छत्रपती संभाजीनगर : विरोधक देवेंद्रजींचा बालही बाका करू शकत नाहीत, कारण हा मुख्यमंत्री आणि जनता त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे, असे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केले आहे. शुक्रवारी छत्रपती संभाजीनगर ते सिल्लोडदरम्यान भव्य रोड शो आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्यांनी टीव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीशी संवाद साधला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "उद्धव ठाकरे हे गोंधळले असून त्यांची वैचारिक दिवाळखोरी आहे. ते सुडाचं राजकारण करू पाहत आहेत. परंतू, राज्यातील जनता या सुडाच्या राजकारणाला थारा देणार नाही. आम्ही अनेक विकासकामं केली आहेत. मी, देवेंद्रजी आणि अजितदादा मिळून लोकांची सेवा करत आहोत. त्यामुळे विरोधक कितीही काही बोलले तरी देवेंद्रजींचा बाल बाका करू शकत नाहीत. त्यांच्या पाठीमागे मुख्यमंत्री खंबीरपणे उभा आहे."
हे वाचलंत का? - "राजसाहेबांवर टीका करून मोठा..."; मनसेच्या बॅनरमधून मिटकरींना गंभीर इशारा
"लाडकी बहिण योजनेच्या माध्यमातून राखीपौर्णिमेच्या आधी लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जाणार आहेत. पण विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. ते बिथरले आणि गोंधळले असून काय करावं ते त्यांना कळत नाही. त्यांना त्यांचा पराभव डोळ्यापुढे दिसत आहे," असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, "राज्यभरात आम्हाला लाडकी बहिण, लाडके भाऊ, शेतकरी आणि , विद्यार्थींनींचा प्रतिसाद मिळतो आहे. त्यामुळे हे कपटी सावत्र भाऊ लाडक्या बहिणींना पैसे मिळू नये यासाठी प्रयत्न करत आहेत. ते कोर्टात जात आहेत. ही योजना बंद पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतू, राज्य सरकार लाडक्या बहिणींच्या सोबत आहेत," असेही ते म्हणाले.