नागपूर : फोडाफोडीचं राजकारण आणि जातीयवादाला केवळ शरद पवार जबाबदार आहेत, अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केली आहे. राज ठाकरे यावेळी स्वबळावर विधानसभा निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला असून यासाठी त्यांनी महाराष्ट्र दौरा सुरु केला आहे. ते सध्या विदर्भ दौऱ्यावर आहे. त्यांनी शनिवारी नागपूर येथे माध्यमांशी संवाद साधला.
राज ठाकरे म्हणाले की, "फोडाफोडीचं राजकारण आणि जातीयवादाला केवळ शरद पवार जबाबदार आहेत. शरद पवारांनीच महाराष्ट्रात या गोष्टींची सुरुवात केली. त्यांनी अनेक आमदार फोडलेत. त्यानंतर त्यांनीच जातीचं विषही कालवलं. १९९९ साली राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्माच्या आधीचा महाराष्ट्र आणि त्यानंतरचा महाराष्ट्र यात खूप फरक आहे. याआधी कधीच जातींमध्ये महापुरुषांची विभागणी झालेली नव्हती. संतांना संत म्हणूनच बघितलं जायचं. त्यांना जातींमध्ये बघितलं जात नव्हतं. पण या सगळ्या गोष्टी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर सुरु झाल्या. याआधी असा महाराष्ट्र कधीच नव्हता. त्यामुळे १९९९ पासून जातीजातींमध्ये विष पसरवणं सुरु झालं," असे ते म्हणाले.
हे वाचलंत का? - नेपाळमधील अपघातात जळगाव जिल्ह्यातील २४ जणांचा मृत्यू!
ते पुढे म्हणाले की, "लोकसभा निवडणूकीवेळी महाविकास आघाडीने संविधान बदलणार असे वक्तव्य केल्यामुळे तसे वातावरण तयार झाले. त्यामुळे देशातील जवळपास एक गठ्ठा दलित समाजाने मोदी आणि शाहांच्या विरोधात मतदान केलं. हे मतदान उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या प्रेमाखातर झालेलं नसून अँटी मोदी आणि अँटी शाह मतदान होतं. गेल्या पाच वर्षांत या लोकांनी केलेलं गलिच्छ राजकारण मतदार विसरणार नाहीत. या गोष्टींचा राग ते येणाऱ्या विधानसभा निवडणूकीत निश्चित काढतील," असेही ते म्हणाले.