. युक्रेनचा हा हल्ला ‘बचावात्मक प्रतिहल्ला’ आहे. रशिया मानतो की डॉनेत्स्क आणि लुहान्स्क हे रशियाचेच आहेत. युक्रेनच्या समावेशातून ‘नाटो’ देशांचा विस्तार रोखण्यासाठी बचावात्मक कारवाई आवश्यक होती. म्हणून पुतीन यांनी युक्रेनवर आक्रमण केले होते .

युक्रेनच्या तिप्पट सैन्य आणि सामग्री रशियाकडे आहे. तरीदेखील रशियात घुसून तेथील भूभाग ताब्यात घेण्याची आक्रमक कारवाई युक्रेनने गेल्या आठवड्यातच केली. त्याकरिता युक्रेनच्या युद्ध नेतृत्वाला दाद द्यावी लागेल. युक्रेनच्या या अनपेक्षित/अचानक हल्ल्यामुळे रशियन सैन्य, पुतीन सरकार आणि रशियाच्या गुप्तहेर यंत्रणा आश्चर्यचकित झाल्या आहेत.

दि. 6 ऑगस्ट रोजी सुरू झालेल्या कारवाईला थोपवणे रशियाला अजूनही शक्य झालेले नाही. उलट, ज्या ठिकाणी युक्रेनचा हल्ला झाला, त्या आणि आजूबाजूच्या प्रदेशांमधून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी कारवाई सध्या सुरु आहे. दोन प्रांतांमध्ये आणीबाणी जाहीर झाली आहे. मात्र, आता युक्रेन सैन्य रशियाच्या अजून किती आत जाऊ शकेल, किती भागावरती आपले नियंत्रण मिळू शकेल, हे आत्ताच सांगता येत नाही. कारण, रशियाने युक्रेनच्या सैन्यावरती प्रतिहल्ले सुरू केले आहेत.


विविध कारणांमुळे युक्रेनचा रशियावर हल्ला

विविध कारणांमुळे युक्रेनने रशियावर हल्ला केला. कुर्स्क प्रांतामध्ये एक हजार चौरस किलोमीटरचा भूभाग युक्रेनच्या ताब्यात आला आहे. रशियाने 76 हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे. या हल्ल्यामुळे पुतीनही चकित झाले, हे उघड आहे. हल्ल्यामागे युक्रेनची लष्करी कारणे होती. युक्रेनच्या पूर्वेस रशियाच्या सैन्याची मोठी जमवाजमव होत होती. आता तेथून काही सैन्य कुर्क्सच्या रक्षणासाठी पाठवले गेले आहे, ज्यामुळे रशियाचा डॉनेत्स्कसारख्या प्रांतांमधील दबाव कमी होईल.

कुर्स्कमध्ये रशियाचे अनेक सैनिक व नागरिक युक्रेनच्या ताब्यात आले आहेत. त्यांना ओलीस ठेवून रशियाशी युक्रेनच्या युद्धकैद्यांच्या मुक्ततेविषयी वाटाघाटी सुरु झाल्या आहेत. याशिवाय कुर्स्क सीमेवर एक ‘बफर’ क्षेत्र निर्माण झाली आहे. याचा परिणाम म्हणजे रशियाने डॉनेत्स्कमधून कुर्स्ककडे कुमक रवाना केली आहे. कुर्स्क हल्ल्यामुळे रशियाचे युद्ध कौशल्य आणि युद्धसिद्धतेतल्या मर्यादा उघड झाल्या आहेत. ज्या सहजतेने रशियाच्या हद्दीत कित्येक किलोमीटर आत युक्रेनच्या फौजा जाऊ शकल्या, ते पाहता युक्रेन आणखी काही आघाड्यांवर अशा कारवाया करू शकतो, अशी शक्यता आहे.



युद्धक्षमता टिकवून ठेवणे युक्रेनसमोरचे सर्वात मोठे आव्हान

युक्रेनचा 20 टक्के भूभाग सध्या रशियाने व्यापला आहे. यात दहा वर्षांपूर्वी ताब्यात घेतलेल्या क्रीमिया प्रांताचाही समावेश आहे. क्रीमिया गिळंकृत केल्यानंतरसुद्धा पश्चिमी देश आणि अमेरिकेने काही केले नाही. त्यामुळे पुतीन यांचे मनोबल वाढले आणि त्यांनी युक्रेनवरती हल्ला केला. मात्र, युक्रेनने रशियाला कडवा प्रतिकार केला. दोन्ही देशांतील सैनिकी संख्याबळाची तफावत पाहता, युक्रेन फ़क्त काही महिने टिकाव धरू शकेल असे काहींना वाटले. तसे काही घडले नाही. युक्रेनने चिवट प्रतिकार केला आणि अद्यापही करत आहे. अर्थात, युक्रेनला मोठ्या प्रमाणामध्ये अमेरिका आणि युरोपच्या राष्ट्रांची दारूगोळा, क्षेपणास्त्रे तंत्रज्ञान यामध्ये मदत झाली आहे.

