ब्रिटनमध्ये 2011 सालानंतर दंगे झाले नव्हते. ऑगस्टच्या सुरुवातीपासून पेटलेले दंगे आता शांत झाले असले, तरी समाजात अत्यंत स्फोटक परिस्थिती आहे. ब्रिटनची अर्थव्यवस्था, सार्वजनिक आरोग्यव्यवस्था, शिक्षण तसेच सार्वजनिक वाहतूकव्यवस्था ढासळत आहे. हुजूर पक्षाच्या पराभवामुळे अतिउजव्या विचारसरणीचे पक्ष आणि संघटनांची लोकप्रियता वाढत आहे.
ब्रिटनमध्ये संसदीय निवडणुकांना एक महिना उलटत नाही, तो तिथे मोठ्या प्रमाणावर दंगे उसळले. 4 जुलैला झालेल्या निवडणुकांत डाव्या उदारमतवादी मजूर पक्षाला 411 जागा मिळाल्या. 2019 सालच्या निवडणुकांच्या तुलनेत त्यांच्या तब्बल 209 जागा वाढल्या. दुसरीकडे उजव्या विचारसरणीच्या हुजूर पक्षाच्या 244 जागा कमी होऊन त्यांना अवघ्या 121 जागांवर समाधान मानावे लागले. ‘हाऊस ऑफ कॉमन्स’मध्ये दोन तृतीयांश जागा जिंकूनही मजूर पक्षाला 33.7 टक्के मतं मिळाली. याचाच अर्थ हुजूर पक्षाच्या अनेक मतदारांनी कंटाळून आणखी उजव्या विचारसरणीच्या पक्षांना मतदान केले. सध्या अनेक प्रकारच्या संकटांमध्ये सापडलेल्या ब्रिटनला कीर स्टार्मर यांच्या प्रचंड बहुमताच्या सरकारमुळे स्थैर्य प्राप्त होईल, ही अपेक्षा फोल ठरली.
दि. 29 जुलै 2024 रोजी साऊथ पोर्ट येथे 17 वर्षांच्या अॅक्सेल रुडाकुबाना याने एका नृत्य प्रशिक्षण केंद्रात शिरून तेथील मुलांवर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात सहा, सात आणि ऩऊ वर्षांच्या तीन मुली मारल्या गेला. आठ मुलं आणि दोन माणसं जखमी झाली. हल्लेखोर ब्रिटिश नागरिक होता. त्याचे आईवडील रवांडा या देशातून शरणार्थी म्हणून आले होते. ते धर्माने ख्रिस्ती होते. अॅक्सेलने मानसिक तणावाखाली हे कृत्य केले. तो सज्ञान नसल्यामुळे तपास यंत्रणांनी त्याचे नाव जाहीर केले नाही. हा हल्ला मुस्लीम धर्मीय शरणार्थ्याने केला, अशी अफवा समाजमाध्यमांत पसरली. समाजमाध्यमांमध्ये प्रक्षोभक संदेश फिरू लागले. अल्पावधीतच व्हॉट्सअॅपवर ‘इंग्लिश डिफेन्स लीग’, ‘पॅट्रिऑटिक अल्टरनेटिव्ह’, ‘ब्रिटन फर्स्ट’ आणि ‘नॅशनल फ्रंट’ यासारखे समूह तयार झाले. अनेक समूूहांमध्ये लाखांवर लोक सहभागी झाले.
वीसहून अधिक शहरांमध्ये मोर्चे निघाले. त्यातील अनेक मोर्चांना हिंसक वळण लागले. लोकांनी मुस्लीम धर्मीयांच्या दुकानांच्या काचा फोडल्या, गाड्या जाळल्या तसेच कृष्णवर्णीय लोकांना आणि पोलिसांनाही मारहाण केली. हिंसक जमावाने केलेल्या हल्ल्यांमध्ये मशिदी तसेच शरणार्थ्यांना ठेवले आहे, असा संशय असलेल्या हॉटेलचाही समावेश होता. या हल्ल्यांमध्ये तब्बल 130 हून अधिक पोलीस अधिकारी जखमी झाले. पोलिसांनी एक हजारांहून अधिक दंगेखोरांना अटक केली. एवढ्या लोकांना ठेवायला तुरुंगात जागा नव्हती. त्यामुळे जुन्या कैद्यांना सोडण्यात आले. समाजमाध्यमांवर पोस्ट केलेल्या लोकांना हिंसा भडकावल्याचे आरोप ठेवून जलदगती न्यायालयात दोन ते तीन वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली. त्यामुळे संपूर्ण समाज ढवळून निघाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून बाहेरून येणार्यांचे लोंढे हा ब्रिटनच्या राजकारणातील कळीचा मुद्दा झाला आहे.
