"महिलांच्या सुरक्षिततेच्या बाबतीत राज्य सरकार..." : उपमुख्यमंत्री अजित पवार

24 Aug 2024 15:28:59

Ajit Pawar


यवतमाळ :
महिलांच्या सुरक्षिततेच्या बाबतीत राज्य सरकार डोळ्यात तेल घालून बघत आहे, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केले आहे. शनिवारी यवतमाळ येथे महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.
 
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, "अलिकडच्या काळात आम्ही काही चांगल्या योजना आणल्या. यातलीच एक मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना आहे. पण विरोधक या योजनेवर टीका करत आहेत. याविरोधात कोर्टात गेले. पण आज चांद्यापासून बांद्यापर्यंत महाराष्ट्रातील महिला या योजनेवर खुश आहेत. या योजनेवर महिलांचं काय मत आहे हे जरा विरोधकांनी येऊन बघावं."
 
हे वाचलंत का? -  मंत्री रक्षा खडसे नेपाळमध्ये दाखल! बस अपघातातील जखमींची केली विचारपूस
 
"कधीतरी काही गोष्टी चुकीच्या घडतात. काही विकृत माणसं असतात तर काही नराधम असतात. तिथे काही घडलं की, आमच्यावर टीका होते. पण सुरक्षिततेच्या बाबतीत राज्य सरकार डोळ्यात तेल घालून बघत आहे. आता स्वत: गृहमंत्र्यांनी साडे सात हजार पोलिस भरतीची ऑर्डर काढली. कुठेही कायदा सुविधा अडचणीत येऊ नये यासाठी कडक कायदे केले जात आहेत. परंतू, काही नराधम काही गोष्टी करतात आणि विरोधक त्याला या योजनेशी जोडण्याचा प्रयत्न करतात," असे ते म्हणाले.
 
ते पुढे म्हणाले की, "आजपर्यंत अनेक राज्यकर्ते होऊन गेलेत. त्यांच्या काळात वेगवेगळ्या घटना घडून गेल्यात. मी कुठल्याही घटनेचं समर्थन करणारा नाही. जो चुकीचा वागेल त्याला शासन झालंच पाहिजे. शक्ती कायदा मंजूर करून घेण्यासाठीही आमचा प्रयत्न सुरु आहे. ज्यावेळी अशा प्रकारची विकृत माणसं आमच्या मुलींच्या अंगावर हात टाकतात तेव्हा त्यांच्यावर अशा कायद्याचा बडगा टाकायला हवा की, पुन्हा त्यांच्या मनात तसा विचारही येणार नाही. माझ्या भाषेत सांगायचं तर त्यांचं सामानच काढून टाकलं पाहिजे. या सगळ्या प्रकारांबाबत सरकारने ठोस भूमिका घेतली आहे," असेही ते म्हणाले.
 
 
 
Powered By Sangraha 9.0