युद्धात हरवलेला जलसिंचन प्रकल्प

16 Aug 2024 21:09:47
Great Man-Made River


नदीपात्रात अनधिकृत बांधकामे उभारून नदीपात्र लुप्त होत असल्याची ओरड आपण नेहमीच ऐकतो. त्याचवेळी दुसरीकडे जागतिक हवामानबदल, हिमनद्यांच्या पाणीपातळीत होत असलेली वाढ आणि पृथ्वीचे वाढत असलेले तापमान, यावरही जागतिक पातळीवर मंथन सुरू आहे. अशावेळी दूरवर पसरलेल्या लिबियातील वाळवंटात ’ग्रेट मॅन-मेड रिव्हर’ हा मानवनिर्मित नदी प्रकल्प म्हणजे जगातील आठवं आश्चर्यच, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

’ग्रेट मॅन-मेड रिव्हर’ (GMMR) हे जलवाहिन्यांचे एक विलक्षण जाळे आहे, ज्याचा जगातील सर्वात मोठा सिंचन प्रकल्प म्हणून उल्लेख केला जातो. लिबिया ओलांडून या जलवाहिन्या प्राचीन ‘न्युबियन सँडस्टोन अ‍ॅक्विफर सिस्टीम’चे ताजे पाणी त्रिपोली आणि बेनगाझीसह गजबजलेल्या शहरांपर्यंत पोहोचवतात. तब्बल १,६०० किमीपर्यंतचे उल्लेखनीय अंतर पार करत या प्रणालीने लिबियामध्ये वापरल्या जाणार्‍या सर्व गोड्या पाण्यापैकी ७० टक्के पाणी पुरवले जाते. असा हा विलक्षण मानवनिर्मित नदी प्रकल्प वाळवंटातील वाळूच्या खाली जगातील सर्वात विस्तृत भूमिगत पाईप आणि जलवाहिनी नेटवर्क आहे, जे २,८२० किमी इतक्या दूरवर पसरलेले आहे. या प्रकल्पातील ५०० मीटरपेक्षा जास्त खोल असलेल्या १,३०० पेक्षा जास्त विहिरी दररोज आश्चर्यकारकपणे ६.५ दशलक्ष घनमीटर शुद्ध पाणी वितरीत करतात.

१९९१ पासून या प्रकल्पाने लिबियाच्या उत्तरेकडील लोकसंख्या असलेल्या शहरांना आणि शेतीच्या क्षेत्रांना अत्यंत आवश्यक सिंचन आणि पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला आहे, जे पूर्वी डिसेलिनेशन प्लांट्सवर अवलंबून होते. या वाळवंटात पाण्याचा साठा सापडण्याची गोष्टही तितकीच औत्स्युक्याची आहे. तेल शोधण्यासाठी खोल जमिनीत ड्रिलिंगदरम्यान १९५०च्या दशकात लिबियाच्या आग्नेय वाळवंटातील अल-कुफ्राह या भागात प्रथमच पाणी सापडले. १९८३ मध्ये या प्रकल्पाचे व्यवस्थापन करण्यासाठी सरकारने ’ग्रेट मॅन-मेड रिव्हर ऑथोरिटी’ स्थापन केली. ‘फेज १’ मध्ये ’ताझिरबु’ आणि ’सरीर’ या दोन शेतांत शेकडो पाण्याच्या विहिरी खोदण्यात आल्या. सुमारे ५०० मीटर (१,६५० फूट) खोलीतून पाणी उपसण्यात आले. सरीर येथून हे उपसलेले पाणी दुहेरी पाईपलाईनद्वारे भूगर्भात पंप करून अजदाबिया येथील होल्डिंग जलाशयात आणले गेले. १९८९ मध्ये पहिल्यांदा या भागाला गोडे पाणी मिळाले.

१९९१ मध्ये पहिला टप्पा पूर्ण झाला. फेज खख ने पश्चिम लिबियात स्थित राजधानीचे शहर त्रिपोलीला १९९६ मध्ये पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यास सुरुवात केली. फेज-२ ’जबल अल-हसाविना’ प्रदेशातील तीन विहिरींतून पाणी खेचते. या फेजची क्षमता दिवसाला २.५ दशलक्ष घनमीटर पाणी आहे. २००९ मध्ये प्रकल्पाच्या फेज-३ मध्ये आणखी १,२०० किमी पाईपलाईन जोडल्या गेल्या. या प्रकल्पामध्ये फेज-४ आणि फेज- ५ चा देखील समावेश आहे, ज्यात विद्यमान प्रकल्पाच्या क्षमतेच्या विस्ताराचा समावेश आहे. या दोन टप्प्यांत सुमारे चार हजार किमी जलवाहिन्यांचा समावेश असेल. ‘फेज १’ मध्ये तयार केलेल्या जलवाहिन्या त्यावेळी जगातील सर्वात मोठ्या असल्याचे म्हटले जाते. या प्रत्येक वाहिनीचा व्यास चार मीटर (१३ फूट) आणि सात मीटर (२३ फूट) इतका होता. लिबियामध्ये असलेल्या दोन मोठ्या कारखान्यांमध्ये तयार केलेले हे पाईप स्टील-प्रबलित प्रीस्ट्रेस्ड काँक्रिटच्या थरांनी बनलेले होते. हे पाईप खास तयार केलेल्या क्रेनद्वारे सात मीटर खोल खंदकांमध्ये घातले गेले आणि बुलडोझरने ढकलले गेले.

नंतर महाकाय रबर ओ-रिंग्ज आणि सिमेंट ग्रॉउटने सील केले गेले आणि खंदकाचे भाग भरले गेले. जगभरातील असंख्य अभियांत्रिकी कंपन्यांनी ‘जीएमआर’ प्रकल्पात सहभाग नोंदविला. मात्र, या प्रकल्पाला २०११ मध्ये पहिल्या लिबियन गृहयुद्धादरम्यान हवाई हल्ल्यांत या प्रकल्पातील महत्त्वपूर्ण पाईप उत्पादन संयंत्राला लक्ष्य केले होते. यावेळी पाणीपुरवठा पायाभूत सुविधांवर मोठा परिणाम झाला. दुसर्‍या लिबियन गृहयुद्धामुळे पायाभूत सुविधांकडे दुर्लक्ष आणि बिघाड यामुळे प्रणाली आणखी ताणली गेली. मग, आता प्रकल्प कुठे आहे? अशा चर्चांना उधाण आले आहे. या प्रकल्पाचे तीन आणि चार टप्पे रखडले. आंतरराष्ट्रीय कंपन्या असुरक्षिततेच्या वातावरणात काम करू शकल्या नाही आणि परिणामी अनेक कंपन्यांनी अखेरीस पूर्णपणे माघार घेतली. तरीही, भविष्यात हा प्रकल्प पुन्हा सुरू केला जाईल, अशी आशा जीएमएमआरला आहे.


Powered By Sangraha 9.0