रसिका शिंदे-पॉल
मुंबई : समर्थ रामदास स्वामींचं जीवनचरीत्र रुपेरी पडद्याच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झालं आहे. 'रघुवीर' हा आगामी चित्रपट खऱ्या अर्थाने प्रभू श्रीराम भक्त आणि समर्थ रामदास स्वामींच्या अनुयायांसाठी एक पर्वणी ठरणार आहे. 'रघुवीर' या चित्रपटाद्वारे प्रथमच रामभक्त समर्थांचं जीवन जगासमोर येणार आहे. या चित्रपटात अभिनेते विक्रम गायकवाड यांनी समर्थांची भूमिका साकारली असून ती करताना आलेले अनुभव त्यांनी ‘दै. मुंबई तरुण भारत’शी बोलताना सांगितला.
माणूस म्हणून त्रास झाला...
रामदास स्वामींची भूमिका साकारता चित्रिकरण करतानाचा एक किस्सा सांगताना विक्रम म्हणाले की, “स्वामींची भूमिका करताना माणूस म्हणून जरा त्रास झाला. त्याचं कारण असं की, आम्ही वाड्याला आदिवासी भागात चित्रिकरण करत होतो. तो प्रसंग असा होता की त्या भागात समर्थांना जेवायला बोलावलं होतं आणि सगळ्यांसोबत ते जेवण करत असतात. तर ते शुट झाल्यावर तिथे बसलेल्या आदिवासी लोकांना आम्ही सांगितलं की आता जेवून घ्या जे ताटात वाढलं आहे ते. तर तिथे एक आदिवासी मुलगा बसला होता. आणि त्याने जेवण जेवायला नकार दिला. कारण, त्याच्या ताटात वाढलेलं श्रीखंड ही खाण्याचा पदार्थ आहे हेच त्याला माहित नव्हतं. तो म्हणाला की तुम्ही काहीतरी खाऊ घालत आहात. पण त्याचं ते उत्तर ऐकून व्यक्ती म्हणून मनात आलं की त्या बिचाऱ्या आदिवासी मुलाला श्रीखंड हा गोड खायचा पदार्थ आहे हे माहित नाही आहे हे ऐकून खरंच वाईट वाटलं होतं”.