अब्जावधींची सिडनी मेट्रो

02 Aug 2024 21:10:11
Sydney Metro


ऑस्ट्रेलियातील सिडनीच्या अब्जावधी डॉलर्सच्या मेट्रो सिस्टीमचा नवीनतम टप्पा ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरु होणार आहे. ज्याप्रमाणे आपल्याला मुंबईच्या उदरातून धावणार्‍या ‘मेट्रो ३’ची प्रतीक्षा आहे, त्याचप्रमाणे आता सिडनीवासीयांना या अब्जावधींच्या मेट्रो प्रकल्पाचा दुसरा टप्पा सुरु होण्याची प्रतीक्षा आहे. काही मिनिटांत चालकविरहित गाड्यांतून प्रवाशांना शहराच्या एका टोकाकडून दुसर्‍या टोकाकडे आरामदायी प्रवास करता येईल.

आपल्या एका हॉर्नच्या जोरावर, गोंडस, पांढरी, चालकविरहित मेट्रो ट्रेन सिडनीतील व्हिक्टोरिया क्रॉस स्टेशनपासून हळूहळू पुढे सरकते. काही क्षणांत सिडनी हार्बरमधील जगातील सर्वात मोठ्या प्रसिद्ध ‘पोर्ट जंक्शन’ या नैसर्गिक बंदराखाली ताशी १०० किलोमीटर वेगाने अखंडपणे धावते. ‘टर्न-अप’ आणि ‘गो-कॉम्प्युटर’द्वारे चालविल्या जाणार्‍या या मेट्रोने जगातील सर्वात मोठे नैसर्गिक बंदर चार मिनिटांत ओलांडले, हा अनुभव सिडनी मेट्रोचे अधिकारी जोश वॅटकिन यांनी एका इंग्रजी साप्ताहिकाला दिलेल्या मुलाखतीत सांगितला आहे. सिडनी मेट्रो सिडनीच्या उत्तर-पश्चिम, पश्चिम, दक्षिण-पश्चिम आणि ‘ग्रेटर वेस्ट’ला जलद, विश्वासार्ह जोडणीसह वाहतूक पायाभूत क्षेत्रात क्रांती करत आहे. सिडनी मेट्रो प्रकल्प हा ऑस्ट्रेलियाचा आजपर्यंतचा सर्वात मोठा वाहतूक पायाभूत सुविधा प्रकल्प. हा प्रकल्प एकूण ४६ स्थानकांसह ११३ किलोमीटरसह प्रस्तावित आहे. हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरु होण्यासाठी २०३२ साल उजाडेल. या प्रकल्पाचा पहिला टप्पा २०१९ मध्ये खुला झाला आणि दुसरा टप्पा ऑगस्ट २०२४ मध्ये सुरु होईल. सिडनीच्या नवीन मेट्रो रेल्वे मार्गाचा शहरातील भाग ऑगस्टमध्ये सुरु होणार आहे. चालकविरहित गाड्या नवीन हार्बर बोगद्यातून ताशी १०० किमी वेगाने धावतील.
 
सद्यस्थितीत या मेट्रोच्या चाचण्या सुरु आहेत. ‘एम वन नॉर्थवेस्ट’ आणि ‘बँकस्टाऊन’ मार्गिकेच्या नवीन विभागामध्ये १५.५ किलोमीटर मेट्रो रेल्वेचा समावेश आहे. सिडनीला लवकरच क्रो नेस्ट, व्हिक्टोरिया क्रॉस, बारंगारू, मार्टिन प्लेस, गाडिगल आणि वॉटरलू, तसेच सेंट्रल आणि सिडनहॅम येथे नवीन मेट्रो प्लॅटफॉर्मचा अनुभव मिळेल. सिडनी मेट्रो नेटवर्कमध्ये तीन प्रकारचे स्टेशन असतील. क्रो नेस्ट, बरंगारू, कॅसल हिल आणि हिल्स शोग्राउंड सारखी भूमिगत स्थानके ‘कट-अ‍ॅण्ड-कव्हर’ पद्धतीचा वापर करून भूमिगत बांधलेली आहेत. चेरीब्रुक, बेला व्हिस्टा आणि तालावॉन्गसारखी स्थानके ओपन कट स्टेशन्स पद्धतीने बांधली आहेत. जी वरच्या बाजूने खुली आहेत, मात्र जमिनीखाली आहेत. केलीविले आणि राऊस हिलसारखी उन्नत स्थानके स्कायट्रेनवरील उन्नत स्थानके आहेत.
 
‘सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्ट’मधून सिडन हॅमपर्यंतचा नऊ स्थानके असणारा सिडनी मेट्रोचा दुसरा टप्पा ऑगस्ट महिन्यात सर्वसामान्य नागरिकांसाठी खुला होईल. या नव्या मेट्रो मार्गिकेचे प्रमुख आकर्षण हे या मार्गिकेवरील नवीन सेंट्रल स्थानक असणार आहे. नवीन सेंट्रल स्थानक हे एका पुरातन ऐतिहासिक वारसा वास्तूचे नूतनीकरण आणि विस्तारित स्थानक आहे. वॉल्टर लिबर्टी व्हर्नोन आणि जॉर्ज मॅकरे यांनी डिझाइन केलेली मूळ रचना १९०६ सालची आहे आणि ती सिडनीच्या ऐतिहासिक संरचनेपैकी एक मानली जाते. हे स्थानक ऑस्ट्रेलियातील सर्वात व्यस्त रेल्वे स्थानक आहे. सध्याच्या ऐतिहासिक पुरातन भिंतींना अत्याधुनिक कलाकृतींचा साज घालून या स्थानकाचे नुतनीकरण करण्यात आले आहे. यासोबतच मार्गातील इतर ऐतिहासिक वास्तूला, विद्यमान पादचारी बोगदे आणि प्रचलित सुविधा यांना धक्का न लावता त्याखालून नवीन बोगदे बांधण्यात आले.

या मार्गिकेवर सुमारे ४ लाख, ५० हजार नागरिक दररोज ये-जा करतील असा अंदाज आहे. नव्या मार्गिकेमुळे सध्याच्या मेट्रो प्रवासी क्षमतेमध्ये ६० टक्के वाढ नोंदविली जाण्याचा हा सिडनी मेट्रो प्रशासनाचा अंदाज आहे. वेगवान आणि विश्वासार्ह मेट्रो सेवा दर चार मिनिटांनी प्रत्येक स्थानकावर पोहोचेल. दर आठवड्याला २ हजार, ६४५ नवीन मेट्रो सेवांसह सिडनीवासीय शहराच्या उदरातून प्रवास करतील. टॅलावॉन्ग ते सिडनहॅम या मार्गावर ठराविक आठवड्याच्या दिवशी २ लक्ष, ६४ हजारांहून अधिक ट्रिप घेतल्या जाण्याची अपेक्षा आहे.१०० पेक्षा जास्त उर्वरित चाचणी चालवण्याचे काम यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर पुढील आठवड्यात ही मार्गिका खुली करण्याबाबत अंतिम पुष्टी केली जाईल.


Powered By Sangraha 9.0