1973 मध्ये ब्रिटन युरोपीय आर्थिक संघामध्ये आणि कालांतराने युरोपीय महासंघामध्ये सामील झाल्यामुळे तेथील अर्थव्यवस्था तसेच सामाजिक सलोख्यावर अनेक परिणाम झाले. इंग्रजी भाषा, जागतिक बँका आणि वित्तीय संस्थांची मुख्यालयं आणि विकसित झालेले सेवा क्षेत्र यामुळे युरोपातील अनेक बँका तसेच सेवा क्षेत्रातील बहुराष्ट्रीय कंपन्यांनी आपली कार्यालयं लंडन परिसरात हलवली. त्यामुळे ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला बळकटी आली. लाखो रोजगारांची निर्मिती झाली. ‘फिन-टेक’ म्हणजेच ‘फायनान्शिअल टेक्नोलॉजी’ क्षेत्रात आज लंडन ही जागतिक राजधानी म्हणून समोर आली. दुसरीकडे सामायिक बाजारपेठेचा ब्रिटनमधील पारंपरिक म्हणजेच कृषी, खाणकाम आणि उत्पादन क्षेत्राला मोठा फटका बसला. एकीकडे ब्रिटनमधील औद्योगिक क्षेत्रं चीन आणि युरोपच्या घशाखाली जात असताना पूर्व युरोपातून प्रचंड संख्येने आलेल्या लोकांमुळे ब्रिटिश लोकांच्या नोकर्यांवर गंडांतर येऊ लागले. त्याचा परिणाम म्हणून ब्रिटन युरोपीय महासंघातून बाहेर पडला.
पण, या प्रक्रियेत ब्रिटनमध्ये हुजूर पक्षाच्या सरकारमध्ये पाच पंतप्रधान बदलले. आता युरोपीय महासंघाशी काडीमोड झाला असला, तरी दक्षिण आशिया आणि आफ्रिकेतून बेकायदेशीरपणे येणार्या लोकांची संख्या वाढतच चालली आहे. सामान्य लोकांची हलकी कामं करण्याची इच्छा नसल्यामुळे हे बेकायदेशीररित्या आलेले लोक व्यवस्थेला चुकवून समाजाच्या गरजा भागवतात. पकडले गेल्यास आपल्या मायदेशात आपला धार्मिक किंवा राजकीय कारणांसाठी छळ होत असल्यामुळे आपण शरणार्थी म्हणून येऊ इच्छितो, असा अर्ज करतात. त्या व्यक्तीला शरणार्थी म्हणून घ्यायचे का नाही, हे ठरवायची कायदेशीर प्रक्रिया वेळखाऊ असून हजारो प्रकरणं पुरेशा न्यायाधीशांच्या अभावी ताटकळत आहेत. बेकायदेशीररित्या आलेल्या लोकांमुळे गुन्ह्यांमध्येही मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये ब्रिटनमध्ये मुस्लीम धर्मीयांची संख्या दोन टक्क्यांपासून वाढून 6.6 टक्के झाली आहे. त्यात बेकायदेशीररित्या आलेल्या लोकांची भर पडत आहे. संपूर्ण मुस्लीम समाजाला दोष देणे योग्य नसले तरी त्यातील एका मोठ्या घटकाचा ब्रिटिश संस्कृतीशी एकरुप व्हायला नकार, देशापेक्षा धर्मभावनेला प्राधान्य देणे, मूलतत्त्ववादी विचारसरणी, गुन्हेगारीचे मोठे प्रमाण तसेच मुस्लीमबहुल भागात इस्लामी नियम लावण्याचे प्रयत्न यामुळे ब्रिटनमधील कनिष्ठ मध्यमवर्गीयांमध्ये असंतोष वाढत होता. गाझातील युद्धाविरोधात ब्रिटनमध्ये लाखोंच्या संख्येने लोक रस्त्यावर उतरले. ज्या देशांमध्ये लोकशाही नाही, मानवाधिकार नाहीत तेथून हे लोक ब्रिटनमध्ये येतात. आम्हालाच लोकशाही व्यवस्थेतील हक्क शिकवतात, या भावनेत वाढ होत आहे. उजव्या हुजूर पक्षाचा मोठा पराभव झाल्यामुळे ब्रिटनमध्ये राजकीय पोकळी निर्माण झाली.
