राजकीय गिधाडं

21 Aug 2024 21:49:23
supriya sule on womens harrasement cases


छत्र्यांचे हजारो कारखाने विकत घेऊ शकत असताना शरद पवार मागे पावसातच चिंब भिजले. दुसरीकडे, केवळ राजकारण म्हणून ‘माझे पोलीस संरक्षण काढून घ्या आणि लोकांचे रक्षण करा,’ असे म्हणणारी त्यांची लेक सुप्रिया सुळे. राजकारण करावे तर पवार-सुळे या बापलेकीने. वेळ बघून, लोकांचा कल बघून त्यात स्वतःला कसे चमकवायचे, हे रक्तातच असावे लागते म्हणा! असो. आता कुणीही सांगेल की, सुप्रिया सुळे यांना काय पोलीस प्रोटेक्शन आताच आहे. पूर्वीही होतेच की! मनसुख हिरेनचा खून झाला, पालघरमध्ये साधूंची हत्या झाली, सुशांत-दिशा यांचा खून की आत्महत्या ही द्विधा मानसिकता लोकांची झाली, तेव्हाही सुप्रिया यांना पोलीस संरक्षण होतेच. पण, तेव्हा बरे सुप्रिया यांना वाटले नाही की, अरेरे राज्यात इतके वाईट घडत आहे. उद्योगपतीच्या दारात स्फोटके ठेवली जात आहेत. शंभर कोटींचे षड्यंत्र रंगत आहे. आता आपले संरक्षण काढून त्या लोकांना देऊ. तेव्हा सुप्रिया सुळेंना अजिबात महाराष्ट्राच्या जनतेची काळजीबिळजी वाटली नाही. आताच वाटली. कारण, राज्यात सुप्रिया यांच्या महाविकास आघाडीची सत्ता नाही. याच त्या सुप्रिया सुळे ज्या ‘लव्ह जिहाद’च्या खुनी घटनांबद्दल म्हणाल्या होत्या, “मला ‘लव्ह’ माहिती आहे, पण ‘लव्ह जिहाद’ माहिती नाही.” कोलकात्याच्या घटनेतील ती डॉक्टर मुलगी किंवा ‘लव्ह जिहाद’मध्ये हकनाक क्रूरपणे मरणार्‍या त्या मुली याबद्दल सुप्रिया चकार शब्द उच्चारत नाहीत. का? त्या कू्ररपणे मारल्या गेलेल्या निष्पाप मुली माणूस नव्हत्या का? सुप्रिया जशी शरद पवारांची लाडकी लेक तशाच या मुलीसुद्धा त्यांच्यात्यांच्या आईबाबांच्या लाडक्या लेकीच होत्या. असो. बदलापूरच्या घटनेतल्या आरोपीला कठोरातली कठोर शिक्षा व्हायलाच हवी. मात्र, या घटनेवरून लोकांमध्ये असंतोष आहे. चला, याचा फायदा घेऊन सरकारच्या विरोधात लोकांना चिथावू, असे म्हणत नेहमीचे तेच विरोधी पक्षाचे राजकारणी पुढे सरसावलेत. त्यामध्ये सुप्रिया सुळे आहेतच. खरेतर, अशा घटना होऊच नये, यासाठी ठोस योजना आखू, असे सर्व सत्ताधारी आणि विरोधी पक्षानेही एकमताने ठरवायला हवे. मात्र, तसे न वाटता, तसे न म्हणता विरोधी पक्ष राजकारण करत आहेत. हे असले राजकारणी म्हणजे माणूस कधी मरतो आणि कधी त्याला खातो, याची वाट पाहणारी गिधाडंच!


क्रूर राजकारणाचे दुकान


कोलकात्यामध्ये महिला निवासी डॉक्टरची निर्घृण हत्या झाली, उरणमध्ये युवती ‘लव्ह जिहाद’चा बळी ठरली. या दोन्हीही घटनांमध्ये पीडितांवर अनन्वित अत्याचार झाले. मात्र, या दोन्ही घटनांमध्ये राहुल गांधीच काय, त्यांची बहीण प्रियंका यांनीही ब्र शब्द उच्चारला नाही. मात्र, परवा राहुल गांधी उत्तर प्रदेशमध्ये गेले होते. तिथे एका युवकाची हत्या झाली. राहुल गांधी तिथे का गेले, तर त्यांच्या राजकीय खेळीला साजेसे वातावरण होते म्हणून. जसे त्यांना आता उत्तर प्रदेशमध्ये खासदार म्हणून टिकून राहायचे आहे. मृत पावलेला दुर्दैवी तरुण मागासवर्गीय समाजाचा होता. राहुल गांधी त्या मृत तरुणाला भेटायला गेले, म्हणजे नक्कीच त्या तरुणाचा खून करणारी व्यक्ती हिंदू धर्मातलीच! पण, दुसर्‍या जातीची असणार. त्यामुळे हिंदू धर्मात फूट पाडायला हिंदू जातीत विभागणी करायला चांगली संधी होती, हे हेरूनच हे महाशय तिथे गेले असतील, असे लोकांचे म्हणणे आहे. तिथे गेल्यावर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. तेव्हा एका पत्रकाराने त्यांना विचारले की, कोलकात्यामध्ये डॉक्टरची निर्घृण हत्या झाली, तुम्ही काय म्हणाल? यावर ‘मोहब्बत की दुकान’ मांडणार्‍या राहुल गांधींनी म्हटले, ”मी जाणतो आहे, मला माहिती आहे, तुम्हाला या उत्तर प्रदेशातील घटनेला दुर्लक्ष करून या घटनेवरून तुम्हाला लोकांचे लक्ष भरकटवायचे आहे.” खरेतर, न्यायी वृत्तीच्या आणि दयाळू वृत्तीच्या माणसाला त्यातही देशाचे पंतप्रधान होण्याची स्वप्न पाहणार्‍या माणसाला देशातील सगळ्याच घटनांत समान न्याय आणि दया वाटायला हवी. ही घटना उत्तर प्रदेशातली. तिथे भाजपचे राज्य आहे, म्हणून घडणार्‍या गोष्टींवर आगपाखड करायची. त्याउलट प. बंगालमधल्या डॉक्टर मुलीवर भयंकर अत्याचार झाला तरी मूग गिळून गप्प बसायचे. कारण, तिथे ममता बॅनर्जींचे राज्य आहे. हे सगळे राहुल गांधींचा दुटप्पीपणा उघड करतात. राजकारण कशासाठी? स्वतःसाठी, कुटुंबासाठी, समाजासाठी की देशासाठी? अर्थात, आजकाल स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी राजकारण करणारे खूप लोक आहेत. या परिक्षेपात राहुल गांधींचे राजकारण देश आणि समाजाला जोडते की तोडते याचा मागोवा घेतला तर? तर वाटते त्यांचे ‘मोहब्बतचे दुकान’ हे ‘मोहब्बत’चे नव्हे, तर क्रूर स्वार्थी राजकारणाचे दुकान आहे आणि हे वेळोवेळी सिद्ध झाले आहे.

9594969638
Powered By Sangraha 9.0