बांग्लादेशातील हिंदू हिंसाचारावर उद्धव ठाकरेंचं म्हणणं काय?

17 Aug 2024 18:42:25
 
Uddhav Thackeray
 
हिंदूंच्या मंदिरांवर आणि घरांवर हल्ले, त्यांच्या दुकानांची तोडफोड, एवढंच नाही तर कित्येक हिंदूंनी आपले प्राणही गमावलेत. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा दिल्यानंतर अद्यापही तिथला हिंसाचार थांबलेला नाहीये. बांगलादेशातील सर्वच म्हणजे ६४ जिल्ह्यांतील हिंदू आणि अन्य अल्पसंख्याक सध्या मृत्यूच्या छायेत आहेत. आरक्षणविरोधाच्या नावाखाली बांग्लादेशात सुरू झालेल्या या आंदोलनाला आता हिंसक वळण मिळालंय. मात्र, उद्धव ठाकरेंनी या हिंसाचाराला जनतेचं न्यायालय म्हटलंय. शिवाय ते कट्टरपंथी हिंसाचाऱ्यांविरोधात एक शब्दही बोलताना दिसले नाहीत. त्यामुळे कट्टरपंथींनी हिंदूंची घरं जाळावीत आणि त्यांना जिवंत जाळावेत हेच जनतेचं न्यायालय उद्धव ठाकरेंना अपेक्षित आहे का? असा सवाल उपस्थित होतोय. तर उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणालेत? आणि बांग्लादेशातील हिंसाचाराबाबत त्यांचं म्हणणं काय आहे? हे जाणून घेऊया.
 
बांगलादेशात उसळलेल्या हिंसाचारात आतापर्यंत हजारो हिंदूंना बेघर करण्यात आलं असून त्यांच्या घरांवर वरवंटा फिरवण्यात आलाय. आरक्षणविरोधाच्या नावाखाली बांगलादेशात सुरू झालेलं विद्यार्थ्यांचं आंदोलन आता इस्लामी कट्टरतावाद्यांच्या हाती गेलंय. इथल्या हिंदूंच्या घरादारांवर हल्ले करून त्यांच्या व्यावसायिक आस्थापनांची लूटमार केली जातीये. त्याचप्रमाणे हिंदू आणि बौद्ध धर्मीयांची मंदिरेही लक्ष्य करण्यात येतीये. मंदिरातील देवतांच्या प्रतिमा उद्ध्वस्त करणं आणि मंदिरं जाळण्याचे प्रकार नियोजनबद्ध पद्धतीने केलं जात असल्याचं स्पष्ट झालंय. धक्कादायक बाब म्हणजे या कट्टरतावाद्यांकडून सार्वजनिक मंदिरांप्रमाणेच घरगुती मंदिरांनाही लक्ष्य करण्यात येतंय.
 
एवढंच नाही तर, इथल्या महिलांना बांधून ठेवण्याचेही व्हिडिओही व्हायरल झाले आहेत. शिवाय बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीनांच्या अवामी लीग पक्षातील नेत्याचं हॉटेल जाळण्यात आलंय. या हॉटेलमध्ये अनेक माणसं असल्याची कल्पना असूनही कट्टरपंथींनी या हॉटेलला आग लावलीये. या हॉटेलमध्ये काही भारतीय नागरिकही वास्तव्याला असल्याचं सांगण्यात येतंय. यामध्ये तब्बल २४ जण भाजले गेले आहेत. तर अनेकांचा आगीमुळे गुदमरून मृत्यू झालाय.
 
या सगळ्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी एक वक्तव्य केलंय. प्रधानमंत्री फसल विमा योजनेबद्दल एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की, "काल जन्माला आलेल्या बांग्लादेशपासून शिका. त्यांनी पंतप्रधानांना पळवून लावलंय. आम्हालाही हे अवघड नाही. आम्हीसुद्धा हे करू शकतो," असं विधान त्यांनी केलंय.
 