कीर स्टार्मर पंतप्रधान झाले, तेव्हा त्यांच्याबद्दल एका प्रकारची आश्वासकता निर्माण झाली होती. कारण, ते खर्या अर्थाने ब्रिटनमधील कनिष्ठ मध्यमवर्गाचे, कष्टकर्यांचे प्रतिनिधित्व करतात. पण, या दंग्यांमध्ये सरकारने जे कडक धोरण अंगीकारले, ते पाहून या देशात दोन प्रकारची पोलीस व्यवस्था आहे का, असा प्रश्न विचारला जाऊ लागला. एकीकडे बेकायदेशीररित्या येणार्या लोकांवर नियंत्रण आणण्यात, तसेच त्यांच्याकडून होणार्या गुन्ह्यांची संख्या कमी करण्यात सरकारला अपयश येते; पण ज्यांच्या अनेक पिढ्या ब्रिटनमध्ये नांदल्या आहेत, त्यांनी रागाच्या भरात हिंसाचार केला, तर त्यांना दहशतवाद्यांसारखी वागणूक दिली जाते, ही गोष्ट पचवणे ब्रिटनमधील श्वेतवर्र्णीय कनिष्ठ मध्यमवर्गीय लोकांना अवघड जात आहे.
ब्रिटनमधील श्वेतवर्णीयांच्यातही वर्गव्यवस्था उघडपणे दिसते. उच्चवर्गातील लोक क्रिकेट आणि टेनिसचे शौकिन असतात; तर कनिष्ठ - मध्यमवर्गीय लोकांना फुटबॉल आवडतो. उच्चवर्गातील लोक सभ्य गृहस्थ म्हणून ओळखले जातात आणि सार्वजनिक ठिकाणी रीतिरिवाजांचे अत्यंत कसोशीने पालन करतात. याउलट, कनिष्ठ मध्यमवर्गीय लोक खेळाच्या मैदानात ब्रिटनचा किंवा त्यांच्या आवडत्या क्लबचा पराभव झाला तरी परत जाताना रस्त्यामध्ये दंगे करतात. आता हेच लोक बेकायदेशीर घुसखोरांविरुद्ध रस्त्यावर उतरले असून गुन्हेगारी स्वरुपाच्या कारवाया करत आहेत.
ब्रिटनमध्ये 2011 सालानंतर दंगे झाले नव्हते. ऑगस्टच्या सुरुवातीपासून पेटलेले दंगे आता शांत झाले असले, तरी समाजात अत्यंत स्फोटक परिस्थिती आहे. ब्रिटनची अर्थव्यवस्था, सार्वजनिक आरोग्यव्यवस्था, शिक्षण तसेच सार्वजनिक वाहतूकव्यवस्था ढासळत आहे. हुजूर पक्षाच्या पराभवामुळे अतिउजव्या विचारसरणीचे पक्ष आणि संघटनांची लोकप्रियता वाढत आहे. दुसरीकडे या लोकांच्या वर्णभेदी वागणुकीविरोधातही मोठ्या संख्येने लोक रस्त्यावर उतरले. त्यांना असे वाटते की, सरकार दंगेखोर लोकांवर जरब बसवण्यात अपयशी ठरले. दुसरीकडे उजव्या विचारसरणीच्या लोकांना वाटते की, सरकार मुस्लीम, कृष्णवर्र्णीय आणि बेकायदेशीर लोकांना मूळच्या ब्रिटिश लोकांपेक्षा चांगली वागणूक देत आहे. सध्या परिस्थिती पूर्वपदावर येऊ लागली असली तरी भविष्यात कधीही या असंतोषाची ठिणगी पडून दंगे पेटू शकतात.