कांदिवलीत पुजारीवर जीवघेणा हल्ला!

19 Aug 2024 12:22:30

Kandivali Sadhu News

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Kandivali Sadhu News)
पूजापाठ करून घरी निघालेल्या एका पुजारीवर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना शनिवार, दि. १७ ऑगस्ट रोजी कांदिवलीत घडली. लालजीपाडा परिसरात चार जणांनी मिळून या पुजारीवर आणि त्याच्या मेहुण्यावर लाकडी बांबूने व चाकूने वार केल्याचे रविवारी व्हायरल झालेल्या एका व्हिडिओतून उघडकीस आले आहे.

हे वाचलंत का? : बांगलादेशातील हिंदुंवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात बोरीवलीत 'जन आक्रोश मोर्चा'


मिळालेल्या माहितीनुसार, आशिषकुमार दुबे असे पुजारीचे नाव आहे. कांदिवली पश्चिम येथील एका यजमानांच्या घरी पूजापाठ करून मेहुणा अजित अग्निहोत्रीसह रात्री १०.४५ च्या सुमारास ते घरी परतत होते. तेव्हा एका अनोळखी मोटरसायकल स्वाराने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. तेव्हा आशिषकुमार यांनी मोटरसायकल स्वारास जाब विचारला असता तो रागारागात निधून गेला. त्यानंतर ११ वाजायच्या सुमारास तो मोटरसायकल स्वार लालजीपाडा परिसरात पुन्हा आशिषकुमार यांच्या समोर आला. शिवीगाळ करत त्यांना मारहाण करू लागला. तेव्हा बाजूला असलेल्या तीन तरुणांनीही आशिषकुमार दुबे आणि अजित अग्निहोत्री यांस मारायला सुरुवात केली.

चारपैकी एका तरुणाने खिशातून चाकू काढून आशिषकुमार यांच्या पोटावर वार केला. दुसऱ्या एका तरुणाने त्याच्या हातातील लाकडी बांबूने त्यांना मारहाण केली. याप्रकरणाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. कांदिवली पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केल्यानंतर हल्ला करणाऱ्या प्रथम दिगंबर खिल्लारे आणि छोटू मनीयार यांना अटक केली आहे. आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ अन्वये कलम १०९, ११५(२), ११८ (१), २२६(१), २८१, ३(५) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. उर्वरित आरोपींचा शोध सुरु असून या हल्ल्यामागील कारणाबाबत अटक केलेल्या दोन्ही आरोपींची पोलीस चौकशी करत आहेत.


Powered By Sangraha 9.0