काही मोजके हिंदी चित्रपट असतात, ज्यांच्या ‘सीक्वेल’ची अर्थात दुसर्या भागाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असतात. त्यापैकी एक चित्रपट म्हणजे ‘स्त्री’. अमर कौशिक दिग्दर्शित ‘स्त्री’ चित्रपटाचा पहिला भाग 2018 साली प्रदर्शित झाला होता. ‘स्त्री’ चित्रपटाच्या पहिल्या भागाचा शेवट ज्या पद्धतीने केला, त्यामुळे नेमकी ‘स्त्री’ आणि श्रद्धा कपूरचं नातं काय? श्रद्धा कपूरच ‘स्त्री’ आहे का? किंवा मग ती ‘स्त्री’च्या विरोधातील कुणी आणि तिच्या शक्ती तिला हव्या होत्या, म्हणून तिने सगळा कट रचला का? असे अनेक प्रश्न प्रेक्षकांच्या मनात निर्माण करून गेले. पण, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे देत आणि नवे प्रश्न आणखी समोर निर्माण करणारा ‘स्त्री 2’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. जाणून घेऊयात कसा आहे, हा चित्रपट...
'स्त्री 2’च्या कथानकाबद्दल सांगायचं झाल्यास चंदेरी गावातून ‘स्त्री’ला रक्षक विकी अर्थात अभिनेता राजकुमार राव मान-सन्मान मिळवून देतो आणि ‘स्त्री’ चंदेरी गावातून निघून जाते. परिणामी, गावातील पुरुष स्वतंत्र आणि बेफिकीरपणे रात्री गावात फिरू शकतात. पण, काही वर्षांनंतर गावात ‘सरकटा राक्षस’ येतो, ज्याला चंदेरी गावातील आधुनिक विचारांच्या स्त्रियांचा खात्मा करायचा असतो. त्यासाठी मग पुन्हा रक्षक विकी मित्र आणि रुद्र भैय्या अर्थात पंकज त्रिपाठी यांच्या साथीने ‘सरकटा राक्षस’ सोबत कसे दोन हात करतो आणि अखेर श्रद्धा कपूरचं खरं रूप विकीसमोर येतं, असं हे संपूर्ण मजेदार कथानक आहे.
खरंतर, संपूर्ण चित्रपट पाहताना तीन ते चार असे क्षण येतात, जिथे आपले डोळे अक्षरश: विस्फारतात. ‘स्त्री 2’ चित्रपटाची जमेची बाजू म्हणजे, विनोद आणि भय या दोन्हींची घातलेली योग्य सांगड. संपूर्ण चित्रपटात एकही क्षण किंवा असा एकही संवाद नाही, जिथे प्रेक्षकांना हसू येणार नाही. मुळात, ‘मेडॉक’ या संस्थेची निर्मिती असलेला ‘स्त्री’ चित्रपट हे एक ‘युनिव्हर्स’ आहे, ज्यात ‘भेडिया’, ‘स्त्री’, ‘मुंज्या’, हे चित्रपट त्यांचं कथानक आणि पात्रं काहीअंशी एकमेकांशी जोडलेली आहेत. आता ज्या ‘युनिव्हर्स’चा उल्लेख केला, ते दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत फार पाहायला मिळतात. ते म्हणजे ‘कैथी’, ‘विक्रम’, ‘लिओ’ आणि असे अनेक चित्रपट. याच पठडीतील ‘मॅडॉक’चं हे भयपटांचं ‘युनिव्हर्स’ आहे. ‘स्त्री 2’ची विशेष खासियत म्हणजे ‘भेडिया’ आणि ‘स्त्री’चं ‘युनिव्हर्स’ छान जोडलेलं पाहायला मिळालं आणि ते हिंदी चित्रपटांच्या दृष्टीने फार अनपेक्षित होतं. याशिवाय, एक गुपित इथे सांगावंसं वाटतं, ते म्हणजे या चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार याचा विशेष ‘कॅमिओ.’ आता त्याची भूमिका काय आहे? हे चित्रपट पाहिल्यावरच प्रेक्षकांना समजेल.
दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे, पहिल्या भागाशी कथानक, पात्रं जशी एकमेकांना जोडलेली आहेत, तसेच प्रत्येक संवाद आणि विनोदही पहिल्या भागाची आठवण करून देणारे आहेत. लेखक आणि दिग्दर्शकाचं विशेष कौतुक इथे करावंसं वाटतं. कारण, जरी प्रेक्षकांना चंदेरीचा रक्षक विकी पुन्हा गावाचं संरक्षण करणार हे माहीत असूनही, तो कशा प्रकारे त्या गोष्टी साध्य करणार आणि ते करताना नवे कोणते ट्विस्ट येणार, हे खरंच कल्पनेच्या पलीकडे घडते. शिवाय, ‘सरकटा राक्षसा’चा जो भूतकाळ आहे, त्यात तो अय्याश, मदमस्त पुरुष दाखवला असून, त्याच्यासाठी ‘स्त्री’ म्हणजे केवळ उपभोगाच्या गोष्टी हा त्याचा स्वभाव दाखवत गावातील पुरुषांचं तो मतपरिवर्तन 400-500 वर्षांनंतर कसा करतो, हे दाखवले आहे.
आता वळूयात कलाकारांच्या अभिनयाकडे. ‘स्त्री 2’ हा चित्रपट अभिनय आणि प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेण्याच्या बाबतीत राजकुमार राव, पंकज त्रिपाठी, अपारशक्ती खुराना आणि अभिषेक बॅनर्जी या चौघांनी आपापल्या भूमिका उत्तम वठवल्या आहेत. श्रद्धा कपूर कुठेतरी चौघांच्या मागे लपलेली दिसली, तर ‘स्पेशल अपिअरन्स’ असलेल्या तमन्ना भाटियाने अतिशय छोटेखानी पण उत्तम भूमिका साकारली आहे. चित्रपट भयपट असल्यामुळे पार्श्वसंगीताचा योग्य वापर, प्रासंगिक विनोद ही देखील चित्रपटाची जमेची बाजू म्हणता येईल. मुळात, मोठ्या पडद्यावर उत्कृष्ट सिनेमॅटिक अनुभव देणारा ‘स्त्री 2’ हा चित्रपट नक्कीच आहे.
चित्रपट : स्त्री 2
दिग्दर्शक : अमर कौशिक
कलाकार : राजकुमार राव, श्रद्धा कपूर, पंकज त्रिपाठी, तमन्ना भाटिया, अपारशक्ती खुराना, अभिषेक बॅनर्जी
रेटिंग : ****