जूनमध्ये 'इएसआय' योजनेंतर्गत लाखो युवा कामगारांची नावनोंदणी
24 Aug 2024 17:07:07
मुंबई : कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या योजनेंतर्गत नवीन कामगारांची नावनोंदणी करण्यात आली आहे. जून २०२४ मध्ये तब्बल २१.६७ लाख नवे कर्मचारी जोडले गेले आहेत. दरम्यान, विमा महामंडळाकडून जारी करण्यात आलेल्या तात्पुरत्या वेतनश्रेणीच्या आकडेवारीनुसार नव्या कर्मचारी संख्येत वाढ दिसून आली आहे.
दरम्यान, जून २०२४ मध्ये १३,४८३ नवीन आस्थापना कर्मचारी राज्य विमा योजनेच्या सामाजिक सुरक्षा कक्षेत आणल्या गेल्या आहेत. या माध्यमातून नव्या कामगारांची सामाजिक सुरक्षा सुनिश्चित करता येईल. याशिवाय, मे २०२३ च्या तुलनेत निव्वळ नोंदणीमध्ये ७ टक्के वाढ झाल्याचे वार्षिक विश्लेषणातून दिसून आले आहे.
नव्याने नोंदणी झालेल्या कर्मचाऱ्यांमध्ये १०.५८ लाख कर्मचारी २५ वर्षे वयोगटातील असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. तसेच, वेतनश्रेणीच्या डेटाचे लिंगनिहाय विश्लेषणात जून २०२४ मध्ये महिला सदस्यांची निव्वळ नोंदणी ४.३२ लाख इतकी असून ५५ तृतीयपंथी कर्मचाऱ्यांनी जून महिन्यात कर्मचारी राज्य विमा योजनेअंतर्गत नोंदणी केली आहे.