दहिसर : महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य विभागाची ‘महाराष्ट्र राज्य गुजराती साहित्य अकादमी’ आणि ‘लोकायन सांस्कृतिक संस्था, मुंबई’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘गप्पा लोककलेच्या, महाराष्ट्र आणि गुजरातच्या’ या अभ्यासात्मक आणि सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी ३१ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता दहिसरमधील समाज कल्याण सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे. डॉ. मोनिका ठक्कर यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम साकार होणार आहे. जगदीशभाई ओझा यांचा या कार्यक्रमात विशेष सहभाग असणार आहे. भागवत कथाकार मीनाबेन जोशी यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे. वक्त्या डॉ. मोनिका ठक्कर या कार्यक्रमात ‘महाराष्ट्रातील लोककला’ या विषयावर व्याख्यान देणार असून डॉ. शिवाजी वाघमारे आणि वृंद त्यांना सांगीतिक साथ देणारे आहेत. वक्ते डॉ. दिपक पटेल ‘गुजरातच्या लोककला’ या विषयावर व्याख्यान देणार असून धानी चारण आणि वृंद त्यांना सांगीतिक साथ देणार आहेत. या व्याखानांसोबतच डॉ. मोनिका ठक्कर लिखित ‘भुलाजा भुलाबाई के लोकगीतों का उद्देश और अर्थ’ या पुस्तकाचे प्रकाशन सुद्धा या कार्यक्रमात होणार आहे. मुंबई विद्यापीठाचे माजी प्राध्यापक प्रा. सुरेंद्र तन्ना यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. हा कार्यक्रम विनामूल्य असणार आहे.