तर दुसरीकडे, उद्धव ठाकरेंनी बांग्लादेशमधील हिंसाचाराबाबत हे जनतेचं न्यायालय आहे, असा अजब दावा केलाय. ते म्हणाले की, "जगभरात बऱ्याच ठिकाणी जनतेचा संयम सुटत चाललाय. इस्त्रायलमध्येसुद्धा लाखों लोक रस्त्यावर उतरले होते. आता बांग्लादेशमध्येही तशी परिस्थिती निर्माण झालीये. सर्वसामान्य जनता ही सगळ्यात मजबूत असते. त्यामुळे कोणत्याही राज्यकर्त्याने तिच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये. तसं झाल्यास जनतेचं न्यायालय हे काय असतं हे वेळोवेळी बांगलादेशच्या घटनेने दाखवून दिलेलं आहे," असं ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यामुळे कट्टरपंथींनी हिंदूंची घरे जाळावीत? आणि त्यांना जीवंत जाळावेत हेच जनतेचं न्यायालय उद्धव ठाकरेंना अपेक्षित आहे का? असा प्रश्न निर्माण होतोय.
 
त्यानंतर याचवेळी उद्धव ठाकरेंना पत्रकारांनी बांगलादेशात हिंदूंवर प्रचंड अत्याचार होत आहेत, आपलं यावर म्हणणं काय आहे? असा प्रश्न केला. याचं उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ही जबाबदारी केंद्र सरकारची आहे. शेख हसीनांना जर आपण आश्रय देणार असू तर हिंदूंचीही काळजी त्यांनी घेतली पाहिजे, असंही वक्तव्य त्यांनी केलं. उद्धव ठाकरेंची विरोधी पक्ष म्हणून ही मागणी रास्तही आहे. मात्र, याचवेळी ठाकरेंनी बांग्लादेशमधील कट्टरपंथी हिंसाचाऱ्यांबद्दल एका शब्दाचा निषेधही व्यक्त केलेला नाही. याउलट उद्धव ठाकरे समर्थन करत आहेत का?, हा प्रश्न पडावा, असा त्यांचा सवाल होता.
 
त्यानंतर त्यांनी बांगलादेशसारखी परिस्थिती जर भारतात होऊ द्यायची नसेल तर आरक्षणावर वेळेत निर्णय घ्या, असा इशाराही दिला. उद्धव ठाकरेंना या वाक्यातून नेमकं काय सूचित करायचंय? ते नेमकं कुणाला आव्हान देत आहेत, असा प्रश्न पडतोय. म्हणजे बांगलादेशात जे काही घडलं ते मोदींच्या बाबतीत व्हावं, अशी अपेक्षा उद्धव ठाकरेंना वाटू लागलीये का? सत्तेसाठी आणि राजकारणासाठी उद्धव ठाकरे अशी वक्तव्ये करताहेत. मात्र, आमचं हिंदूत्व वेगळं आहे हे सांगणाऱ्या उद्धव ठाकरेंना तिथल्या हिंदूंबद्दल जराशीही सहानुभूती वाटलेली नाही. आरक्षणाच्या मुद्द्यावर ठाकरेंना पुन्हा महाराष्ट्रात रान उठवायचं आहे का? तिथे जे घडलं हे जनतेचं न्यायालय आहे, असं सांगून महाराष्ट्रात स्तोम माजवू पाहाणाऱ्यांच्या रांगेत उद्धव ठाकरेही आहेत का?, असा प्रश्न पडू लागलाय.
 
यावेळी उद्धव ठाकरेंनी धारावीचाही उल्लेख केला. धारावीतील प्रत्येकाला धारावीतच घर मिळालं पाहिजे, अशी मागणी त्यांनी केलीये. मात्र, त्यांनी धारावीतील अरविंद वैश्य या हिंदू तरुणाच्या निर्घृण हत्येबद्दल अद्याप एकही शब्द का उच्चारला नाहीये? उद्धव ठाकरेंना नेमकी कुणाची भिती वाटते. ज्या तरुणाला जिवंतपणी यातना भोगाव्या लागल्या, त्याच्या अंत्ययात्रेवरही कट्टरपंथींनी दगडफेक केली. मात्र, त्याच्या कुटूंबीयांसाठी धीर देणारा, एक शब्दही उद्धव ठाकरेंनी का व्यक्त केला नाही, असाही प्रश्न उपस्थित होतोय.
 
 
 
Powered By Sangraha 9.0