अकोला : जय मालोकर हा दहा दिवसांनंतर राष्ट्रवादीत येणार होता, असा मोठा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरींनी केला आहे. जय मिटकरींचा मनसे आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या राड्यामध्ये हृदयविकाऱ्याच्या झटक्याने मृत्यू झाला. त्यानंतर अमोल मिटकरी शुक्रवारी टीव्ही ९ मराठीशी बोलत होते.
अमोल मिटकरी म्हणाले की, "यापूर्वी अनेक लोकांनी राज ठाकरेंबद्दल सुपारीबहाद्दर हा शब्द वापरला आहे. पण त्यांच्यापर्यंत जाण्याची या कार्यकर्त्यांमध्ये हिंमत नाही. पण मी माझ्या वक्तव्यावर ठाम आहे. मनसे हा पळपुट्यांचा, सोंगाड्यांचा, सुपारीबाज, गुंडशाही, झुंडशाही आणि बेवडेशाही असलेल्यांचा पक्ष आहे. कर्नबाळा दुनबळे यांच्या मुस्क्या आवळून पोलिसांनी ताब्यात घ्यावं. जय मालोकरच्या मृत्यूला तेच जबाबदार आहे," असा आरोप त्यांनी केला आहे.
हे वाचलंत का? - मनसेचं ठरलं! पुण्यात 'इतक्या' विधानसभा मतदारसंघात लढणार
ते पुढे म्हणाले की, "जय मालोकर यांच्या मृत्यूला मनसेचे पदाधिकारीच कारणीभूत आहेत. तो मुलगा तिथून कसा जातो? त्याच्यावर काय दबाव आणला? त्याच्या छातीवर मार होता का? हे सगळं पोस्टमार्टम रिपोर्टनंतर पुढे येईलच. पण या सगळ्या गुंडांचीही चौकशी व्हायला हवी. जय मालोकर हा दहा दिवसांनंतर अजितदादांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार होता. त्यामुळे त्याच्यावर यांना खुन्नस होती. यातूनच त्याचा मृत्यू झाला आहे. तो शांत स्वभावाचा मुलगा होता. यांनी त्याला या सगळ्या प्रकारात समाविष्ट करुन घेतलं. हे खुनशी लोक आहेत," अशी टीकाही मिटकरींनी केली आहे.