पाकिस्तानमध्ये अहमदिया

22 Aug 2024 21:25:27
 Ahmadiyya crisis in Pakistan


पाकिस्तानमध्ये सुन्नी विरुद्ध शिया आणि दोन्ही मिळून अहमदिया विरुद्ध असे गृहयुद्ध सुरू आहे. कालपरवा तर अहमदिया दुश्मनीवरून हजारो सुन्नी पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयावर चाल करून गेले. ‘जमियत उलेमा-ए-इस्लाम’ आणि ‘जमात-ए-इस्लामी’ समवेत विविध धार्मिक संघटनांच्या कार्यकर्त्यांनी ‘मजलिस-ए-तहफ्फुज-ए-खतमे नबुव्वते’च्या बॅनरखाली आंदोलन केले.

या आंदोलनांंतर्गत हजारो सुन्नी मुसलमान पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयात घुसले. का, तर या न्यायाधीशांनी न्यायालयात दिलेला निर्णय सुन्नी मुसलमानांना रुचला नाही. न्यायाधीश काजी फैज इसा यांनी मुबारक सानी यांची निर्दोष सुटका केली. पाकिस्तानी सुन्नी मुसलमानांच्या मते, मुबारक यांनी ईशनिंदा केली. मुबारक सानी यांनी 2019 साली एका महाविद्यालयात ‘तफसीर-ए-सगीर’ पुस्तक वितरीत केले. अहमदिया समुदायाच्या संस्थापकांचे पुत्र मिर्जा बशीर अहमद यांनी या पुस्तकात ‘कुराण’ची व्याख्या लिहिली आहे.

पाकिस्तान आणि इतर सगळ्याच मुस्लीम देशांत मोहम्मद पैगंबर, कुराण किंवा इस्लामच्या विरोधात बोलणे, विचार करणे, कृती करणे हा भयंकर गुन्हा मानला जातो. असे करणार्‍याला ईशनिंदेअंतर्गत तत्काळ सजा होते. मृत्युदंडही ठोठावला जातो. मुबारक यांनी अल्ला किंवा पैगंबर यांची निंदा केली का? तर तसे नाही. मुबारक हे अहमदिया मुसलमान आहेत आणि त्यांनी अहमदिया मुसलमानांचा विश्वास असलेले पुस्तक वितरीत केले. जगभरच्या शिया-सुन्नी मुसलमानांच्या मते, अहमदिया हे मुळी मुस्लीमच नाहीत.

अहमदिया मुसलमानांचा इतिहास असा की, 1889 साली लुधियानामध्ये मिर्जा गुलाम अहमद यांनी एका सभेत जाहीर केले की, अल्लाने त्यांना सांगितले की तू ‘नबी’ आहेस आणि असे लोकांनी मान्य करावे. त्यांच्या या विधानावर तिथल्या लोकांनी विश्वास ठेवला. मग, हे लोक नबी म्हणून मिर्जा गुलाम अहमद यांना मानू लागले. मात्र, मोहम्मद पैगंबरांनंतर कुणी नाही, असा विश्वास असलेल्या इतर सगळ्या मुसलमानांनी मिर्जा गुलाम अहमद यांना ‘नबी’ मानणे, हे इस्लामविरोधी ठरवले. तेव्हापासून, अहमदियाविरोधात इतर सगळे मुसलमान ‘फिरसे’ संघर्षात उतरले. तरीही, अहमदिया मुसलमानांनी त्यांचा विश्वास कायम ठेवला.

पाकिस्तानमध्ये अहमदियांवर कायद्याने बंदी आहे. त्यांनी स्वतःला मुसलमान म्हणून घेतले, तरी त्यांना गुन्हेगार म्हणून सजा दिली जाते. असे असताना मुबारक सानी यांनी अहमदिया मुसलमानांचा विश्वास असलेले पुस्तक वितरीत करून ईशनिंदा केली, असे सुन्नी मुसलमानांचे म्हणणे. सानी यांचे म्हणणे की, अहमदियांचे साहित्य वितरीत करू नये, असा कायदा 2019 सालानंतर पाकिस्तानमध्ये आला. पुस्तक वितरीत करण्याचे साल 2019. कायदा लागू होण्यापूर्वीची घटना असल्यामुळे ते निर्दोष आहेत. सर्वोच्च न्यायालयानेही हे लक्षात घेऊन मुबारक यांची निर्दोष मुक्तता केली. मात्र, याचमुळे पाकिस्तानी सुन्नी मुसलमान संतापले. ते सर्वोच्च न्यायालयात घुसले. मुबारक यांची निर्दोष मुक्तता करण्याचा निर्णय न्यायालयाने 7 सप्टेंबरपर्यंत बदलावा, नाहीतर इस्लामाबाद पेटेल, असे सुन्नी मुसलमानांचे म्हणणे. आपल्या देशातही आंध्र वक्फ बोर्डाने मागे अहमदियांना मुस्लीम मानायला नकार दिला होता.

1992 साली भारतामध्येही अहमदियांच्या विरोधात पुस्तके वाटण्यात आली. त्यामध्ये अहमदियांना ‘वाजिब-उल-कत्ल’ म्हटले गेले. याचा अर्थ त्यांचा खून करणे हा गुन्हा नाही, तर दि. 14 जून 1997 रोजी दिल्लीमध्ये ‘ऑल इंडिया मजलिस-ए-तहफ्फुज खत्म-ए-नबुव्वत’ पत्रकार परिषदेद्वारे अहमदियांवर बहिष्कार करा, असे जाहीर केले. मात्र, भारतातील मुसलमान उघडउघड तरी असा भेद दाखवत नाहीत. मुसलमान म्हणून एकत्र होण्याची वेळ येते, तेव्हा इस्लाममधले 73 फिरके एकत्र येतात. जगभरात त्यांचे आपसात वाद असतील, मात्र भारतात हा वाद, संघर्ष ते दाखवत नाहीत.

बहुसंख्य हिंदू जातीपातींमध्ये विभागत असताना आपण मुसलमान म्हणून एकसंध राहिले पाहिजे, इतकी समज त्यांच्यात आहे. हिंदूंनो, शिका काहीतरी! बाकी पाकिस्तानमध्ये शिया-सुन्नी-अहमदिया आणि एकंदर इस्लाममधील फिरक्यांचा आपसातला संघर्ष पाहता इस्लाम म्हणून वेगळा झालेला पाकिस्तान पुढे शिया, सुन्नी, अहमदिया वगैरेंमध्ये खंडित होईल, असे द़ृश्य आहे. तथास्तु! आणि आमेनही!

9594969638
Powered By Sangraha 9.0