भिकारी सोबत लुटारूही...

15 Aug 2024 21:20:58
german-tourist-looted-in-pakistan


बेल्जियमच्या सिल्वी स्टिनाला पाच दिवस डांबून ठेवले गेले आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. 14 ऑगस्ट रोजी तिला इस्लामाबादच्या रस्त्यावर हातपाय बांधलेल्या अवस्थेत तिला फेकून दिले गेले. पाकिस्तानच्या हिंसक आणि तितक्याच कृत्रिम स्वातंत्र्याला 78 वर्षे झाली, पण पाकिस्तानची मानसिकता तीच आहे, जी फाळणीच्या वेळेस होती. सिल्वीवर अत्याचार करणार्‍या तमीजुद्दीनला पाकिस्तानी पोलिसांनी पकडले. मात्र, त्याचे म्हणणे सिल्वी स्टिना मानसिकरीत्या आजारी असून, पाकिस्तानात राहण्यासाठीचा व्हिसा तिच्याकडे नाही. ती बेकायदेशीररीत्या पाकिस्तानमध्ये राहत आहे, तर सिल्वीचे म्हणणे आहे की, तिची कागदपत्रे आणि सोबतच्या सर्वच वस्तू चोरीला गेल्या आहेत.

ते काहीही असो, पण सिल्वीच्या या परिस्थितीचे पडसाद आंतरराष्ट्रीय स्तरावरही उमटले. विदेशी लोकांसाठी पाकिस्तान सुरक्षित आहे की नाही, असा प्रश्न यामुळे उपस्थित होतो. कारण, गेल्याच महिन्यात लाहोरमध्ये जर्मनीच्या बर्ग फ्लोरीनबाबतही असेच काही घडले होते. बर्ग पाकिस्तानमध्ये फिरण्यासाठी आला होता. सायकलवरून तो पाकिस्तानची सफर करणार होता. रात्र झाली म्हणून लाहोरच्या एका रस्त्याच्या कडेला त्याने तंबू बांधला. त्याचवेळी काही व्यक्ती तिथे आल्या. बंदूक दाखवून त्यांनी बर्गला लुटले आणि मारलेही. मोबाईल फोन, 5 लाख 50 हजार पाकिस्तानी रुपये आणि कॅमेरा घेऊन ते पसार झाले. या घटनेने हताश आणि घाबरलेल्या बर्गने लाहोर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली. या गुन्ह्याचा मागोवा घेताना स्पष्ट झाले की, बर्गला लुटण्यामध्ये चार पाकिस्तानी पोलीसही सामील होते.

विदेशी नागरिकांमध्ये भारतीयांना लुटण्याच्या घटनाही पाकिस्तानमध्ये घडल्या आहेत. गुरूनानक देवजी प्रकाशपर्व साजरे करण्यासाठी भारतीय शीख पाकिस्तानमध्ये जात असतात. तिथे नानक देवजींच्या स्मृतींनी पावन असलेला गुरूद्वारा आहे. तर, गेल्या वर्षी कवलजीत सिंह आणि त्याचे कुटुंब पाकिस्तानमध्ये गेले होते. तर, कवलजीत सिंहलाही असाच शस्त्रास्त्राचा धाक दाखवत भारतीय आणि पाकिस्तानी रोख रक्कम लुटली होती. दागिने लुटले होते. या पाकिस्तानी लोकांपुढे आदर्श तरी कोणता असणार म्हणा? नेते म्हणाल तर सगळे एक दुसर्‍याला फाशीची सजा देण्यास उत्सुक! सगळेच एकजात भ्रष्टाचारी! प्रत्येक प्रांत स्वतंत्र देश होण्यास उत्सुक. 78 वर्षांत पाकिस्तानने मिळवले ते हेच. शिया, सुन्नी, अहमदीया आणि इतर फिरक्यांच्या शत्रुत्वाच्या कथाही अशाच! राजकीय नेत्यांचे आणि समाजाचे हे असे तर पाकिस्तानी सैनिकांचे काय? तर, पाकिस्तानच्या ‘आयएसआय’चा प्रमुख आणि लेफ्टनंट जनरल (सेवानिवृत्त) फैज हमीद याला नुकतीच रावळपिंडी येथून अटक झाली. का? तर तोे आणि काही अधिकारी श्रीमंत लोकांच्या घरात घुसून त्यांच्या घरातील किमती वस्तू, दागिने आणि रोकड लुटायचे. घ्या, लेफ्टनंट जनरलच असे करतोय, तर बाकीच्या पाकिस्तान्यांचे काय?
 
या सगळ्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानची ती घटना आठवते. दि. 14 ऑगस्ट 2021. पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी पाकिस्तानचीच मुस्लीम मुलगी मिनार-ए-पाकिस्तान येथे गेली. तिथे 300-400 पाकिस्तानी होते. त्यांनी तिला घेरले. त्यांनी तिला उचलून एकमेकांच्या अंगावर फेकायला सुरुवात केली. चेंडूसारखे वर आकाशात फेकून खाली ज्याच्या हाताला ती लागेल, तो तिला झेलून पुन्हा वर फेकत होता. तीन तास ती मुलगीही मरणयातना सहन करत होती. तर, हा असा पाकिस्तान आणि त्या पाकिस्तानातून फुटून निघालेला बांगलादेश. तिथल्याही लोकांनी त्यांच्याच कौमच्या ज्येष्ठ वयाच्या पंतप्रधान असलेल्या हसीना शेख यांचे अंतर्वस्त्र हवेत फडकवले. त्यांच्या घरातले प्रत्येक सामान, पशू, पक्षी, अगदी संडासचे भांडेही लुटले.

धर्माच्या नावावर पाकिस्तान भारतापासून वेगळा झाला. मात्र, पाकिस्तानमध्ये अधर्माशिवाय काहीच घडताना दिसत नाही. एकंदर काय मक्का-मदिना येथे भीक मागण्यामध्ये पाकिस्तानी नंबर वन आहेत, तसेच त्यांच्या देशात येणार्‍या आणि देशातल्या सधन नागरिकांना लुटण्यामध्येही पाकिस्तानी अव्वलच! ‘अतिथी देवो भव’ ही आपल्या भारतीयांची संस्कृती. मात्र, पाकिस्तान्यांची संस्कृती जणू अतिथी आणि ‘दिसेल त्याला लुटो’ हीच आहे. पाकिस्तानी भिकारीसोबत लुटारूही आहेत, असे म्हणावे का?

9594969638
 
Powered By Sangraha 9.0