हरियाणात प्रादेशिक पक्षांचेही आव्हान

19 Aug 2024 21:32:07
haryana upcoming assembly election


नुकतीच हरियाणा विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. यंदाही राज्यात मुख्य लढत भाजप आणि काँग्रेसमध्ये असल्याचे मानले जात असले, तरी यावेळी निवडणुकीत छोट्या पक्षांची भूमिका महत्त्वाची ठरू शकते.

विधानसभेच्या 90 जागा असलेल्या हरियाणामध्ये गेल्या दोन दशकांपासून भाजप आणि काँग्रेस या दोन राष्ट्रीय पक्षांमध्येच थेट सामना रंगत आला आहे. यापूर्वी 2005 ते 2014 पर्यंत भूपेंद्र सिंह हुड्डा यांच्या नेतृत्वाखाली हरियाणात काँग्रेसची सत्ता होती. त्यानंतर 2014 पासून भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे, तर 2004 आणि 2009च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आघाडीवर होती. 2014 आणि 2019 मध्ये भाजप पुढे होता. आता नुकत्याच पार पडलेल्या 2024च्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि काँग्रेस दोघांनी प्रत्येकी पाच-पाच जागा जिंकल्या आहेत.

नुकतीच हरियाणा विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. यंदाही राज्यात मुख्य लढत भाजप आणि काँग्रेसमध्ये असल्याचे मानले जात असले, तरी यावेळी निवडणुकीत छोट्या पक्षांची भूमिका महत्त्वाची ठरू शकते. विशेषत: राज्यात आम आदमी पक्षाच्या (आप) प्रवेशाने राजकीय समीकरण बदलू शकते. याशिवाय, दुष्यंत चौटाला यांचा ‘जननायक जनता पार्टी’ (जेजेपी), अभय सिंह चौटाला यांचा ‘इंडियन नॅशनल लोकदल’ (आयएनएलडी), गोपाल कांडा यांची ’हरियाणा लोकहित पार्टी’ (एचएलपी) यांची कामगिरी भाजप आणि काँग्रेससाठी आव्हानात्मक ठरू शकते.

हरियाणामध्ये विजयाची हॅट्ट्रिक साधण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. मात्र, हा मार्ग सोपा नाही. 2014 मध्ये भाजपने पूर्ण बहुमताने राज्यात सरकार स्थापन केले. 2019 मध्ये भाजप बहुमताच्या तुलनेत थोडा मागे पडला आणि ‘जेजेपी’सोबत आघाडी करून सरकार स्थापन केले. आता निवडणुकीपूर्वीच जेजेपी-भाजप युती तुटली आहे. ‘जेजेपी’ स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आहे. त्याच वेळी, 2024च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या जागा दहा वरून पाच वर आल्या. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपने हरियाणात आपली संपूर्ण रणनीती बदलली आहे. भाजपनेही प्रत्येक समाजाला सामावून घेण्यासाठी काही बदल केले आहेत. नुकताच, भाजपने मुख्यमंत्रिपदाचा चेहरा बदलला आहे. मनोहर लाल खट्टर यांच्या जागी ओबीसी चेहरा नायब सिंग सैनी यांना मुख्यमंत्री करण्यात आले. प्रदेशाध्यक्षपदासाठी ब्राह्मण चेहरा मोहनलाल बडोली यांची नियुक्ती करून नवा डाव खेळला. राज्याचे प्रभारी सतीश पुनिया हे जाट समाजातील आहेत. सोशल इंजिनिअरिंगवर पक्ष विशेष लक्ष देत आहे.

हरियाणातील काँग्रेसचे प्रमुख नेते आणि दोनवेळा मुख्यमंत्री राहिलेले भूपेंद्र सिंग हुड्डा हे केंद्रस्थानी आहेत. त्याशिवाय, कुमारी सेलजा आणि रणदीप सिंग सुरजेवाला हे नेते वैयक्तिकरित्या मोठ्या संख्येने मतदारांवर प्रभाव टाकू शकतात. मात्र, हरियाणा काँग्रेसमध्ये सर्व काही सुरळीत चाललेले नाही. पक्षात दोन गट पडले आहेत. एक गट भूपेंद्र हुड्डा व दीपेंद्र हुड्डा यांचा आहे आणि दुसरा गट कुमारी सेलजा आणि सुरजेवाला यांचा आहे. अलीकडेच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांनी बोलावलेल्या बैठकीत ही दुफळी पाहायला मिळाली.

