उद्धव ठाकरेंच्या गळ्यात काँग्रेसचा पट्टा

20 Aug 2024 19:24:53
uddhav thackeray statement


मुंबई :       'उबाठा'ने काँग्रेसची लाचारी पत्कारल्याची टीका महायुतीच्या नेत्यांकडून सुरू असताना, उद्धव ठाकरेंनी गळ्यात चक्क काँग्रेसचा पट्टा (उपरणे) घातल्याने चर्चांना उधाण आले आहे. याची चर्चा होईल, याचा अंदाज आल्याने त्यांनी भाषणात सारवासारव करीत विषय हसणवारीवर नेला.

काँग्रेसच्या सद्भावना दिवसानिमित्त आयोजित संकल्प मेळाव्याला मंगळवार, दि. २० ऑगस्ट रोजी उद्धव ठाकरेंनी हजेरी लावली. या वेळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, शरद पवार, काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह वरिष्ठ नेते उपस्थित होते. कार्यक्रमस्थळी पोहोचल्यानंतर उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांच्या गळ्यात काँग्रेसचे उपरणे घालण्यात आले. माध्यमांच्या नजरा त्याकडे वळल्यानंतर उद्धव ठाकरे सावध झाले. शरद पवारांनी उपरणे बाजूला काढून ठेवताच, लागोलग ठाकरेंनीही त्यांचे अनुकरण केले.

काँग्रेस आमदार भाई जगतापांनी उपरणे गळ्यातच ठेवावे, असा आग्रह धरला. मात्र उद्धव ठाकरे यांनी हसत हसत त्याला नकार दिला. संजय राऊतांनी आपल्या गळ्यातील उपरणे शेवटपर्यंत काढले नाही. माध्यमांनी उद्धव ठाकरेंची कृती कॅमेऱ्यात टिपल्याने त्यांना सारवासारव करावी लागली. आपल्या भाषणात ते म्हणाले, काँग्रेसच्या कार्यक्रमाला असल्याने मी गळ्यात गमछा घातला. तुमचा आदर ठेवला, मान ठेवला. पण उद्या याचा नक्की फोटो येणार. तो फोटो यावा यासाठीच मी काँग्रेसचा गमछा गळ्यात घातला होता. मी इकडे तिकडे काय करतो, त्याकडे विरोधकांचे जास्त लक्ष असते. तुम्ही दाखवा काय दाखवायचे ते, असेही ठाकरेंनी सांगितले.





Powered By Sangraha 9.0