युक्रेनमध्ये मनुष्यहानीचा प्रश्न गंभीर आहे. शहरांमध्ये होणार्‍या हल्ल्यांमुळे युक्रेनची अर्थव्यवस्था डबघाईला आली असून, पाश्चिमात्य देशांच्या मदतीवर अवलंबून आहे. युरोपमध्येही काही देशांत पुतीन समर्थक आहेत. युरोपीय समुदाय, ‘नाटो’च्या छत्राखाली राहूनही युक्रेनला मदत पुरवण्याबाबत ही सरकारे नाराज आहेत.

युक्रेनला अधिक विध्वंसक आणि लांब पल्ल्याची शस्त्रास्त्रे देण्याची इच्छा असूनही अमेरिका किंवा जर्मनीला ती देता येत नाहीत. कारण, यास या दोन्ही देशांचा युद्धातील थेट सहभाग मानून अधिक तीव्रतेने हल्ले करण्याची किंवा युद्धाची व्याप्ती वाढवण्याची पुतीन यांची धमकी आहे.

अमेरिकेमध्ये डोनाल्ड ट्रम्प अध्यक्षपदी विराजमान झाल्यास तेथून मदतीचा ओघ थांबणार आहे.

यामुळे येणार्‍या काळामध्ये आपली युद्धक्षमता लांब युध्दाकरिता टिकवून ठेवणे हे युक्रेनसमोरचे सर्वात मोठे आव्हान आहे.

रशियाची युद्ध लढण्याची क्षमता युक्रेनपेक्षा जास्त


अनेकविध निर्बंध लादले गेले आणि या युद्धात अपरिमित हानी झाली तरी रशियाची अर्थव्यवस्था आजही सुस्थितीत आहे. कारण, रशियाचा अनेक देशांशी व्यापार सुरू आहे. भारत हा रशियन खनिज तेलाचा सर्वांत मोठा खरेदीदार आहे. त्याहीपेक्षा चीन, उत्तर कोरिया आणि इराणकडून दारूगोळा आणि इतर सामग्री रशियाला मिळत आहे. यामुळे रशियाची युद्ध चालू ठेवण्याची क्षमता ही युक्रेनपेक्षा जास्त आहे. रशियन सैनिकांच्या युद्धामध्ये मारले जाण्याविषयी रशियाला फारशी चिंता नाही. रशियाची लोकसंख्या ही युक्रेनपेक्षा पुष्कळ जास्त असल्यामुळे सैनिकांची कमी रशियाला अजून तरी वाटत नाही.


युद्ध की वाटाघाटी?

आज युद्ध युक्रेनने रशियन भूमीवर वळवले आहे. अडीच वर्षांच्या युद्धानंतरसुद्धा युक्रेनची रशियाच्या आत जाऊन हल्ला करण्याची क्षमता आहे. यामुळे रशियाला एक मोठा धक्काच बसला आहे.

याशिवाय युक्रेनने आपल्या मित्रराष्ट्रांना म्हणजे अमेरिका आणि युरोपला एक संदेश दिला आहे की, त्यांची लढण्याची क्षमता खूप आहे. मात्र, त्यांना शस्त्रास्त्रांची आणि दारूगोळ्याची मदत जरुरी आहे, ती लवकरात लवकर केली जावी, ज्यामुळे युक्रेन रशियाला वाटाघाटीच्या टेबलवरती आणू शकतो.

सध्याच्या परिस्थितीमध्ये रशिया किती आक्रमकता दाखवू शकतो, यावर युद्धाची पुढची दिशा ठरेल. मात्र, वाटाघाटी करून शांतता प्रस्थापित करणे हा सुद्धा पर्याय दोन्ही देशांसमोर आहे.

पंतप्रधान मोदींच्या युक्रेन दौर्‍याचे फलित युद्धविरामात होईल, अशी अपेक्षा आहे. तसे झाले तर हा भारताच्या मुत्सद्देगिरीचा सर्वात मोठा विजय असेल.


(नि.) ब्रि. हेमंत महाजन
Powered By Sangraha 9.0