सच्चा समाजसेवी ‘अवधूत’

15 Aug 2024 22:06:50
avdhoot nagarkar


आदिवासीबहुल भागांतील मुलांचा शैक्षणिक विकास व्हावा, या विचाराने त्यांना शिक्षणासाठी सर्वतोपरी मदत करणारे बडोद्याचे अवधूत नगरकर. त्यांच्या समाजकार्याचा परिचय करुन देणारा हा लेख...

समाजात अशी काही ठरावीकच लोकं असतात, ज्यांनी आपलं संपूर्ण जीवन समाजोन्नत्तीसाठी समर्पित केलेलं असतं. गुजरातमधील अवधूत राजेंद्र नगरकर हे त्यांपैकीच एक. पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरी यांसारख्या ग्रामीण भागाच्या आदिवासी समाजातील गरजू विद्यार्थ्यांसाठी अवधूत अक्षरश: देवदूतच ठरले आहेत. त्या मुलांना लागणार्‍या सर्व शैक्षणिक सामग्रीची सोय अवधूत दरवर्षी करत असतात.

बडोदे येथील वाडी भागात 11 फेब्रुवारी 1977 रोजी अवधूत यांचा जन्म झाला. नवजीवन हायस्कूलमध्ये त्यांनी अकरावीपर्यंतचे शिक्षण घेतले. त्यानंतर पुढे त्यांनी ‘आयटीआय’ (मोटार मेकॅनिक) केले.घरची परिस्थिती म्हणजे मध्यमवर्गीय जीवन. आई गृहिणी आणि वडील गुजरातच्या पब्लिक रोड ट्रान्सपोर्टमध्ये नोकरीला. लहान भाऊ हेमंत नगरकर आपले शिक्षण पूर्ण करून ऑस्ट्रेलियात स्थायिक झाला. पण, अवधूत यांना शिक्षणाची फारशी आवड नसल्याने त्यांनी समाजकार्याला प्राधान्य दिले.

साध्या राहणीमानातच आयुष्य काढावं, असे त्यांचे विचार होते. लग्न करायचं नाही, यावर मात्र ते ठाम होते. आजचा दिवस चांगला जावा, एवढंच त्यांना कायम वाटायचं. ‘श्री वडेश्वर महादेव ट्रस्ट ’आणि त्याच्या कार्याला सुरुवात झाली ती गोध्रा हत्याकांडाच्या काळातील एका प्रसंगामुळे. एक 80 वर्षांचे गृहस्थ गरिबांमध्ये दोन-तीन ट्रक भरून साखर वितरण करायचे. त्यांच्या कामात मदत म्हणून त्या गृहस्थांना कोणीतरी अवधूत यांचे नाव सुचवले. तेव्हापासून समाजासाठी, गरजूंसाठी काम करायची इच्छाशक्ती वाढत गेली. त्यानंतर, काम जसजसं आवडायला लागलं, तेव्हा गरीब घरांतील मुलांना वही-पेन देण्यास त्यांनी सुरुवात केली. कारण, स्वतः कमी शिकलेले असले तरी या मुलांच्या शैक्षणिक भविष्याचा विचार अवधूत यांच्या कायमच अग्रस्थानी होता.

आईवडिलांचे निधन झाल्यानंतर त्यांनी घराच्या परिसरातच पाणीपुरी विक्रीचाव्यवसाय सुरू केला. त्यातून ते आपला उदरनिर्वाह कसाबसा भागवायचे. एकीकडे व्यवसाय आणि दुसरीकडे समाजकार्य, असे तारेवरची कसरत सुरुच होती. पण, आजघडीला अवधूत यांनी एकूण 12 शाळा दत्तक घेतल्या आहेत. त्या शाळांतील मुलांकरिता शालेय किटची व्यवस्था ते करत असतात. त्यात दप्तर, फळा, वही, पेन अशा बर्‍याच शैक्षणिक साहित्य-सामग्रीचा समावेश होतो.

