"राजसाहेबांवर टीका करून मोठा..."; मनसेच्या बॅनरमधून मिटकरींना गंभीर इशारा
02-Aug-2024
Total Views |
मुंबई : राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी आणि मनसेतील वाद आता चांगलाच पेटला आहे. मनसेने एक बॅनर तयार करून अमोल मिटकरींना गंभीर इशारा दिला आहे. राजसाहेबांवर टीका करून मोठं होण्याचे स्वप्न बघू नको, असे या बॅनरमध्ये म्हटले आहे.
"राजसाहेबांवर आणि अमितसाहेबांवर टीका करून मोठा होण्याचे स्वप्न बघू नकोस. तुझी लायकी महाराष्ट्र सैनिक दाखवतील. अमोल मिटकरी मुंबईला येताना सांगून ये. मर्दाची औलाद काय असते हे तुला दाखवून देऊ. मुंबईची सुरुवात मानखुर्दपासूनच होते. मनसेस्टाईल स्वागत मानखुर्दमध्येच करु," असा थेट इशारा मनसेकडून लावण्यात आलेल्या बॅनरमध्ये देण्यात आला आहे. या बॅनरवर अमोल मिटकरींचे व्यंगचित्रही काढण्यात आले आहे. यासोबतच राज ठाकरे आणि अमित ठाकरेंचा फोटोदेखील लावण्यात आला आहे.
अकोल्यातील शासकीय विश्रामगृहाबाहेर मनसे पदाधिकाऱ्यांकडून अमोल मिटकरींच्या गाडीवर हल्ला करण्यात आला होता. अमोल मिटकरींनी राज ठाकरेंवर केलेल्या टीकेला उत्तर म्हणून हा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात एका मनसैनिकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.