...अन्यथा राजकारणातून संन्यास घ्या! अजितदादांचं सुप्रिया सुळेंना आव्हान

02 Aug 2024 13:33:50
 
Ajit Pawar & Supriya Sule
 
नाशिक : माझ्यावरचे आरोप सिद्ध झाल्यास मी राजकारणातून सन्यास घेईल. पण ते सिद्ध न झाल्यास तुम्ही राजकारणातून सन्यास घ्या, असे आव्हान उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सुप्रिया सुळे आणि विरोधकांना दिले आहे. सत्तेत सहभागी होण्याच्या आधी अजित पवार वेश बदलून दिल्लीला जायचे, असे आरोप करण्यात येत होते. यावर आता अजित पवारांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला.
 
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, "मी मधल्या काळात जो निर्णय घेतला त्यावेळी वेश बदलून दिल्लीला जायचो, अशा चर्चा रंगल्या होत्या. यावर काही राजकीय नेत्यांनीही टीका केली होती. पण हे धादांत खोटं आहे. हे माझ्या संदर्भात गैरसमज निर्माण करण्याचं आणि माझी बदनामी करण्याचं काम सुरु आहे."
 
हे वाचलंत का? -  मनोज जरांगेंचं अटक वॉरंट रद्द! कोर्टाने दिली समज
 
"मी राज्यात ३५ वर्ष वेगवेगळ्या पदांवर राहिलो आहे. मला जबाबदारी कळते. एखाद्याने स्वत:चं नाव बदलून जाणं हासुद्धा गुन्हा आहे. सगळीकडे आता सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. पण सर्वजण खुशालपणे काहीही बडबडत आहेत. कुणी बहुरुपी म्हणतं, कुणी काही म्हणतं. हे म्हणणाऱ्यांना काही लाज, लज्जा, शरम वाटली पाहिजे. माझ्यावर बिनबुडाचे आरोप केले जात आहेत. यात काहीही तथ्य नाही," असे ते म्हणाले.
 
संजय राऊतांबद्दल बोलताना ते म्हणाले की, "सकाळचा ९ च्या भोंग्यानेही टीका केली. उगीच उचलली जीभ आणि लावली टाळ्याला. यासंदर्भात तुम्हाला कुठे पुरावा मिळाला? मी तेव्हा विरोधी पक्षनेता होतो. मला समाज ओळखतो. कोणी म्हटलं मिशा लावल्या होत्या, टोपी घातली होती, मास्क लावलं होतं. पण हे साफ चुकीचं आहे. जर हे सिद्ध झालं तर मी राजकारणातून निवृत्त होईल. पण जर सिद्ध झालं नाही तर ज्या लोकांनी ही नौटंकी सुरु केली त्यांना लाज वाटायला हवी."
 
"सगळे म्हणतात मी १० वेळा दिल्लीला गेलो. मी लोकशाहीत काम करणारा नेता आहे. मला कुठे जायचं असल्यास मी उजळ माथ्याने जाईन. मला लपून छपून जाण्याची गरज नाही. पण या बातम्या चालवायच्या आणि विरोधकांनी फेक नरेटिव्ह सेट करायचा यात तथ्य नाही. माझं संसदेला आव्हान आहे. हे सगळं तपासून पाहावं, खरं असेल तर अजित पवार राजकारणातून बाजूला होईल. खरं नसेल, तर ज्यांनी संसदेमध्ये कुठलाही पुरावा नसताना आणि खरी माहिती जाणून न घेता आरोप केलेत त्यांनी राजकारणातून संन्यास घ्यावा," असे आव्हान अजित पवारांनी सुप्रिया सुळेंना दिले आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0