चारोटीपासून पुढे तलासरीजवळ शिसणेगाव आहे. त्या गावातील एका शाळा गेली कित्येक वर्षे अंधारातच होती. ही बाब अवधूत यांच्या निदर्शनास येताच, त्यांनी त्या शाळेत लगोलग विजेची सोय करून दिली. शाळेत दिवे आणि पंखे मग दाखल झाले. त्यानंतर हळूहळू लोकांना अवधूत यांच्या कार्याची जाणीव व्हायला लागली. या कार्यासाठी आजपर्यंत जी काही आर्थिक मदत त्यांना होत गेली, त्याकरिता त्यांना कधी समाजात आपली झोळी पसरवावी लागली नाही. समाजातील काही दानशूर मंडळींनी स्वतःहून लावलेला हा हातभार कामी आल्याचे अवधूत सांगतात.

महाराष्ट्रात शिर्डी, कोपरगाव, नाशिक, यवतमाळ, वाशिममधील काही शाळांमध्ये अवधूत यांनी आपल्या याच कार्यातून कित्येक विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावर हसू फुलवले आहे. त्याव्यतिरिक्त गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश याठिकाणीसुद्धा त्यांनी मदत पाठवली आहे. एकीकडे हे कार्य सुरू असताना त्यांनी आता वृक्षारोपणाचा नवा उपक्रम सुरू केला आहे. आदिवासी भागातील मुलांना पर्यावरणाचे महत्त्व पटवून धेण्यासाठी, त्यांच्याच शाळेच्या परिसरात मुलांच्या हातून वृक्षारोपण केले जाते. आतापर्यंत विविध प्रकारची 2,700 रोपट्यांची त्यांनी लागवड केली आहे. भविष्यात पाच हजार वृक्षलागवडीचे लक्ष्य अवधूत यांनी निर्धारित केले आहे.

या सर्व कार्यासाठी लागणारे आर्थिक नियोजन पाहता, ट्रस्टमधील आठ-दहा जणं मिळून दर महिन्याला काही रकमेचे योगदान देतात. तसेच समाजातील काही दानशूर मंडळी त्यांना जमेल तशी आर्थिक मदत करतात. अवधूत म्हणतात की, जगात त्यांचे एकमेव असे ट्रस्ट आहे, जे उधारीवर सुरू आहे. बडोद्यातील ‘प्रियांशी मार्केटिंग’ म्हणून त्यांच्या वस्तूंचे पुरवठादार आहेत. ते ‘श्री वडेश्वर ट्रस्ट’ला विद्यार्थ्यांना लागणार्‍या शैक्षणिक सामग्रीची सोय करून देतात. त्यांच्याकडे जवळजवळ 50 हजार रुपयांपर्यंतची उधारी बाकी आहे. मात्र, गेल्या 20 वर्षांत त्यांना कधी या उधारीची आठवण करून दिली गेली नाही. कारण, अवधूत करत असलेल्या समाजकार्यामुळे इतरांच्या मनात त्यांच्याबद्दल एक विश्वास निर्माण झाला आहे. असे असूनही अवधूत मात्र जमेल तशी ही उधारी चुकती करत असतात.

अवधूत समाजाला आवाहन करतात की, “आदिवासी समाजातील मुलांना, गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी एक साधी पेन्सिलदेखील सहज मिळत नाही. आपण जे काही कमावतो, त्या पैशांतून किमान वर्षातून एकदा एक पेन्सिल या मुलांना द्यावी. त्यांना मदत केल्यास त्यांचे भविष्य नक्कीच उज्ज्वल होईल.” अवधूत यांच्यासाठी लोकांनी गरजू विद्यार्थ्यांसाठी केलेली आर्थिक मदत हाच त्यांच्यासाठी सत्कार आहे. बोर्डी, घोलवड, डहाणू, उमरगाम, झाई, तलासरी, शिसणे या ठिकाणी त्यांची केंद्रं आहेत. याठिकाणी ते बडोद्याहून रेल्वेने 300 किमीचा प्रवास करून आदिवासी मुलांकरिता ते प्रवास करतात. पालघर, सफाळेपर्यंत कार्यविस्तार झाला आहे. लवकरच त्यापुढेही हे कार्य विस्तारत जाईल, असा त्यांना विश्वास आहे. अवधूत नगरकर यांना पुढील वाटचालीसाठी ’दै. मुंबई तरुण भारत’तर्फे अनेक शुभेच्छा.
(अधिक माहितीसाठी संपर्क : 8347462864)



Powered By Sangraha 9.0