मुंबई : ५८ आणि ५९ व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्काराच्या अंतिम फेरीसाठीसाठी नामांकने जाहीर झाली आहेत. ५८ व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्काराच्या प्राथमिक फेरीसाठी दिनांक १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२० या कालावधीत सेन्सॉर समंत झालेल्या मराठी चित्रपटांपैकी एकूण २८ मराठी चित्रपटांच्या प्रवेशिका प्राप्त झाल्या होत्या. ५९ व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्काराच्या प्राथमिक फेरीसाठी दिनांक १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२१ या कालावधीत सेन्सॉर संमत झालेल्या मराठी चित्रपटांपैकी एकूण ५० मराठी चित्रपटांच्या प्रवेशिका प्राप्त झाल्या होत्या.
५८ व्या राज्य चित्रपट महोत्सवाच्या अंतिम फेरीसाठी मी वसंतराव, फास, बापल्योक, गोष्ट एका पैठणीची, बीटर स्वीट कडुगोड, जयंती, चोरीचा मामला, सुमी, फनरल, गोदाकाठ या दहा चित्रपटांना सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी नामांकित केले गेले आहे. तसेच प्रथम पदार्पण चित्रपट निर्मिती आणि दिग्दर्शनाकरीता जून, जयंती, फनरल या तीन चित्रपटांना नामांकन मिळाले आहे. ५९ व्या राज्य चित्रपट महोत्सवाच्या अंतिम फेरीसाठी तिचं शहर होणं, एकदा काय झालं, गोदावरी, फ्रेम, कारखानिंसांची वारी, इरगल, येरे येरे पावसा, बाल भारती, राख, बाईपण भारी देवा या दहा चित्रपटांची सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या पारितोषिकासाठी नामांकने जाहीर झाली आहेत. प्रथम पदार्पण चित्रपट निर्मिती करीता जननी, लकडाऊन बी पॉसिटीव , आता वेळ झाली आणि दिग्दर्शनाकरीता तिचं शहर होणं, फ्रेम, कुलूप या तीन चित्रपटांना नामांकने जाहीर झाली आहेत.