१०० वर्षांनी पहिल्यांदाच प्रकाशित झाली 'श्री बिंबाख्यानची' इंग्रजी आवृत्ती

24 Aug 2024 16:56:50

bimbakhyan 
 
मुंबई - एशियाटिक सोसायटीच्या मुंबई संशोधन केंद्राद्वारे आयोजित 'श्री बिंबाख्यान' या पुरातत्वशास्त्र व इतिहासतज्ञ संदीप दहिसरकर संपादित इंग्रजी पुस्तकाच्या प्रकाशनाचा कार्यक्रम शुक्रवारी (दि.२३ ऑगस्ट)तेथील दरबार रोजी हॉलमध्ये संपन्न झाला.सदर कार्यक्रमास ज्येष्ठ लेखक व संशोधक डॉ. सदानंद मोरे हे प्रमुख अतिथी तर फलटण संस्थानाचे युवराज अनिकेतराजे रामराजे नाईक निंबाळकर विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजक व एशियाटिक सोसायटीच्या अध्यक्षा डॉ. विस्पी बालपोरिया व मुंबई संशोधन केंद्राच्या प्रमुख डॉ. शेहरनाज नलवाला देखील तेथे उपस्थित होत्या. मुंबईच्या इतिहासावरील अत्यंत महत्त्वाचा दस्तऐवज म्हणजेच इतिहासाचार्य वि.का.राजवाडे संपादित 'महिकावतीची बखर' म्हणजेच 'श्री बिंबाख्यान' होय, हे आपल्या संशोधनातून संदीप दहिसरकर यांनी सिद्ध केले. इतिहासाचार्य राजवाडे यांनी शंभर वर्षांपूर्वी १९२४ मध्ये हे पुस्तक प्रकाशित केले होते आणि त्याच वर्षी त्यांना एशियाटिक सोसायटीने 'ऑनररी फेलो' म्हणून सन्मानितही केले गेले होते. संदीप दहिसरकर यांनी शंभर वर्षांनी हे पुस्तक पहिल्यांदाच इंग्रजी मध्ये प्रकाशित केले आहे. पुण्यातील अपरांत प्रकाशन संस्थेने या पुस्तकाचे प्रकाशन केले आहे. दहिसरकर यांना भारत इतिहास संशोधक मंडळ, पुणे येथे लक्षुमण प्रभू नामक लेखकाद्वारे लिहिलेल्या एका जुन्या पोथीचा शोध लागला. ती पोथी देखील या पुस्तकात समाविष्ट करण्यात आली आहे. या पुस्तकाला प्रसिद्ध लेखिका व संशोधिका डॉ.अरुणा ढेरे यांची प्रस्तावना लाभली आहे. या प्रकाशन कार्यक्रमानंतर श्री अक्षय चवाण यांच्या बरोबर संदीप दहिसरकर यांनी या पुस्तकावर दीर्घ चर्चा केली.
 
 
Powered By Sangraha 9.0