कुमारी सेलजा यांनी थेट प्रदेशाध्यक्ष उदयभान यांच्यावर पक्षपाताचा आरोप केला. सभेत एकाच गटाच्या लोकांना बोलावून प्राधान्य दिल्याचा आरोप त्यांनी केला. संघटनेचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांना हे प्रकरण शांत करावे लागले होते. त्याचवेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ’हरियाणा मांगे हिसब’ या नावाने पदयात्रा काढत आहेत. कुमारी सेलजा यांनी जुलैमध्ये भूपेंद्र सिंह हुड्डा यांच्या मोर्चात सहभाग घेतला नव्हता. यानंतर, 27 जुलैपासून सेलजा यांनी वेगळा मोर्चा काढला. यानंतर, रणदीप सुरजेवाला यांनी मोर्चा काढला. राज्यात विधानसभा निवडणुका होऊ घातल्या असताना हा वाद होत आहे. या दुफळीचा फायदा इतर पक्ष घेऊ शकतात.

आम आदमी पार्टीने 2024ची लोकसभा निवडणूक इंडिया आघाडीतील भागीदार काँग्रेससोबत लढवली होती. हरियाणामध्ये काँग्रेसने लोकसभेच्या नऊ पैकी पाच जागा जिंकल्या, तर आम आदमी पक्षाने कुरुक्षेत्र मतदारसंघातून निवडणूक लढवली. मात्र, त्यांना यश मिळाले नाही. ‘आप’ने आता यावेळी त्यांनी राज्यातील सर्व 90 जागांवर एकट्याने निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. हरियाणात ‘आप’ला पक्ष मजबूत होत आहे आणि भाजप सरकारच्या विरोधात सत्ताविरोधी भावना आहे, असा ‘आप’चा समज झाला आहे.

जननायक जनता पक्षाचे नेते दुष्यंत चौटाला हे जाट समाजातील प्रमुख चेहरा आहेत. गेल्या विधानसभेपूर्वीच दुष्यंत चौटाला यांनी आपल्या कौटुंबिक पक्ष ‘इंडियन नॅशनल लोकदला’तून बाहेर पडून स्वत:चा पक्ष ‘जेजेपी’ स्थापन केला होता. 2019 मध्ये पहिल्याच विधानसभा निवडणुकीत दहा जागा जिंकून ‘जेजेपी’ ‘किंगमेकर’ म्हणून उदयास आला आणि भाजपसोबत सरकार स्थापन केले. दुष्यंत चौटाला यांना उपमुख्यमंत्रिपदाची संधी मिळाली. मार्च 2024 मध्ये भाजपने सुमारे साडेचार वर्षांनी ‘जेजेपी’सोबतची युती तोडली. यावेळी जेजेपी विधानसभा निवडणुकीत कोणासोबत युती करणार, हे स्पष्ट झालेले नाही.

भाजप आणि काँग्रेसव्यतिरिक्त ‘आयएनएलडी’ हा हरियाणातील एकमेव राजकीय पक्ष आहे, ज्याकडे स्वबळावर निवडणूक लढवण्याची ताकद आहे. माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला यांच्या नेतृत्वाखाली ‘आयएनएलडी’ला ग्रामीण भागात मजबूत मताधिक्य आहे. नुकतीच, ‘आयएनएलडी’ने मायावतींच्या बसपासोबत आघाडी करण्याची घोषणा केली आहे. ही आघाडी स्वतःला भाजप आणि काँग्रेसचा पर्याय म्हणून सादर करत आहे. राज्यात इंडियन नॅशनल लोकदल 53, तर बसपा 37 जागांवर निवडणूक लढवत आहे. हरियाणातील काही भागांत बसपाला दलित मतदारांचा पाठिंबा आहे, तर काही भागांत आयएनएलडीला जाट समाजाचा पाठिंबा आहे. त्यामुळे ही युती काँग्रेस आणि भाजपपुढे आव्हान उभे करू शकते.



Powered By Sangraha 9.0